“आगामी सण उत्सव शांततेत व सामाजिक सलोखा जपून साजरे करण्यासोबत सोशल मीडियाचा जबाबदारीपूर्वक वापर करा !! रामेश्वर मोताळे यांचे आवाहन
सुरज सपकाळे,पोलीस नायक
पाडळसा,यावल (प्रतिनिधी) :-
आगामी येणारे सण उत्सवच्या निमित्ताने तालुक्यातील फैजपूर येथील शुभ दिव्य मंगल कार्यालयामध्ये शांतता कमिटीची मीटिंग नुकतीच घेण्यात आली.यावेळी फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी आगामी सण उत्सव शांततेत व सामाजिक सलोखा जपून साजरे करण्यात यावे तसेच सोशल मीडिया जबाबदारी पूर्वक वापरण्यात यावा असे आवाहन केले आहे.सदर बैठकीला फैजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व गावचे पोलीस पाटील,प्रतिष्ठित व्यक्ती व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा संवादाचा प्रभावी माध्यम बनला असून याचा उपयोग समाज घडवण्यासाठी व्हावा.काही वेळा सोशल मीडिया द्वारे अफवा व खोट्या बातम्या किंवा द्वेष पूर्ण पोस्टद्वारे दोन जाती धर्मांमध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.तरी आपण सर्वांनी जबाबदारीने वागून अशा गोष्टीला थांबवले पाहिजे व खरे खोटे याची पडताळणी करूनच किंवा कोणतीही माहिती फॉरवर्ड करण्यापूर्वी तिची सत्यता तपासूनच पुढे पाठवा.जेणे करून द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट टाळा तसेच अशा पोस्टवर प्रतिक्रिया देऊ नका किंवा त्यांचा प्रसार करू नका.सामाजिक एकता वाढविण्याकरिता सामाजिक ऐक्य वाढवणाऱ्या आणि सकारात्मक संदेशांचाच प्रसार करा.आपण जर जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर केला तर समाजात सलोखा आणि शांतता टिकू शकते.परिणामी आपली जबाबदारी ओळखून समाज जोडणारे हात बनवूया असे भावनिक आवाहन फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले.या बैठकीला शहरातील नगरसेवक,सर्व पक्षाचे पदाधिकारी,परिसरातील पोलीस पाटील व पत्रकार बांधव उपस्थित होते.