दहिगाव शिवारात बिबट्याचे लाईव्ह दर्शन !! ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण !!
माजी पंचायत समिती सदस्य शेखर सोपान पाटील यांनी टिपले बिबट्याचे आखोदेखी छायाचित्र !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ मार्च २५ मंगळवार
तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या दहिगाव,जामुनझिरा,सावखेडासिम व मोहराळा शिवारात बिबट्याचे लाईव्ह दर्शन झाल्यामुळे सदरील बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.परिणामी वन विभागाने तात्काळ बिबट्याला पकडण्याची मोहीम राबवून सदर बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांनी केली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की,तालुक्यातील दहिगाव पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या दहिगाव शेत शिवारात काल रात्री सात वाजेच्या सुमारास बिबट्या आढळून आल्याचे आखोदेखी छायाचित्र माजी पंचायत समिती सदस्य शेखर सोपान पाटील यांनी टिपले आहे व याबाबत त्यांनी तत्काळ वन विभागाला माहिती पुरवली आहे.दरम्यान दि.२३ रोजी रात्री सात वाजता स्कुटी घेऊन शेखर पाटील हे त्यांच्या शेतात जाण्याच्या तयारीत होते व त्यातच त्यांना दहिगाव शिवारात बाबुराव नामदेव महाजन यांचे शेताजवळ रस्त्यावर बिबट्या स्कुटीच्या लाईटामध्ये चमकला.शेखर पाटील यांनी मोठ्या हुशारीने लांब जाऊन व मोबाईल झूम करून बिबट्याचे समोरून छायाचित्र काढले आणि तत्काळ वन विभागाला याबाबतची माहिती दिली.परिणामी रात्रपाळी करणाऱ्यां शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असल्याने शेतात ओलिताच्या पिकांना पाणी भरायचे किंवा नाही ही धास्ती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.सध्या मका,कांदा व भुईमूग काढण्याची कामे सुरू असून शेतात जायला मजूर तयार होत नसल्यामुळे शेतकरी हैराण झालेले आहेत.परिणामी शेतकऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात टाकून शेतात जावे लागत आहे.तरी या गंभीर बाबीकडे वनविभागाने तत्काळ उपाययोजना करून सदर बिबट्याला जेरबंद करण्यात यावे अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे.
दरम्यान दि.२२ रोजी रात्री मोहराळा शिवारात स्मशानभूमी लगत बिबट्या आढळून आला होता तत्पूर्वी जामुनजीरा शिवारात जातील नदीवर आणि पंकज महाजन यांचे शेताच्या बांधावर बिबट्याचा वावर आढळून आला होता.परिणामी या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरु असल्याचे निष्पन्न होत असल्याने वन विभागाने तात्काळ उपाययोजना करून सदरील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात यावी अशी आग्रही मागणी शेतकरी व गावकरी वर्गातून केली जात आहे.