“मी खरे सांगितले असते तर आमचे सरकारच आले नसते” !! लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचे वक्तव्य अनेकांच्या भुवया उंचावणारे !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ मार्च २५ शनिवार
लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण येत आहे अशी ओरड अधूनमधून होत असून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनीही याबद्दलची खदखद काही दिवसांपूर्वी व्यक्त केली आहे.अर्थमंत्री अजित पवार हे आर्थिक शिस्तीबाबत काटेकोरपणे निर्णय घेत असतात.नुकतीच त्यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला मुलाखत दिली.यावेळी त्यांना लाडकी बहीण योजनेबाबत तुम्ही सहकाऱ्यांना सावधान केले नव्हते का ? असा प्रश्न विचारण्यात आला यावर अजित पवार यांनी दिलेले उत्तर अनेकांच्या भुवया उंचावणारे आहे.महायुती सरकारमध्ये अर्थसंकल्प सादर करण्याचा सर्वाधिक अनुभव सध्या अजित पवार यांच्याकडे आहे.लाडकी बहीण योजना जेव्हा लागू करण्यात आली तेव्हा पैशांचे सोंग आपल्याला करता येणार नाही हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना सांगितले होते का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.यावर अजित पवार म्हणाले की,मी जर त्यावेळी खरे सांगितले असते तर आम्ही परत आलोच नसतो.सरकार कसे येईल,हे बघणे महत्त्वाचे असते असे अजित पवार यांनी म्हटले आहे.