“…हा भाजपाचा छुपा अजेंडा,भाजपावाल्यांचे दाखवायचे व खायचे दात वेगळे आहेत” !! भय्याजी जोशींच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०७ मार्च २५ शुक्रवार
“मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकले पाहिजे असे काही नाही.इथे वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी भाषा बोलली जाते.जसे की मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे” असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी बुधवारी (५ मार्च) रात्री केले होते.यावर आता विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे जोशींच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया देत म्हणाले,“ही सगळी वक्तव्ये केवळ मराठी माणसाचा अपमान करण्यासाठी व मुंबई मराठी माणसापासून तोडण्यासाठी चालू आहेत व हाच भाजपाचा छुपा अजेंडा आहे.”उद्धव ठाकरे म्हणाले,“काल महायुतीच्या आमदारांना ‘छावा’ चित्रपट दाखवला जात होता आणि दुसऱ्या बाजूला संघाचे एक अण्णाजी पंत मुंबईत आले होते.मुंबईत येऊन ते मराठी विरुद्ध अमराठी असे विष कालवून गेले.छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज आता पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत मात्र महाराष्ट्रात मराठी माणसात फूट पाडणारे औरंगजेब व त्यांना मदत करणारे अण्णाजी पंत या जमान्यातही जन्माला येत आहेत यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते.काही लोक असे आहेत जे आम्हीच ब्रह्मदेवाला जन्म दिला अशा आवेशात फिरत असतात व जगाला ब्रह्मज्ञान शिकवत फिरत असतात.ते भैय्याजी जोशी काल मुंबईत घाटकोपरला आले आणि गोमुत्र शिंपडून गेले.मुंबईत राहायचे असेल तर मराठी आलीच पाहिजे अशी काही गरज नाही असे गोमूत्र शिंपडून गेले.भारतीय जनता पार्टीचा हा छुपा अजेंडा आहे.भाजपावाल्यांचे दाखवायचे व खायचे दात वेगळे आहेत अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले,“बऱ्याच दिवसांपासून या भाजपावाल्यांनी हिंदुस्थान-पाकिस्तान हा विषय काढला नाही.आता ते मराठी विरुद्ध अमराठी,मराठा विरुद्ध मराठेतर अशी फूट पाडून हे राज्य बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत.मी या जोशींना आव्हान देतो की त्यांनी असेच वक्तव्य अहमदाबादला जाऊन तिथे करून दाखवावे. तमिळनाडू,केरळ,बंगाल किंवा कर्नाटकला जाऊन अशी भाषा करून तिथून सुखरूप परत येऊन दाखवावे.मराठी माणूस सहृदयी,दयाशील आहे म्हणून कोणीही यावे आणि टपली मारून जावे हे चालणार नाही.मराठी माणूस भाजपाच्या खिजगणतीतही नाही कारण त्यांना वाटते मराठी माणूस आपल्याशिवाय कुठे जाणार आहे ?”
मुंबईचे उद्योग गुजरातला पळवले,आता गुजराती भाषा लादण्याचा प्रयत्न’,शिवसेना (ठाकरे) पक्षाची सरकारवर जोरदार टीका !!

दरम्यान मुंबईत येणाऱ्यांना मराठी भाषा समजलीच पाहिजे.किमान त्यांनी मराठी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे.मराठी माणसाला डावलून गुजराती माणसाची मते मिळविण्यासाठी मुंबईचे गुजरातीकरण केले जात आहे.सरकारने याचा निषेध करायला हवा.तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर अशा विधानांमुळे त्याला धक्का बसत आहे अशी भूमिका अनिल परब यांनी मांडली.पण सभापती राम शिंदे यांनी विरोधकांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला ज्यामुळे विरोधकांनी गोंधळ केल्यानंतर सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.विद्याविहार येथील एका नामांतराच्या कार्यक्रमात बोलताना संघाचे वरिष्ठ नेते भय्याजी जोशी म्हणाले,मुंबईची कुठलीही एक भाषा नाही,मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या भागात वेगवेगळी भाषा असते.जशी घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे त्याचप्रमाणे तुम्हाला गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील.तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील.मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकले पाहिजे असे काही नाही.दरम्यान विधानसभेतही या विषयावरून गोंधळ झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.मुंबई आणि महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठीच आहे असे ते म्हणाले.आम्ही प्रत्येक भाषेचा सन्मान करतो पण मराठीला डावलता कामा नये.जो स्वतःच्या भाषेचा सन्मान करतो त्याने इतर भाषेचाही सन्मान केलाच पाहिजे असे ते म्हणाले.