मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१९ मार्च २५ बुधवार

लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गेल्या वर्षी राज्यातील महायुती सरकारने महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणली व या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला.महायुतीने राज्यात प्रचंड बहुमताने विजय मिळवला.सुरुवातीच्या टप्प्यात या योजनेसाठी काही मोजक्या दस्तावेजांसह ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले व त्यातील बहुसंख्य महिलांना योजनेचा लाभ दिला जात होता.मात्र आता केवळ गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.सध्या महाराष्ट्रातील २ कोटी ८० लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे व अलीकडेच सरकारने या योजनेतील पाच लाख महिलांना अपात्र ठरवले आहे.तत्पूर्ही हजारो महिलांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.ज्या महिलांच्या कुटुंबांची आर्थिक स्थिती उत्तम आहे आणि त्या जर या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांनी स्वतःहून अर्ज मागे घ्यावेत असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले होते व त्यानंतर हजारो महिलांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत तसेच ज्या महिलांनी निकषांची पूर्तता केली नसेल त्यांचे अर्ज बाद ठरवले जात आहेत.

दरम्यान आता केवळ गरजू महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ समाजातील गरीब घटकांतील महिलांसाठी आहे व या योजनेचा काही अपात्र महिलांनीही लाभ घेतला तसेच त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत मात्र गरजू महिलांनाच लाभ देण्यासाठी योजनेत सुधारणा करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत.मात्र ही योजना गरीब महिलांसाठीच असल्याने त्यात दुरुस्ती करणार असल्याचे सांगत अजित पवार यांनी या योजनेच्या अटी कठोर करण्याचे संकेत दिले.अजित पवार म्हणाले,“एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात सुरू झालेल्या कोणत्याही योजना बंद झालेल्या नाहीत.कोणत्याही सरकारच्या काळात सर्वच योजनांचे वेळोवेळी पुनर्विलोकन होत असते.ज्या योजना कालबाह्य ठरतात त्या बंद कराव्या लागतात.करोना काळात आपण काही योजना,सवलती सुरू केल्या होत्या मात्र करोना संपल्यावर,लॉकडाऊन उठवल्यानंतर आपल्याला त्या योजना बंद कराव्या लागल्या.योजनेची द्विरुक्ती नको आणि राज्याचा खर्च वाचावा म्हणून अशा योजना बंद करण्यात काहीही गैर नाही.”

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याऱ्या सरसकट सर्वच महिलांच्या अर्जांची छाननी होणार नसल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते मात्र आता अजित पवारांच्या घोषणेनंतर स्पष्ट झाले आहे की केवळ गरजू महिलांना लाभ द्यायचा असेल तर सर्व अर्जांची पडताळणी होईल.सर्व निकष पूर्ण केले आहेत की नाही याची तपासणी केली जाईल तसेच काही नवे नियम,अटी,शर्थी लागू करणार का याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.निवडणुकीच्या तोंडावर ही योजना लागू करत असतांना काही माफक अटींसह २१ वर्षे ते ६५ वर्षांपर्यंत वय असलेल्या सर्व महिलांना सरसकट या योजनेचा लाभ दिला जात होता.निवडणूक जिंकल्यानंतर महायुती सरकारने ज्या महिलांविरोधात तक्रार प्राप्त होईल त्या महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू केली मात्र आता सरसकट सर्वच अर्जांची पडताळणी होऊ शकते.

२१०० रुपयांसाठी प्रतीक्षा करावी लागणार !!

निवडणुकीआधी महायुती सरकारने राज्यातील महिलांना आश्वासन दिले होते की राज्यात पुन्हा एकदा आमचे सरकार आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम १५०० रुपयांवरून वाढवून २१०० रुपये करू मात्र याबाबत अद्याप सरकारमधील कोणत्याही नेत्याने अवाक्षर काढलेले नाही.उलट मूळ लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यावर भर दिला जात आहे.विधानसभेत अजित पवार यांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजनेच्या अनुदानात लगेचच २१०० रुपयांपर्यंत वाढ केली जाणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना तूर्त तरी २१०० रुपयांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे ते स्पष्ट झाले आहे.