Just another WordPress site

नऊ महिने अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स अंतराळातून पृथ्वीवर परतल्या !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१९ मार्च २५ बुधवार

तब्बल नऊ महिने अंतराळात अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अखेर पृथ्वीवर परत आले आहेत.भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ नासाचे हे दोन्ही अंतराळवीर सुरक्षितपणे खाली उतरले.याबरोबरच मुळात आठ दिवसांसाठी नियोजित असणारी ही मोहिम नऊ महिन्यानंतर संपुष्टात आली आहे.दरम्यान नासाने अंतराळवीर जमीनीवर उतरले त्या क्षणाचा व्हिडीओ शेअर केला आहे.सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे स्पेसएक्स कॅप्सूल आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनहून निघाल्यानंतर काही तासांतच बुधवारी सकाळी गल्फ ऑफ मेक्सिको येथे उतरले.फ्लोरिडातील तल्लाहसीच्या किनाऱ्याजवळ हे कॅप्सूल उतरले.जगभरातून अनेकांच्या नजरा या अंतराळवीरांच्या परतीच्या प्रवासाकडे लागल्या होत्या.

नासाचे हे दोन्ही अंतराळवीर सुरूवातीला अवघ्या एक आठवड्याच्या कालावधीसाठी अंतराळात गेले होते पण बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातील तांत्रिक अडचणींमुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा मुक्काम वाढला होता व त्यानंतर आता स्पेसएक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूलच्या माध्यमातून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी त्यांच्या परतीचा प्रवास पूर्ण केला आहे.रविवारी ‘आयएसएस’मध्ये पोहोचलेल्या १० व्या चमूकडे सुनीता आणि बुच यांच्या नवव्या चमूने सूत्रे सोपविल्यानंतर दोघांच्याही परतीच्या प्रवासाची तयारी सुरू झाली होती.‘नासा’ आणि ‘स्पेस एक्स’च्या तंत्रज्ञांची बैठक होऊन फ्लोरिडामधील वातावरणाचा अंदाज घेण्यात आल्यानंतर परतीचा प्रवास एक दिवस आधीच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सुनी विल्यम्स,बुच विल्मोर यांच्याबरोबर अंतराळवीर निक हेग,अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे देखील पृथ्वीवर परतले असल्याची माहिती नासाने दिली आहे तर विल्यम्स आणि विल्मोर यांनी ऐकूण २८६ दिवस अंतराळात घालवले आहेत म्हणजेच एकूण नियोजित दिवसांपेक्षा २७८ दिवस जास्त काळ त्यांना अंतराळात राहावे लागले व या लांबलेल्या मोहिमेदरम्यान त्यांनी ४५७६ वेळी पृथ्वीला फेरी मारली आणि पृथ्वीवर सुरक्षितपणे परतण्याआधी जवळपास १९५ दशलक्ष किलोमीटर प्रवास केला

               सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या पण ४५ दिवसांच्या रिहॅबिलिटेशनमध्ये राहावे लागणार !!

sunita williams butch willmore return marathi news (1)
                         सुनीता विल्यम्स व बुच विलमोर अखेर पृथ्वीवर परतले (फोटो -रॉयटर्स)

नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बुच विलमोर हे अखेर पृथ्वीवर परतले आहेत.अवघ्या ८ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station वर गेलेल्या सुनीता विल्यम्स व बुच विलमोर हे तांत्रिक अडचणींमुळे तिथेच अडकले.तब्बल २८६ दिवसांनंतर ते पृथ्वीवर परतले आहेत.पण असे असले तरी या काळात संपूर्णपणे वेगळ्या वातावरणात राहिल्यामुळे त्यांच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी त्यांना ४५ दिवसांच्या ‘अॅक्लमेटायझेशन प्रोग्राम’मध्ये राहावे लागणार आहे !.

पृथ्वीवर परतले पण ४५ दिवस थांबावे लागले !

सुनीता विल्यम्स व बुच विलमोर हे पृथ्वीवर जरी परतले असले तरी त्यांना लगेच पूर्वीसारखे सामान्य आयुष्य जगता येणार नाही व त्यासाठी त्या दोघांनाही किमान ४५ दिवस वाट पाहावी लागणार आहे.इतक्या मोठ्या काळासाठी पूर्णपणे वेगळ्या वातावरणात वास्तव्य केल्यामुळे या दोन्ही अंतराळवीरांच्या शरीरात झालेले बदल,त्यांच्या शरीराची झालेली झीज किंवा त्यांच्या शरीराने अंतराळ स्थानकातील वातावरणाशी जुळवून घेतल्याने बदललेल्या गोष्टी या सर्व बाबी पूर्वपदावर येण्यासाठी हा काळ त्यांनी नियोजित उपचार घेणे आवश्यक असेल.

काय आहे हा ‘अॅक्लमेटायझेशन प्रोग्राम’?

साधारणपणे ४५ दिवसांचा काळ सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांना ‘अॅक्लमेटायझेशन प्रोग्राम’ अंतर्गत दिवसाचे दोन तास असे आठवड्याचे सातही दिवस आणि पुढे अशाच नियोजनात एकूण ४५ दिवस तज्ज्ञांच्या देखरेखीखाली योग्य ते उपचार घ्यावे लागणार आहेत.या काळामध्ये या दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवरचे वातावरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल व त्यामुळे प्रभावित होणाऱ्या त्यांच्या शरीरातील क्रिया यासंदर्भात सामान्य परिस्थितीत येण्यासाठी मदत केली जाईल व या ‘अॅक्लमेटायझेशन प्रोग्राम’चे साधारणपणे तीन टप्पे असतील.सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांच्या चाचण्यांच्या निष्कर्षांवर आधारित या प्रत्येक टप्प्यातील बाबी या दोघांसाठी वेगवेगळ्या प्रकारे ठरवल्या जातील.

पहिला टप्पा – या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांना चालणे-फिरणे,शारिरीक लवचिकता आणि स्नायू बळकट करणे यासंदर्भात उपचार दिले जातील.

दुसरा टप्पा-या टप्प्यात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची जाणीव,त्यानुसार शारिरीक क्रियांमध्ये आवश्यक ते बदल,शरीराची जाणीव,आसपासच्या परिस्थितीची जाणीव यांचा समावेश होतो.

तिसरा टप्पा-हा या कार्यक्रमाचा सर्वात अधिक काळ चालणारा टप्पा असेल.या टप्प्यात सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांच्या शारिरीक कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला जाईल.

सुनीता विल्यम्स यांच्या नावे ‘स्पेसवॉक’ विक्रम !!

सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांनी त्यांच्या २८६ दिवसांच्या अंतराळ वास्तव्यात एकूण १२ कोटी १३ लाख ४७ हजार ४९१ मैल प्रवास केला व पृथ्वीभोवती ४ हजार ५७६ फेऱ्या मारल्या.या मोहिमेत सुनीता विल्यम्स यांनी सर्वाधिक काळ स्पेसवॉक करणारी महिला ठरल्याचा विक्रम नावावर केला आहे.सुनीता विल्यम्स यांनी या मोहिमेत एकूण ६२ तास ६ मिनिटे अंतराळ स्थानकाबाहेर स्पेसवॉक केला आहे परिणामी एकूण सर्वाधिक काळ स्पेसवॉक केलेल्या अंतराळवीरांच्या यादीत त्या चौथ्या स्थानी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.