जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० मार्च २५ सोमवार
तालुक्यातील शिरागड-कोळन्हावी दरम्यान असलेल्या मानकी-भोनक नदीवर बंधारा कम पुल व्हावा या मागणीचे निवेदन केंद्रीय जलशक्तीमंत्री सि.आर.पाटील हे जळगाव दौऱ्यावर असतांना भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ.सुनिल पाटील साकळीकर यांच्या वतीने नुकतेच देण्यात आले.
दरम्यान तालुक्यातील तापी नदी किनाऱ्यावर वसलेल्या शिरागड येथे सप्तश्रुंगी देवीचे प्रसिद्ध असे पुरातन,आध्यत्मिक व पौराणिकदृष्टीने जागृत मंदिर आहे.सदर मंदिरावर कोळन्हावी तालुका यावल येथून येण्यासाठी रस्ता नाही.शिरागड व कोळन्हावी दरम्यान तापीनदीची उपनदी मानकी-भोनक आहे.या मानकी भोनक नदीवर बंधारा-कम पुल झाला तर सिंचन व दळणवळण दोन्ही दृष्टीने परिसरातील शेतकरी व नागरिकांच्या दृष्टीने हितावह राहील.ज्याप्रमाणे वणीगड (मोठागड) येथे येणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठी आहे त्याचप्रमाणे शिरागड (लहानगड ) येथे वर्षभर येणाऱ्या भाविकांची संख्या खुप मोठी आहे.आश्विन व चैत्र नवरात्रीत भाविकांची संख्या खुपच जास्त असते.जळगाव शहर व चोपडा कडून येणाऱ्या भाविकांना कोळन्हावी पर्यंत वाहनाने येऊन पुढे मानकी-भोनक नदी असल्यामुळे शिरागड (लहानगड ) पर्यंत पायी यावे लागते.तसेच तापी नदीजवळ असूनही यावल पश्चिम भागातील पाणीपातळी दिवसेंदिवस कमी होत खोल चाललेली आहे तसेच हा झोन बझाटा झोन असल्यामुळे याठिकाणी बंधारा कम पुल झाला तर यावल तालुक्याचा पश्चिम भाग सिंचनाच्या दृष्टीने सुजलाम सुफलाम होईल.तरी आपल्या जलशक्ती मंत्रालयामार्फत या शिरागड ते कोळन्हावी दरम्यान मानकी-भोनक नदीवर बंधारा कम पुल होण्यासाठी तांत्रिक दृष्टीने लवकर सर्वेक्षण होऊन बंधारा हाच पुल व्हावा अशी निवेदनाद्वारे विनंती केली असून संबंधित विषयाला अनुसरून नकाशा असल्यामुळे केंद्रीय जलशक्ती मंत्री सि.आर.पाटील यांनी तांत्रिक सर्वेक्षणसाठी ठेवू असे आश्वस्त केले असे डॉ.सुनिल पाटील यांनी सांगितले आहे.सदर निवेदनाच्या प्रती जलसंपदा मंत्री गिरीष महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील,केंद्रीय क्रीडामंत्री तथा खासदार रक्षाताई खडसे,आ.चंद्रकांत सोनवणे चोपडा,आ.अमोल जावळे यावल-रावेर यांना देण्यात आल्या आहेत.यावेळी अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.अंकुश महाराज पाटील,मनवेलकर उपस्थित होते.