Just another WordPress site

श्रीक्षेत्र डोंगरदा येथे रंगला २८ वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२३ मार्च २५ रविवार

तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी पाडा असलेल्या श्रीक्षेत्र डोंगरदा येथे दि.२२ मार्च शनिवार रोजी डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय येथील १९९६-९७ बॅचेसच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा तब्बल २८ वर्षांनी एकत्र येत मोठया उत्साहात आयोजित करण्यात आला.यावेळी श्रीक्षेत्र डोंगरदा येथील आदिवासी पाड्यावरील आदिवासी मुला-मुलींना बिस्किट नाश्ता वाटप,स्नेहभोजन,स्वतः बद्दलची ओळख व गप्पा-सप्पा तसेच गाणी म्हणून शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.गेल्या २८ वर्षांनी सर्व विद्यार्थी मित्र एकत्र आल्यामुळे काहीसे वातावरण भावनिक झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

दरम्यान डोंगर कठोरा (ता.यावल) येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय येथील १९९६-९७ च्या बॅचेसचे विद्यार्थी विद्यार्थिंनी मुख्याध्यापक नितीन झांबरे,उपशिक्षक पी.पी.कुयटे,एन.व्ही.वळींकार,सोनाली फेगडे,मनीषा तडवी,शुभांगीनी नारखेडे यांना आपला परिचय देऊन सर्व शिक्षकांचे आशिर्वाद घेतले.कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीक्षेत्र डोंगरदा येथे सन १९९६-९७ च्या बॅचमधील मयत शिक्षकवृंद यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व नंतर विद्यार्थी-विद्यार्थिनींचा परिचय करून देण्यात आला.सदर परिचय करून देतांना सद्या करीत असलेले काम,व्यवसाय वा नोकरी याबाबत माहिती देऊन आपल्या शालेय जीवनाला उजाळा देण्यात आला.प्रसंगी डॉ.चंदन राणे यांनी आपल्या बालपणाकडे डोकावत आपल्या मधुर आवाजातील गाण्यातून सर्व मित्रमंडळींचे मनोरंजन केले.तसेच डोंगरदे येथील आनंदवन दत्त मंदिर ट्रस्टचे संत महाराज श्री.स्वरूपानंद महाराज यांनी शालेय जीवनातील अनुभव आणि आज रोजीचा अनुभव यातील फरक समजावून सांगितला.यावेळी स्वरूपानंद महाराज यांनी त्यांच्या स्वतःच्या शालेय जीवनातील अनुभव सांगितला व आपण विद्यार्थी-विद्यार्थिनींचा ऐक व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्या माध्यमातून कोणाच्या काही अडचणी असल्यास त्या सर्वांनी मिळून सहकार्य करायला पाहिजे असे मार्गदर्शन केले.यावेळी गाण्यांच्या भेंड्या,संगीत खुर्ची,नाव जिंकणे असे खेळ खेळून आनंदोत्सवाच्या वातावरणात स्नेहमिलन सोहळा साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रम यशस्वितेकरिता तुषार पाटील,लीना राणे,नयनश्री पाटील,शुभांगी पाटील,श्रीकांत झांबरे,श्रीकांत भिरुड,युवराज भिरुड,अशोक तायडे,राजेंद्र पारधे,प्रसाद
आढाळे,सुरेश सपकाळे,महेश भिरूड,गणेश दांडगे,गणेश जावळे,शारदा बाविस्कर,कांचन भिरुड,बिस्मिल्ला तडवी,किताब तडवी,रमजान तडवी,शेेखलाल तडवी,जुम्मा तडवी,सरवर तडवी आदींचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश गुरव यांनी केले तर आभार कृषी अधिकारी जळगाव श्रीकांत झांबरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर खान्देश व विशेष करून यावल तालुक्यातील प्रसिद्ध वांग्याची भाजी,वरण आणि भाजलेली लोळगे,आमसुलची कढी व भात असा जेवणाचा मनसोक्त आनंद लुटण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.