Just another WordPress site

परभणी जिल्ह्यातील पाथरी राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय झाल्याने या महामार्गासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा

माजी आमदार आर.टी.देशमुख यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाची केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

परभणी:-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

परभणी जिल्ह्यातील पाथरी सोनपेठ इंजेगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ ब खड्डेमय झाल्याने या महामार्गासाठी तात्काळ निधीची तरतूद करण्यात यावी यासह तीर्थक्षेत्र गुंज येथे येणाऱ्या भावीकांना सुविधेसाठी राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील माजलगाव जि .बीड तालुक्यात येणाऱ्या गंगामसला गावा पासुन सुरुमगाव तिर्थक्षेत्र गुंज दरम्यान पुल उभारणी करत पुढे वाघाळा फाटा पर्यंत रस्ता करावा अशी मागणी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना माजी आमदार आर.टी.देशमुख यांच्या नेतृत्वात गेलेल्या शिष्टमंडळाने नागपूर भेटीदरम्यान केली आहे.नुकतेच भाजपा पदाधिकाऱ्यांचे एक शिष्ठमंडळ नागपूर येथे केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी गेले होते.यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र.५४८-ब च्या रस्ता बांधणीचे काम बीड जिल्हा हद्दीत परळी ते इंजेगांव पर्यंत पुर्ण गतीने सुरू आहे.परंतू परभणी जिल्हा हद्दी अंतर्गत इंजेगाव कॅनाल पासून पुढे सोनपेठ पाथरी दरम्यान रस्ता बांधणीसाठी निधी मंजूर नसल्याने सदरील रस्त्याचे काम सुरू झाले नसुन रस्त्यावर मोठ  मोठे खड्डे पडल्याने रस्त्यावरून गाडी चालवणे धोकादायक झाले आहे असे निदर्शनास आणून देत विद्यार्थी, महिला,जेष्ठ नागरिक यांच्यासह इतर प्रवाशांची गैरसोय होत असल्याने रस्त्याच्या विकास कामासाठी ३३० कोटी रूपये निधी उपलब्ध करून देऊन रस्त्याच्या कामास गती प्रदान करावी अशी मागणी केली आहे.

याशिवाय परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणारे श्रीक्षेत्र गुंज हे पवित्र दत्तस्थान असुन येथे लाखो लोक नियमीतपणे दर्शनासाठी येत असतात सदरील पवित्रस्थान राष्ट्रीय महामार्गाना जोडल्यास येणाऱ्या भक्तांना सुविधा होईल.त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ६१ कल्याण -निर्मळ वरील माजलगांव तालुक्यातील गंगामसला येथुन रस्त्याची सुरुवात करुन सुरुमगांव द्वारे गोदावरी नदीत पुलाचे बांधकाम करून हा रस्ता गुंज व पुढे बाभळगांव फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग ५४८-ब देवगांव फाटा-सोनपेठ परळीला जोडता येईल असे सुचविण्यात आले आहे.हा रस्ता पुढे वाघाळा पाटी येथे आष्टी-पाथरी-पोखर्णी या राज्य मार्गाला जोडल्यास श्रीक्षेत्र गुंज महत्वाच्या मार्गांवर येऊ शकेल यामुळे भक्तांचे पाथरीला वळसा घालुन येणे वाचेल व ४० कि.मी.अंतर कमी होईल.शिवाय गोदावरीतील पुला सोबत तेथेच लहान बंधाऱ्याची निर्मीती केल्यास किमान ४ हजार हेक्टर जमीन ओलीताखाली येईल व गोदाकाठच्या मच्छीमार बांधवांना मासेमारीची सोय उपलब्ध होईल असे गडकरीच्या निदर्शनास आणून दिले आहे.यावेळी शिष्ठमंडळात माजी आमदार आर.टी.देशमुख,भाजपा परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम,भाजपा उपाध्यक्ष उमेश देशमुख,सुभाष आंबट,सुशिल रेवडकर,पी.डी .पाटील,विश्वनाथ लाडाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.