मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीत जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे विजयी झाले असून खासदार शशी थरूर यांचा त्यांनी पराभव केला यामुळे तब्बल २४ वर्षांनंतर काँग्रेसला बिगर गांधी घराण्यातील अध्यक्ष मिळाला आहे.यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाष्य करत काँग्रेस पुढील आव्हानांबाबत बोलले आहेत तसेच आता गांधी कुटुंबियांवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांचे डोळे आता तरी उघडावेत असा टोला विरोधकांना लगावला आहे.दि.१७ ऑक्टोबरला हे मतदान झाले होते तर दि.१९ रोजी मतमोजणी होऊन अपेक्षेनुसार काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड झाली आहे.खर्गे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरूर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे.खर्गे यांच्याआधी राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष होते मात्र त्यांनी अध्यक्षपदी राहण्यास असमर्थता दर्शविल्याने सोनिया गांधीच हंगामी अध्यक्षा म्हणून पक्षाची धुरा सांभाळत होत्या.२०१४ मध्ये प्रथमच काँग्रेस पक्षाला देशपातळीवर मोठा तडाखा बसला. नंतरच्या काळात काही राज्यांत काँग्रेसची सरकारे आलीही पण राष्ट्रीय आणि संघटनात्मक पातळीवर पक्षाची स्थिती नाजूकच राहिली.सोनिया गांधी,राहुल गांधी यांचा कल खर्गे यांच्याकडेच होता म्हणूनच ते निवडून आले असा एक ‘नरेटीव्ह’ पसरविला गेला असला तरी खर्गे यांची गांधी कुटुंबाशी जवळीक हा गुन्हा कसा ठरू शकतो?असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांच्या रूपाने बिगर गांधी कुटुंबाचा सदस्य काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झाला आहे.काँग्रेस पक्षावर एरवी हुकूमशाहीचा आणि गांधी कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या मंडळींचे डोळे निदान आता तरी उघडावेत.काँग्रेस हा १३७ वर्षे जुना राष्ट्रीय पक्ष आहे. देशभरात आजही त्याची पाळेमुळे रुजलेली आहेत.तो आज कमकुवत असला तरी त्याची ‘शक्तिस्थळे’ शाबूत आहेत खर्गे यांना ती अधिक मजबूत करावी लागतील.सध्याच्या राजकीय परिस्थितीत विरोधकांच्या एकजुटीची वज्रमूठ आणखी पक्की होईल असे पाहावे लागेल.
सोनिया गांधी यांच्यासारख्या कणखर पक्षनेतृत्वाचे मार्गदर्शन राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला मिळालेल्या मोठय़ा प्रतिसादाने काँग्रेस पक्षाचे देशभरातील कार्यकर्ते,समाजाच्या सर्व स्तरांतील काँग्रेसचे परंपरागत मतदार,हितचिंतक यांच्यात वाढलेला उत्साह त्यांच्यात निर्माण झालेला विश्वास ही शिदोरी खर्गे यांना आवाहने पेलण्याचे बळ देईल.प्रदीर्घ काळ देशाची राजशकट सांभाळलेल्या काँग्रेस पक्षासाठी सध्याचा काळ संघर्षाचा आणि आव्हानांचा आहे अशा वेळी आयुष्यात अनेक संघर्ष करावे लागलेले मल्लिकार्जुन खर्गे आता त्या पक्षाचे अध्यक्ष झाले आहेत.ही आव्हाने पेलून पक्षाला नवसंजीवनी देण्यात खर्गे कितपत यशस्वी होतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल असे शिवसेनेने म्हटले आहे.