महाराष्ट्रातल्या पार्किंगच्या समस्येवर जपानी तोडगा !! प्रस्तावित प्रणालीमध्ये वाहन नोंदणीपासून अतिरिक्त शुल्काचाही समावेश !!
काय आहे वाहन व्यवस्थापनाचे जपानी मॉडेल ?
भिमनवार यांनी यावेळी नव्या वाहन प्रणालीबाबत माहिती दिली असून आधी आम्ही सविस्तर सर्वेक्षण करून उपलब्ध पार्किंगची जागा निश्चित करू त्यानंतर या जागा लोकांना ठरवून दिल्या जातील.पार्किंगची प्रत्येक जागा त्या त्या वाहनाच्या नोंदणी क्रमांकाशी जोडली जाईल.उदाहरणार्थ जर एखाद्या शहरात पार्किंगच्या १०० जागा असतील पण वाहने मात्र ११० असतील तर पार्किंगशी संलग्न नसणाऱ्या अतिरिक्त वाहनांना सार्वजनिक ठिकाणी पार्किंग करावे लागेल.सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहन खरेदीदाराकडे जर पार्किंग असेल तरच त्याच्या वाहनाची नोंद केली जाईल अशी माहिती विवेक भिमनवार यांनी दिली आहे.
गर्दीच्या वेळी अतिरिक्त शुल्क !!
दरम्यान पार्किंगची पुरेशी जागा असूनही अनेक ठिकाणी वर्दळीच्या वेळी मोठी कोंडी झाल्याचे दिसून येते त्यावरदेखील प्रशासनाने तोडगा काढला असून अशा ठिकाणी अतिरिक्त मूल्य आकारले जाणार आहे.अशा गर्दीच्या वेळी ठराविक ठिकाणी प्रवेश करणाऱ्या वाहनांना वेगळे मूल्य आकारले जाईल यामुळे खासगी वाहनांचा वापर कमी होऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय निवडण्याकडे नागरिकांचा कल जाईल परिणामी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल असे भिमनवार यांनी नमूद केले आहे.
मुंबई बाहेरच्या वाहनांना प्रतिदिन अतिरिक्त मूल्य !!
याव्यतिरिक्त मुंबई महानगर क्षेत्राच्या बाहेर नोंदणी झालेल्या वाहनांना मुंबईत फिरण्यावर प्रतिदिन शुल्क आकारले जाईल.इतर शहरांत नोंद झालेल्या वाहनांना स्थानिक वाहतूक नियमांमधून सूट मिळण्यास पायबंद बसावा म्हणून या पर्यायाचा विचार करण्यात आल्याचे भिमनवार यांनी नमूद केले.निवासी परिसरात सर्व वाहनांना पार्किंगची जागा ठरवून दिली जाईल.पार्किंगच्या जागेपेक्षा जास्त वाहने असणाऱ्या सोसायट्यांना त्यांची जागा काळजीपूर्वक नियोजन करून पार्किंगसाठी उपलब्ध करून द्यावी लागेल.दरम्यान या पर्यायाचा वाहतूक विभागाकडून गांभीर्याने विचार होत असला तरी अद्याप त्याच्या अंमलबजावणीसंदर्भातल्या तरतुदींवर सविस्तर काम चालू असल्याचे भिमनवार यांनी स्पष्ट केले आहे.