“परळीत मतदान केंद्रावर शाई लावून बाहेर जायचे,ती गँग बटण दाबायची” !! व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा दावा !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० जानेवारी २५ शुक्रवार
महायुतीने ईव्हीएममध्ये घोटाळा करून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून होत होता.दरम्यान आता मविआ नेत्यांनी दावा केला आहे की सत्ताधाऱ्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी मतदान केंद्र ताब्यात घेतली होती.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला आहे.बीडमधील वाढती गुन्हेगारी,गुन्हेगारांना दिल्या जाणाऱ्या संरक्षणावरून आव्हाडांसह अनेक विरोधक थेट धनंजय मुंडेंवर आरोप करत असतांनाच आता त्यांच्या निवडणूक विजयावर प्रश्न उपस्थित केले आहेत.आमदार आव्हाड यांनी एक्सवरील एक पोस्ट (व्हिडीओ) रिपोस्ट केली आहे यामध्ये एक व्यक्ती ईव्हीएम मशीनवर धनंजय मुंडे यांना मतदान करत असल्याचे दिसत आहे.मतदान केंद्र ताब्यात घेऊन धनंजय मुंडे यांना मतदान केल्याचा दावा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने केला आहे.
गजाभाऊ नावाच्या एक्स हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.गोट्या गीते नावाचा इसम ईव्हीएम मशीनवरून धनंजय मुंडे यांना मतदान करतांना दिसतोय.गजाभाऊने या व्हिडीओसह कॅप्शनमध्ये म्हटले आहे की “गोट्या गीतेचा अजून एक कारनामा,मतदान करतांनाच व्हिडिओ त्याने टाकलेला आहे.तुम्ही स्पष्ट बघू शकता की त्याच्याबरोबर अजून कोणीतरी बाजूला मतदान करत आहे.हे बूथ कॅप्चर नसेल का?”गजाभाऊची ही पोस्ट रिपोस्ट करत आव्हाड यांनी म्हटले आहे की, “परळी मतदारसंघात २०१ बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आले.शाई लावायची आणि बाहेर जायचे…मतदान केंद्राच्या आतमध्ये तुमचे बटण दाबण्यचे काम ही गँग करायची.सगळे एकदम ट्रान्सपरंट (पारदर्शक)… हे सगळे पोलिसांसमोरच घडत होते असे परळीचे उमेदवार राजाभाऊ देशमुख यांनी सांगितले आहे.मतदान केंद्राचे काही व्हिडीओ देखील आहेत परंतु याला कोण काय करणार,हे कायद्याचे राज्य आहे.पुढे कोणाला कंत्राट द्यायचे असेल तर त्यांनी वाल्मिक कराडशी संपर्क साधावा”.
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.वाल्मिक हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून बीडमध्ये प्रसिद्ध आहे.वाल्मिकवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्याला अटकेऐवजी पोलीस संरक्षण दिलं जात होते.त्याला धनंजड मुंडे यांचे पाठबळ असल्याचा आरोप विरोधक करत आहेत याप्रकरणी विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे अशातच मुंडे यांच्यावर आता आणखी एक आरोप झाला आहे.