यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ जानेवारी २५ बुधवार
तालुक्यातील भालोद कला व विज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे दत्तक गाव हिंगोणे येथे आयोजित हिवाळी शिबिराचा समारोप नुकताच संपन्न झाला.या समारंभाचे अध्यक्ष लीलाधर विश्वनाथ चौधरी,चेअरमन सेकंडरी सोसायटी भालोद हे उपस्थित होते.तर अतुल गांगुर्डे नायब तहसीलदार यावल हे प्रमुख पाहुणे होते. याप्रसंगी नितीन वासुदेव चौधरी सेक्रेटरी,से.ए.सोसायटी भालोद तसेच से.ए.सोसायटीचे संचालक किशोर लक्ष्मण महाजन,लीलाधर नारायण चौधरी,मधुकर गिरीधर परतणे हे उपस्थित होते.तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अधिसभा सदस्य प्रा.डॉ.पी डी पाटील व नरेंद्र विष्णू नारखेडे हे उपस्थित होते तसेच प्रभात विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर जगन्नाथ गाजरे,हिंगोणे येथील तलाठी संदीप गोसावी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे व उपप्राचार्य प्रा.मुकेश चौधरी हेही उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक गिरीश पाटील यांने केले तर प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिनेश महाजन यांनी केले.
नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे हे आपल्या मनोगतात म्हणाले की,राष्ट्रीय सेवा योजना विभाग हे व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे.या विभागामुळेच मी आज या पदावर पोहोचलो आहे.प्राचार्य कोल्हे यांनी एन.एस.एस.मुळे श्रमदानाचे संस्कार विद्यार्थ्यांवर होतात तसेच विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची आवड निर्माण होते असे म्हणाले.अध्यक्षीय मनोगत लीलाधर चौधरी यांनी एन.एस.एस.मुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त,संस्कार व श्रमाचे महत्व बिंबविले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना भावी आयुष्य जगण्यास अतिशय उपयोग होतो असे ते म्हणाले.सदरील सात दिवशीय विशेष हिवाळी शिबिरात रासेयो स्वयंसेवकांनी हिंगोणे गावात विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली तसेच टिटवा रोडवर असलेल्या बंधाऱ्याचे खोलीकरण तसेच दररोज सकाळी प्रभात फेरी काढून गावामध्ये विविध रॅली काढून ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच गावातील शाळाबाह्य मुला मुलींचे सर्वेक्षण करण्यात आले.या विशेष शिबिरात उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून प्रशांत जवरे तर उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून मयुरी सपकार यांची निवड करण्यात आली.याप्रसंगी अश्विनी रोझोदे,प्रशांत जवरे,गिरीश पाटील व रियाज तडवी या स्वयंसेवकांनी आपली मनोगत व्यक्त केली.आभार प्रदर्शन टिना कोळी हिने केले.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.दिनेश महाजन प्रा.काशिनाथ पाटील व प्रा.मोहिनी तायडे यांनी परिश्रम घेतले.