छत्रपती संभाजीनगर-पोलीस नायक(वृत्तसेवा) :-
दि.०६ मार्च २५ गुरुवार
अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आमदार मुंडे यांना आवादा कंपनीकडून खंडणी प्रकरणात सहआरोपी करण्यासाठीचा दबाव वाढला असून बीडपाठोपाठ बुधवारी धाराशिव व जालना येथे बंद पाळण्यात आला.धनंजय मुंडे यांच्या सरकारी ‘सातपुडा’ या निवासस्थानी झालेली बैठक खंडणीसाठी होती असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता.विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्वपक्षीय सरकारला जाब विचारला.परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी,जालन्याचे कैलास बोराडे तसेच लातूरमधील माऊली सोट या पीडितांना न्याय कधी मिळणार असा सवाल भुजबळ यांनी केला.
खंडणी प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली असल्याचे दोषारोपपत्र सादर करण्यात आल्याने धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे अशी मागणी करण्यात आली. यासाठी तालुका पातळीवर रास्ता रोको,टायर जाळण्याचे प्रकार झाले.जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात बंद पाळण्यात आला.संतोष देशमुख हत्या प्रकरणातील छायाचित्रे पुढे आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती.केवळ वाल्मीक कराडच नाही तर या गुन्ह्यामध्ये धनंजय मुंडे यांना पाठीशी घातले जात आहे.अजित पवार यांना सारे प्रकरण माहीत असतानाही त्यांनी मुंडे यांची एवढे दिवस पाठराखण केली त्यामुळे अजित पवार यांनीही राजीनामा द्यावा अशा प्रतिक्रियाही बंददरम्यान काही नागरिकांनी व्यक्त केल्या.आवादा कंपनीकडून खंडणी ही निवडणूक कालावधीमध्ये मागण्यात आली.आमदार सुरेश धस,जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलेले प्रश्न आता जिल्हा पातळीवर कार्यकर्ते विचारू लागले आहेत.धाराशिव जिल्ह्यातील भूम,परंडा,कळंब,तुळजापूर,उमरगा या भागात शाळा,महाविद्यालये,दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
नामदेवशास्त्रींनी भूमिका बदलली
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे असे वक्तव्य करणाऱ्या नामदेवशास्त्री यांनी त्यांची भूमिका बदलली.‘जे वक्तव्य आधी केले त्याबाबत पूर्वकल्पना आपल्याला नव्हती मात्र दुसऱ्या दिवशी धनंजय देशमुख परिवारासह भेटण्यासाठी आले.देशमुख कुटुंबीयांनी आपल्याला जाण करून दिली असून लोकांनीही गैरसमज करून घेऊ नये.गड देशमुख परिवाराच्या पाठीशी आहे. त्यांना जलदगतीने न्यायालयात न्याय मिळवून द्यावा.
जालन्यात रास्ता रोकोजाफराबाद तालुक्याच्या ठिकाणी बुधवारी बंद पाळण्यात आला.बंदला ८० टक्क्यांपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आल होते.जालना तालुक्यातील रामनगर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.सकल मराठा समाजाच्या वतीने परतूर येथील उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्या कार्यालयावर बुधवारी उपोषण करण्यात आले.