पश्चिम बंगाल-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ मार्च २५ शनिवार
पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार दिलीप घोष यांचा शुक्रवारी खडगपूरमधील एका रस्त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी संयम सुटल्याचे पाहायला मिळाले.दिलीप घोष यांच्या विरोधात तेथील स्थानिक महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले मात्र यावेळी उत्तर देतांना दिलीप घोष यांनी थेट धमकी देत वादग्रस्त टिप्पणी केली असून त्यामुळे यावरून आता पश्चिम बंगालमध्ये चांगलेच राजकारण तापले आहे.दिलीप घोष हे त्यांच्या मतदारसंघात एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी काल शुक्रवारी गेले होते व यावेळी तेथील काही महिलांनी आमच्या भागात काहीही विकासकामे होत नसल्याचा सवाल केला तसेच खासदार असतांना तुम्ही एकदाही या भागात फिरकला देखील नाहीत असा जाब विचारला.यावेळी भाजपाच्या काही कार्यकर्त्यांसह दिलीप घोष यांनी उत्तर दिले मात्र महिला आंदोलक आणि दिलीप घोष यांच्यात जोरदार शाब्दीक बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.यावेळी संतप्त झालेल्या दिलीप घोष यांनी महिला आंदोलकांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“ओरडू नकोस,नाहीतर मी तुझा गळा दाबून टाकीन”,असे विधान भाजपा नेते दिलीप घोष यांनी केल्याचा आरोप करण्यात आला असून या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिले आहे.काही महिला आंदोलकांनी विचारले की,महापालिकेने रस्ता बांधला आहे मात्र तरीही भारतीय जनता पक्षाचे नेते या उद्घाटनासाठी का आले आहेत ? त्यावर दिलीप घोष यांनी उत्तर दिले की,“मी यासाठी पैसे दिले आहेत.ते तुमच्या वडिलांचे पैसे नाहीत.प्रदीप सरकार (स्थानिक तिरनामूल नगरसेवक) यांना याबद्दल विचारा”, असे म्हटले.दिलीप घोष यांच्या या विधानावर एका महिलेने आक्षेप घेतला आणि विचारले की,“आमच्या वडिलांना का विचारायचे ? तुम्ही खासदार होता ना ?” या सवालावर पुन्हा दिलीप घोष यांनी म्हटले की,“मी तुमच्या चौदा पिढ्यांचं पालनपोषण करीन!” दरम्यान दिलीप घोष यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आणि भाजपा कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर महिला आंदोलकांनी दिलीप घोष यांच्या गाडीला घेराव घातला.त्यानंतर दिलीप घोष यांनी माध्यमांशी बोलतांना दावा केला की,आंदोलक हे तृणमूल काँग्रेसचे समर्थक होते व त्यांनी हा निषेध केलेला नाही तर हे ५०० रुपयांसाठी भुंकणारे संधीसाधू आहेत ते भुंकतात.दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी दिलीप घोष यांच्या या कृतीचा निषेध केला आणि रस्त्याचे काम पालिकेने केल्याचे पुन्हा सांगितले आहे.