एका पराठ्यामुळे सापडला सैफचा हल्लेखोर !! पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला ? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ जानेवारी २५ मंगळवार
अभिनेता सैफ अली खान यांच्यावर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद उर्फ विजय दास (३०) याला ठाण्यातून अटक करण्यात पोलिसांना यश आले असून आरोपी बांगलादेशी नागरिक असून घुसखोरी करून देशात आल्याचे प्राथमिक चौकशीतून निष्पन्न झाले आहे.दरम्यान त्याने एका ठिकाणी जीपेच्या माध्यमातून व्यवहार केल्याने त्याचा ठावठिकाणा लागला त्यामुळे ७० तास गुंगारा देणाऱ्या आरोपीला पोलिसांना पकडता आले असे वृत्त इंडियन एक्स्प्रसेने दिले आहे. आरोपीने वरळीतील सेंच्युरी मिलजवळील एका स्टॉलवर पराठा आणि पाण्याच्या बाटलीसाठी गुगल पे द्वारे युपीआय व्यवहार केला होता व या व्यवहारामुळे पोलिसांना आरोपीचा मोबाईल क्रमांक मिळाला.या मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलीस त्याच्या मागावर होते व त्याचे लोकेशन ट्रॅक करून पोलीस ठाण्यातील कामगार वस्तीपर्यंत पोहोचले.कामगार वस्तीत शोधाशोध करूनही तो सापडला नाही अखेर त्याने थोड्यावेळा करता मोबाईल फोन सुरू केला असता पोलिसांना तो कांदळवनातील जंगलात लपला असल्याचे समजले त्यानुसार टॉर्चच्या आधारे पोलिसांनी त्याचा ठाण्यातील घनदाट जंगलात शोध घेतला व त्याचा मोबाईल नंबर सापडल्यानंतर जवळपास १०० पोलिसांच्या पथकाने अवघ्या काही तासांतच जंगलाच्या झुडुपातून त्याच्या मुसक्या आवळल्या.
पोलीस माग काढत वरळीपर्यंत कसे पोहोचले !!
सैफवर हल्ला झाल्याचे समजताच मुंबई गुन्हे शाखेने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली व यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.सीसीटीव्ही फुटेजनुसार तो आधी वांद्रे रेल्वे स्थानकात गेला तिथून तो दादर येथे उतरला.दादरच्या एका दुकानातून त्याने मोबाईल कव्हरही खरेदी केले पण त्याने येथे रोख रक्कम भरली तिथून तो कबूतरखाना आणि नंतर वरळीला गेला असे सीसीटीव्हीतून पोलिसांना समजले अशी माहिती सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.वरळी परिसरातील फुटेज तपासल्यानंतर तो सेंच्युरी मिलजवळील एका स्टॉलवर काही काळ रेंगाळत असल्याचे दिसले.फुटेजमध्ये तो स्टॉल चालवणाऱ्या व्यक्तीशी गप्पा मारतानाही दिसला त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ वरळीत धाव घेऊन त्या स्टॉल मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला व त्याच्याकडून काहीतरी पुरावा मिळेल या आशेने पोलिसांनी तिथे सात पथके तैनात केली.
स्टॉलचा मालक नवीन एक्का या नावाने ओळखला जातो.पोलिसांना या एक्काचा जनता कॉलनीतील जयहिंद मित्र मंडळ येथील घराचा पत्ता सापडला ते तिथे पोहोचले असता तो तिथे सापडला नाही.एक्का तिथे पाच-सहा कामगारांसह भाड्याने राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यामुळे पोलिसांनी तेथील खोली मालकाचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधला.एक्का नावाचा भाडेकरू तिथे राहत असल्याचे मालकाने सांगितले पण ते आरोपीला ओळखू शकले नाहीत असेही इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात नमूद आहे.खोली मालकाच्या मुलाने एक्काचा मोबाईल नंबर पोलिसांना दिला.त्यानुसार पोलिसांनी एक्काला फोन करून त्याची चौकशी केली व या चौकशीतून त्याने सांगितले की मोहम्मदने पराठा आणि पाण्याच्या बाटलीसाठी युपीआय पेमेंट केले होते त्या पेमेंटमुळे पोलिसांना मोहम्मदचा मोबाईल नंबर मिळाला.
…अन् आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना आले यश !!
दरम्यान ठाण्यातील कासारवडवली येथे अमित पांडे नावाच्या कंत्राटदाराने त्याला काही महिन्यांपूर्वीच कामावर ठेवले होते व त्याचा मोबाईल नंबर पोलिसांसाठी टर्निंग पाँइट ठरला.जवळपास २० पथके ठाण्यात पोहोचली आणि संशयिताचा शोध सुरू केला परंतु तो घटनास्थळावरून पळून गेला आणि शनिवारी रात्री १० च्या सुमारास त्याने आपला मोबाइलही बंद केला परंतु थोड्यावेळाने तो ठाण्यातील जंगलात लपल्याची माहिती मिळाली.डीसीपी नवनाथ ढवळे यांच्या नेतृत्त्वाखाली पथकाला तो एका झुडप्याखाली लपल्याचे दिसले त्यामुळे त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले असे पोलिसांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
बांगलादेशमध्ये १२ वी शिकलाय सैफचा हल्लेखोर !! भारतात कसा आला ? सिमकार्ड कसे मिळवले ? माहिती आली समोर !!
प्राथमिक तपासात आढळलेल्या माहितीनुसार आरोपीने वापरलेले सिमकार्ड पश्चिम बंगालमधील ‘खुकुमोनी जहांगीर सेख’ या नावाने रजिस्टर्ड आहे.आरोपीने सिमकार्ड घेण्यासाठी त्या व्यक्तीचे आधार कार्ड वापरल्याचा संशय आहे असे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.शरीफुल इस्लाम काही आठवड्यांसाठी पश्चिम बंगालमधील काही जिल्ह्यात फिरल्याचा संशय पोलिसांना आहे व तिथे त्याने आधार कार्ड बनवण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही असे सूत्रांनी सांगितले.
रोजगाराच्या शोधात आला भारतात !!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,शरीफुल इस्लामने पोलिसांना सांगितले की,तो बांगलादेशमध्ये १२वीपर्यंत शिकला होता,त्याला दोन भाऊ आहेत आणि तो रोजगाराच्या शोधात भारतात आला होता.त्याने भारतात प्रवेश करण्यासाठी मेघालयातील भारत-बांगलादेश सीमेवरील डौकी नदी ओलांडली असा दावा त्याने केला आहे.त्याने भारतात राहण्यासाठी विजय दास हे खोटे नाव वापरले.पश्चिम बंगालमध्ये काही आठवडे राहिल्यानंतर तो मुंबईत आला.इथे आल्यावर ज्याठिकाणी कागदपत्रे लागत नाही अशा ठिकाणी तो काम करू लागला.अमित पांडे या कंत्राटदाराने त्याला वरळी आणि ठाणे येथील पब आणि हॉटेलमध्ये काम मिळवून दिले अशी माहिती सूत्रांनी दिली.
चौकशीदरम्यान आरोपीने आधी दावा केला की तो कोलकाताचा रहिवासी आहे असे पोलिसांनी सांगितले पण त्याच्या फोनवरून पोलिसांना बांगलादेशमधील नंबर्सवर केलेले अनेक कॉल आढळले.बांगलादेशातील आपल्या कुटुंबियांना कॉल करण्यासाठी त्याने काही मोबाईल ॲप्सचाही वापर केला होता असे पोलीस सूत्रांनी सांगितले त्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या कुटुंबाला फोन करायला सांगितले.त्याला बांगलादेशमधील त्याच्या भावाकडून ओळखीच्या पुराव्यासाठी कागदपत्र मागवायला सांगितले व त्या कागदपत्रांवरून त्याच्या बांगलादेशी नागरिकत्वाची पुष्टी झाली.
इंडियन एक्सप्रेसने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार,सैफच्या इमारतीत घुसण्याआधी आरोपीने इतर बॉलीवूड स्टार्सच्या बंगल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही.कुत्रे भुंकल्याने तो तिथून पळून जातांना काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे.याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.आरोपी सैफच्या घरी गेला तेव्हा त्याच्याकडे चाकू आणि काही हत्यार होती.तिथून घरातून पळून गेल्यानंतर आरोपी वांद्रे येथील एका बागेत झोपला आणि कपडेही बदलले असे सूत्रांनी सांगितले.आरोपीला रविवारी पहाटे २ वाजता ठाण्यातून पोलिसांनी अटक केली.सीसीटीव्ही फुटेज व त्याने फूड स्टॉलवर ऑनलाइन पेमेंट केल्याने तो पकडला गेला असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.