सुरज सपकाळे,पोलीस नायक
पाडळसे.ता यावल (प्रतिनिधी) :-
भुसावळ-फैजपूर राज्य मार्गावरील पाडळसे ते बामणोद तसेच पाडळसे ते अकलुद दरम्यान राज्यमार्गावरील साईडपटीवर काटेरी झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असून यामुळे रस्त्यावरुन पादचारी आणि शेतकऱ्यांचे बैलगाडी व गावातील गुरेढोरे यांना रस्त्यांच्या मध्यभागातून जावे लागत आहे यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान पाडळसे गावापासून एक किलोमीटर अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र असून पाडळसे गावातील वृध्द नागरीक,महिला व बालके हे पायीच उपचार घेण्यासाठी दररोज ये-जा करतात तसेच गावातील नागरीक मॉर्निंग वॉकसाठी दररोज मार्गाचा वापर करतात.परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याने याचा परिणाम थेट ये-जा करणाऱ्यांच्या जीवाशी खेळ असल्याची प्रचिती वाहनधारकांना व पादचाऱ्यांना येत आहे.तरी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी सदर बाबींचा विचार करून त्वरित लक्ष देऊन भुसावळ-फैजपूर राज्यमार्गवरील पाडळसे ते बामणोद तसेच पाडळसे ते अकलूद मार्गालगतची काटेरी झाडे व झुडपांची साफसफाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.