“लक्षात घ्या राजकारणात सर्वांचे दिवस येतात” !! संजय राऊतांचा अमित शाह आणि एकनाथ शिंदेंना मोठा इशारा !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२५ जानेवारी २५ शनिवार
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले तर महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले मात्र महायुतीला मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हा विजय ईव्हीएमचा असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत आहे व यावरून अनेकदा आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळाले.आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाह,एकनाथ शिंदे यांना मोठा इशारा दिला असून ‘लक्षात घ्या,राजकारणात सर्वांचे दिवस बदलत असतात.कोणीही अमृत पिऊन आलेले नाही’ असे म्हणत संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना सूचक भाष्य केले आहे.“स्थानिक पातळीवर चांगले नेते आहेत.खंबीरपणे काम करणारे लोक आहेत त्यामुळे शिवसेना (ठाकरे)अनेक संकटातून पुढे गेलेली आहे.विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने एकमेकांचे काम केले नाही असे मी कधीही बोललो नाही.भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या सहकारी पक्षाला मिळालेले यश हे का मिळाले ? यावर अनेकदा चर्चा झाली.आता सध्या आमदार उत्तम जानकर या क्षणी दिल्लीत आहेत व ईव्हीएमच्या विरोधात त्यांच्याकडे मोठे पुरावे आहेत.निवडणुकीत कशा प्रकारे बूथ ताब्यात घेण्यात आले याबाबतचे पुरावे घेऊन उत्तम जानकर दिल्लीत गेले आहेत मात्र त्यांना निवडणूक आयोगाचे आयुक्त भेटत नाहीत” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी एक भूमिका घेतली आहे.मुंबईचे राजकारण वेगळे असते.आता राज्यातील प्रत्येक महापालिकेचे प्रश्न वेगवेगळे असतात.नाशिक महापालिकेबाबत स्थानिक नेत्यांनी काही निर्णय घेतला तर त्याबाबत आम्ही योग्य निर्णय घेऊ.नाशिक महापालिकेच्या निवडणुकीबाबत आम्हाला वाटले की स्वबळावर निवडणूक लढवून नाशिकमध्ये आम्ही भाजपा आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या पक्षाचा आम्ही पराभव करू शकतो तर आम्ही त्याबाबत विचार करू मात्र आम्ही अशा पद्धतीचा निर्णय अद्याप ठरवलेला नाही.आमचे नाशिकमधील स्थानिक नेते ठरवतील असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्यानिमित्त बोलतांना संजय राऊत यांनी म्हटले की,“कोणाचे आभार ? ईव्हीएमचे आभार का ? खरेतर त्यांनी चौकाचौकात ईव्हीएमच्या प्रतिकृती उभ्या करून आभार मानले पाहिजेत.एकनाथ शिंदे यांनी दोन गोष्टींचे आभार मानले पाहिजेत.निवडणुकीत वापरलेला काळा पैसा,प्रशासकीय यंत्रणा आणि ईव्हीएम कारण विधानसभेची निवडणूक ही घोटाळे करून जिंकली आहे तसेच एकनाथ शिंदे यांचा निकाल संशयास्पद आहे तसेच भाजपाचाही निकाल संशयास्पद आहे” असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.“निवडणूक आयोगाने हातमिळवणी करून आमचा पक्ष ताब्यात घेण्याचे काम त्यांनी केले.एकनाथ शिंदेंनी पक्ष स्थापन केलेला आहे का ? एकनाथ शिंदेंना पक्ष ताब्यात देण्याचे काम अमित शाह यांनी केले त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या घरात बाळासाहेब ठाकरेंचा नाही तर अमित शाह यांचा फोटो हवा व आता जे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून फिरत आहेत त्यांनी त्यांच्या देवघरात अमित शाह यांचा फोटो लावला पाहिजे कारण त्यांचे दैवत अमित शाह आहेत.पक्ष चोरण्याचे,आमच्या पक्षाचे चिन्ह चोरण्याचे आणि आमचा पक्ष शिंदेंना देण्याचे काम हे अमित शाहांनी केलेले आहे मात्र लक्षात घ्या,राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात मग अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे अमृत पिऊन आलेले नाहीत” असा इशारा संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.