मीनाक्षी पांडव
मुंबई विभागीय प्रमुख
दिवाळी विशेष लेख :-
यंदाची दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दिवाळी आली आपल्याला हमखास आठवण होते कडाक्याच्या थंडीत पहाटे तेल लावणे आणि मग उटणे लावून केलेली मस्त अंघोळ. दिवाळीत पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याची मज्जाच काही और असते. पुरातन काळापासून उटणे हे अत्यंत उत्तम सौंदर्य प्रसाधन म्हणून ओळखले जाते. आज आपण जाणून घेऊया उटणे लावण्याचे काही आरोग्यदायी फायदे ….
१) स्वच्छ त्वचा करण्यासाठी-
त्वचा स्वच्छ होण्यासाठी उटणे लावणे कधीही चांगलं. उटण्यामधील आयुर्वेदीक घटकांमुळे संसर्ग कमी होण्यास मदत होते. परिणामी अॅक्ने, पिगमेंटेशन, स्कार्स कमी होण्यास मदत होते. आठवड्यातून एकदा उटण्याचा वापर केल्याने त्वचा निरोगी होण्यास मदत होते. मात्र त्यानंतर लगेचच सूर्यप्रकाशात जाणे टाळा. याशिवाय उटण्यामध्ये चंदन पावडर मिक्स केल्यास, त्वचेवरील अधिक तेल निघून जाण्यास मदत मिळते.
२) चेहरा उजळण्यास मदत-
उटण हे एका स्क्रबरप्रमाणे काम करत असल्याने त्याचा वापर केल्यास आपला काळा पडलेला चेहरा उजळण्यास चांगलीच मदत होते. उटण्याच्याबरोबरीने बेसन पीठही लावल्यास ते फायद्याचे ठरते.
३) त्वचेसाठी उपयुक्त –
उटण्यामुळे सुरकुत्या पडण्याचे प्रमाण कमी होते. हळदीमध्ये अॅन्टी एजिंग घटक असल्याने त्याचा त्वचेला फायदा होतो. त्वचेवरील निस्तेजपणा काढून टाकून तुम्हाला अधिक तजेलदार आणि तरूण दाखविण्याचे काम हळद घातलेले उटणे करते. याशिवाय उटण्यात मध किंवा दूध लावल्यास त्याचा जास्त फायदा होतो.
४) नको असलेले केस काढून टाकण्यास मदत-
उटण्यामुळे तुमच्या शरीरावरील नको असलेले केस काढून टाकण्यास मदत मिळते. उटणे हा शरीरावरील केस काढून टाकण्यासाठी अत्यंत सौम्य, नैसर्गिक आणि सुरक्षित पद्धत आहे. उटणे लावून ते गोलाकार फिरवल्यास त्याचा केसांची वाढ थांबण्यासाठी उपयोग होतो. मात्र अशाप्रकारे उटणे चोळताना त्याचा त्वचेवर वाईट परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.