“सर्व एसटी बसेसमध्ये जीपीएस आणि सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश” !! पुण्यातील घटनेनंतर सरकारचा मोठा निर्णय
मुबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ फेब्रुवारी २५ गुरुवार
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.दरम्यान या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार असून त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.पुण्यात घडलेल्या या घटनेनंतर एसटी प्रवास करतांना महिलांच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून महिला प्रवाशांमध्येही या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अशात महिला प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात एस.टी महामंडळाची महत्त्वाची बैठक आज मंत्रालय येथे पार पडली.या बैठकीनंतर महिला प्रवशांच्या सुरक्षितेसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये सीसीटीव्ही आणि जीपीएस यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही,जीपीएस अनिवार्य !!
मंत्रालयात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले,“आमच्या सर्व लाडक्या बहिणींना परिवहन मंत्री म्हणून मी आवाहन करतो की,घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे.महाराष्ट्रात कुठेच अशी घटना घडता कामा नये.लाडक्या बहिनींना परिवहन मंत्री म्हणून माझी विनंती आहे की,तुम्ही पूर्वी ज्या पद्धतीने एसटी प्रवास करत होता तसाच तुमचा प्रवास सुरू ठेवा.प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी आम्ही आजच्या बैठकीत सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम बसवण्याचे निर्देश दिले आहेत याचबरोबर पुढील काळात एसटी बसेस आणि स्थानकांवर एआयचा वापरही करण्यात येणार आहे.”
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे !!
- सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही,जीपीएस अनिवार्य करणार
- सुरक्षा रक्षकांमध्ये महिलांची संख्या वाढवण्यावर भर दिला जाणार
- सर्व बस डेपोचे ऑडिट करण्यात येणार
- परिवहन विभागात आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय
- एसटी आगारातील भंगार वाहने १५ एप्रिल पर्यंत हटवण्यात येणार
- शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल
- बस डेपोत स्वच्छतेला प्राधान्य देणार
दरम्यान पुण्यातील बलात्कार प्रकरणातील आरोप आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे (३७) याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे व त्याला शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी १३ पथकांची स्थापना केली आहे.मंगळवारी सकाळी घडलेल्या घटनेपासून तो फरार आहे.याचबरोबर त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पीटीआयला दिली आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरणी योगेश कदम यांची महत्त्वाची माहिती, “गुन्हा घडला तेव्हा….” !!
पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आत आरोपीची ओळख पटवली व त्यानंतर त्याला ट्रॅक करण्यास सुरुवात केली आहे.पोलिसांनी आठ पथके केली आहेत व त्याचे संभाव्य लोकेशनही मिळाले आहे.मात्र तपास सुरु असल्याने मी ते देणार नाही.आरोपीला लवकरच अटक केली जाईल.एक गैरसमज तयार केला जातो आहे की घटना मंगळवारी घडली आणि बुधवारपर्यंत माहिती समोर आणली गेली नाही मात्र ही फिर्याद आल्यानंतर तातडीने पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली होती.
सदर प्रकरणाबाबत पोलिसांनी गुप्तता बाळगली होती-योगेश कदम !!
पोलिसांनी गुप्तता बाळगली होती कारण आरोपीला या गोष्टीचा तपास लागता कामा नये.आरोपी पळून जाऊ नये म्हणून गुप्तता पाळण्यात आली व ती पाळणे आवश्यक आहे.आरोपी लवकरच पकडला जाईल.पुणे शहरात जी घटना घडली आहे ती बस स्टँडच्या आवारात घडली आहे.पोलिसांनी रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत गस्त कितीवेळा घातली गेली याचीही माहिती मी घेतली आहे.पीआयही रात्री दीड वाजता गेले होते व त्यानंतर टीमसह तीन वाजताही तिथे होते.पोलीस अलर्ट नव्हते असा विषय नव्हता. आरोपीवर भुरट्या चोरीचे गुन्हे दाखल आहे मात्र ते ग्रामीण भागातल्या पोलीस ठाण्यात आहे.पुणे शहरात जे आरोपी आहेत त्यांच्याकडे पोलीस लक्ष ठेवून असतात.त्यांचे रेकॉर्ड पोलिसांकडे असते जे ग्रामीण भागातून येतात त्यांचा रेकॉर्ड नसतो.पुणे शहरात सीसीटीव्ही आणखी मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४३७ कोटींचा निधी मंजूर केला आहे आपण त्या दृष्टीनेही काम करतो आहे.
१० ते १५ लोक आवारात होते कुणालाही काही आवाज आला नाही-योगेश कदम !!
पुण्यात जी घटना घडली ती फोर्सफुली घडली किंवा स्ट्रगल झाला असे काही कळले नाही कारण १० ते १५ लोक त्या आवारात होते. त्यामुळे गु्न्हा आरोपीला करता आला असेही योगेश कदम यांनी म्हटले आहे.पोलिसांकडून कुठलीही दिरंगाई झालेली नाही.घटना घडली तेव्हा कुठलाही अलर्ट मिळाला नाही.जी खासगी सुरक्षा ठेवली जाते त्यांनी नक्कीच चुका केल्या आहेत कारण खासगी सुरक्षा रक्षक गुन्हा घडला तेव्हा तिथे नव्हते असेही योगेश कदम यांनी स्पष्ट केले आहे.