सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२१ मार्च २५ शुक्रवार

नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले जन्म व मृत्यू दाखले आता टपालाने घरपोच देण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध केली असून या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे काल गुरुवारी केले आहे.

दरम्यान जन्म व मृत्यू दाखले हे नागरिकांना आवश्यक असे दस्तऐवज असून वेळेत आणि घरी मिळणे आवश्यक आहे.ही बाब लक्षात घेऊन शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत जन्म व मृत्यू दाखले पोस्टाद्वारे घरपोच नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने उपक्रम हाती घेतला आहे.सदर दाखला मिळवण्यासाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावून मागणी नोंदवावी लागणार आहे व यानंतर आवश्यक शुल्क ऑनलाईन भरल्यानंतर दाखला तयार झाल्यावर घरपोच होणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.या स्तुत्य निर्णयाचे सांगली शहर वासियांकडून स्वागत करण्यात येत असून हाच पायंडा संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपालिका,महानगर पालिका क्षेत्रात राबविण्यात यावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.