सुरज सपकाळे,पोलीस नायक
पाडळसे,ता.यावल (प्रतिनिधी) :-
दि.२७ मार्च २५ गुरुवार
तालुक्यातील पाडळसे येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा एकदा संप पुकारला असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या विविध कामांवर याचा विपरीत परिणाम होत असून ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान दरवर्षी हे कर्मचारी संप करत असले तरीही संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांच्या पगाराचे नियोजन केले जात नाही.परिणामी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही आणि ग्रामस्थांच्या गरजेच्या कामांवरही मोठा परिणाम होतो.विशेष म्हणजे संपावर असतांनाही काही कर्मचारी वसुलीचे काम सुरूच ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.
गावाची सुरक्षा धोक्यात !!
दरम्यान ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी वित्त आयोगाच्या निधीतून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बंद अवस्थेत असून हे कॅमेरे कार्यरत नसल्याने गावाच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.चोरी,गैरप्रकार यांसारख्या घटनांवर नजर ठेवणे कठीण झाले असून ग्रामस्थांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे.
ग्रामस्थांचा संताप व प्रशासनास इशारा
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित उपाययोजना करून कर्मचाऱ्यांचे पगार आणि सुरक्षा व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी केली जात आहे.प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.