याबाबत वृत्त असे की,आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पाचेरीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.चक्रभेदी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेच्या शाळेत महिला सभा झाली व या सभेत यशदाच्या प्रशिक्षक वैदेही सावंत यांनी विविध समस्यांवर महिलांना बोलते केले.गावातील तरुण शहरांकडे जात असल्याकडे काही जणींनी लक्ष वेधले तर विधवा अनिष्ट प्रथा बंद झाल्या पाहिजेत असाही मतप्रवाह समोर आला.गावात बाहेरून तज्ज्ञ डॉक्टर यावेत, शैक्षणिक सहली काढाव्यात,महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण द्यावे अशा अनेक सूचना समोर आल्या व यावर मार्ग काढण्याचे निश्चित करण्यात आले.मात्र गावात दिल्या जाणाऱ्या शिव्या ही चिंतेची बाब असल्याचा मुद्दा काही महिलांनी मांडला.विशेषत: आई किंवा बहिणीवरून सर्रास दिल्या जाणाऱ्या शिव्यांमुळे महिलांचा अपमान होत असल्याचे काही जणांनी अधोरेखित केले व त्यानंतर गावात कुणीही शिवी देऊ नये आणि दिल्यास त्याला ५०० रुपयांचा दंड आकारला जावा असा ठराव करण्यात आला आणि तो गावचे प्रशासक,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक यांच्या पाठिंब्यासह एकमताने मंजूर करण्यात आला.आता या गावाचा आदर्श समोर ठेवून केवळ कोकणच नव्हे तर राज्यातील प्रत्येक गाव शिवीमुक्त व्हावे अशी अपेक्षा चक्रभेदी फाऊंडेशनकडून व्यक्त करण्यात आली आहे.
अपमान टाळण्यासाठी… !!
●खरेतर आपल्या भावनांना मोकळी वाट मिळते असे सांगत काही जण शिव्या देण्याचे समर्थन करतात.
●मात्र यामुळे समोरच्याचा पाणउतारा होतोच शिवाय अनेकदा महिलांचाही अनाहुतपणे अपमान केला जातो.
●हे टाळायचे असेल तर शिवीमुक्त गाव ही संकल्पना अमलात आणली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.