Just another WordPress site

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट !!

पटना-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.३० मार्च २५ रविवार

बुद्ध गया येथील महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात दिले पाहिजे व त्यासाठी महाबोधी टेम्पल ऍक्ट १९४९ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी काल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी झालेल्या चर्चेत महाबोधी महाविहार ट्रस्टमध्ये अध्यक्ष,सचिव आणि सर्व सदस्य बौद्ध असावेत अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे केली.तसेच बुद्ध गया येथे भिक्खू संघाच्या वतीने चाललेल्या आंदोलनाला राज्य सरकारतर्फे भेट देण्याची सूचना ना.रामदास आठवले यांनी केली.यावेळी बुद्धगया महाबोधी महाविहार कायदा रद्द करण्याचे निवेदन ना.रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना दिले.

दरम्यान बुद्धगया येथील महाबोधी महाविहार आंदोलनाची पूर्ण माहिती घेऊन बौद्धांच्या ताब्यात महाबोधी महाविहार देण्याबाबत सकारात्मक चर्चा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्याशी केली.याबाबत बिहारचे मंत्री यांच्यावर जबाबदारी सोपवत असून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्याला दिल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.ना.रामदास आठवले हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटण्यास गेले असता त्यांच्या स्वागतासाठी स्वतः मुख्यमंत्री नितीश कुमार प्रवेशद्वारावर आले होते.मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ना.रामदास आठवले यांचे मैथिली शैलीची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन प्रेम आणि आदरपूर्वक स्वागत केले.यावेळी ना.रामदास आठवले आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यात खेळीमेळीत चर्चा झाली आणि जुन्या आठवणीना उभय नेत्यांनी उजाळा दिला.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे बिहार प्रदेश अध्यक्ष देवकुमार वर्मा,आदिल अजगर,शिव नारायण मिश्रा,राष्ट्रीय सचिव विजयप्रसाद गुप्ता,चंदन शर्मा आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.