Just another WordPress site

साकळी येथील प्रकाश जैन यांचा केरळ रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२७ मार्च २५ गुरुवार

तालुक्यातील साकळी येथील प्रगतीशिल शेतकरी प्रकाश गणेशमल जैन वय-६५ हे आपल्या कुटुंबासह केरळ राज्यात फिरायला गेले असता प्रवासा दरम्यान रेल्वेतून पडून त्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.सदर घटना दि.२३ रोजी मध्यरात्री घडली असून या घटनेने गावात सर्वत्र एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान ते आपल्या कुटुंबासह सध्या जळगाव येथे मुक्ताईनगर भागात स्थायिक झालेले होते.

या घटनेबाबत त्यांच्या कुटुंबियांकडून समजलेली माहिती अशी की,तालुक्यातील साकळी येथील रहिवासी प्रकाश गणेशमल जैन हे गेल्या काही वर्षांपासून आपल्या कुटुंबासह जळगाव येथे स्थायिक झालेले असून ते आपल्या वयाचा विचार न करता अगदी तरुणाईच्या उत्साहाप्रमाणे मुलाच्या औषध विक्रीच्या व्यवसायास खूप मोठी मदत करत होते.दरम्यान प्रकाश जैन हे त्यांच्या मुलगा,सून,नातवंडे तसेच जळगाव मधील एका मित्राचे कुटुंब असे सर्व मिळून केरळ राज्यात फिरायला गेलेले होते.दि.२१ मार्च २०२५ रोजी रात्री भुसावळ येथून मंगला सुपरफास्ट एक्सप्रेसने केरळकडे रवाना झाले.प्रकाश जैन व त्यांचे कुटुंब हे सर्व अगदी आनंदात प्रवासाचा आनंद घेत प्रवास करीत होते.दरम्यान त्यांचा दिड दिवसाचा प्रवास जवळपास झालेला होता व‌ काही तासातच ते नियोजित ठिकाणी पोहचणार होते व त्याआधीच पुढील प्रवासात आपल्या कुटुंबात खूप मोठी दुर्दैवी घटना घडेल असे त्या जैन कुटुंबाने स्वप्नातही विचार केला नसेल एवढी मोठी दुर्दैवी घटना त्या कुटुंबात घडली.रेल्वे प्रवासादरम्यान दि.२३ मार्च २५ रोजी मध्यरात्री सुमारे एक ते दीड वाजता आपला नातू चि.पार्श याच्याशी गप्पागोष्टी करून आपला मोबाईल त्याच्याजवळ दिला व लघुशंखेच्या निमित्ताने प्रकाश जैन हे रेल्वे बोगीतील शौचालयाकडे गेले असता पुढील येणारे स्टेशन किती दूर आहे ? हे पाहण्यासाठी दाराजवळ गेले असता त्यांचा अचानकपणे तोल जाऊन ते रेल्वेतून खाली पडले.गाडीतील इतर प्रवाशाने पडल्यानंतर आरडाओरड केली व लागलीच त्यांचा मुलगा स्वप्निल जैन याने रेल्वे थांबवण्यासाठी चैन ओढली व गाडी थांबताच तात्काळ खाली उतरून जवळपास दोन किलोमीटर मागच्या दिशेने अनवाणी पळत जाऊन घटनास्थळी वडिलांना पाहण्यासाठी गेले त्यांच्यासोबत मित्रही होता.

दरम्यान घटनास्थळावर प्रकाश जैन हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते व त्यांच्या पोटाला रुळावरील लोखंडी पाईप लागून मोठी खोलवर जखम झालेली होती त्यामुळे खूप मोठा रक्तश्रावही झालेला होता तसेच नाकातुन रक्तस्राव झालेला होता.सदर दुदैवी घटना बैकुल पोलीस स्टेशनच्या हद्दीत कासारगड-निलेश्वरी रेल्वे स्टेशन दरम्यान घडली.लागलीच त्यांचा नातू पार्श जैन हा रेल्वे पोलीसांना घेवून घटनास्थळी पोचला.रेल्वेत असलेली त्यांची सुन सपना जैन व सोबत असलेले सर्व पुढील स्टेशनवर उतरले व तिकडने येणाऱ्या रेल्वेने घटनास्थळी पोचले.गंभीर जखमी अवस्थेतील प्रकाश जैन यांना तेथील स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने कासारगड येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.शवाविच्छेदनानंतर मयत प्रकाश जैन यांचे शव शववाहिकेने जळगाव येथे आणण्यात येऊन त्यांच्यावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.जळगाव पासून जवळपास १२०० किलोमीटर अंतरावर ही घटना घडलेली होती.मयत प्रकाश जैन हे साकळी येथील सुपरिचित असे प्रगतीशील शेतकरी होते.सार्वजनिक जीवनातही त्यांचा सहभाग होता व ते साकळीच्या शारदा विद्या प्रसारक मंडळाचे माजी संचालक होते.ते अतिशय मनमिळावू,सुस्वभावी तसेच धार्मिक वृत्तीचे होते.लहान असो वा मोठा सर्वांशी त्यांचे अगदी आपलेसे म्हणून बोलणे असायचे. त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी,सून,जावई,नातवंडे असा परिवार आहे.ते जळगाव येथील लाईफ केअर फार्मास्युटिकल तसेच पार्श फार्मास्युटिकलचे संचालक स्वप्निल जैन तसेच फैजपूर येथील जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका स्वीटी रितेश जैन यांचे वडील तर साकळी येथील सुप्रसिद्ध डॉ.पी.सी.जैन यांचे जावई होते.

दरम्यान मोठ्या आजारातून दोनदा जीवनदान-मयत प्रकाश जैन यांना कॅन्सर हा आजार उद्भवलेला होता व या गंभीर आजाराची त्यांनी मोठ्या हिंमतीने दोनवेळा लढा देत आजारातून ठणठणीत बरे झालेले होते.त्यानंतर त्यांना कोरोनाच्या काळात कोरानाची लागण झालेला होती.मात्र मोठा उपचारानंतर त्यांनी कोरोनावरही मात केली होती. पाच वर्षांपूर्वी म्हणजेच कोरोना काळात सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनामुळे त्यांच्या पत्नी सरिता जैन यांचे दुर्दैवी निधन झालेले होते मात्र पत्नीच्या जाण्याचे दुःख सहन करूनही ते आपल्या कुटुंबासाठी नव्या उमेदीने जीवन जगत होते.मात्र नियतीने त्यांचा घात करून त्यांना गावापासून कोसोदूर नेत कुटुंबापासून कायमचे हिरावून घेतले.हे दुःख जैन कुटुंबीयांना कधी न विसरता येणारे आहे.त्यांच्या अपघाती जाण्याने साकळीसह पंचक्रोशीतही हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

Leave A Reply

Your email address will not be published.