Just another WordPress site

आरएसएसची १०० वर्षे तसेच भारताची राज्यघटना,राष्ट्रध्वज आणि जातीव्यवस्थेवरील आरएसएसची बदलती भूमिका !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.३०  मार्च २५  रविवार

भारताची राज्यघटना,राष्ट्रध्वज आणि जातीव्यवस्थेबाबत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) विचारांवर नेहमीच टीका होत असून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत वेगवेगळ्या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांबाबतची त्यांची भूमिका अनेकदा बदलली आहे.भारताच्या राज्यघटनेबाबतची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही भूमिका आणि नाते अतिशय गुंतागुंतीचे राहिले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिवराव गोळवलकर यांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध आहे व त्यात गोळवळकर लिहितात,”आपली राज्यघटना देखील पाश्चात्य देशांच्या विविध राज्यघटनांमधील विविध कलमांचे फक्त एक बोजड आणि विषम असे मिश्रण आहे.यामध्ये आपले स्वत:चे म्हटले जावे असे काहीही नाही.राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये एकतरी असा संदर्भ आहे का की आपले राष्ट्रीय मिशन काय आहे आणि जीवनात आपला मुख्य उद्देश काय आहे ? नाही !”

अनेक इतिहासकारांनी या गोष्टीचा उल्लेख केला आहे की भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या एक दिवस आधी १४ ऑगस्ट १९४७ ला आरएसएसच्या ‘ऑर्गनायझर’ या मुखपत्रात लिहिले होते की,”नशिबाच्या जोरावर सत्तेत आलेल्या लोकांनी भलेही तिरंगा आमच्या हाती द्यावा मात्र हिंदू याचा कधीही याचा सन्मान करणार नाहीत आणि याचा स्वीकार करणार नाहीत.”

पेंटिंग

“तीन शब्द हे मुळातच वाईट असतात आणि तीन रंगांचा झेंडा नक्कीच खूप वाईट मानसिक परिणाम करेल आणि तो देशासाठी हानिकारक आहे.”

ए जी नूरानी एक ख्यातनाम वकील आणि राजकीय भाष्यकार होते त्यांनी सर्वोच्च न्यायालय आणि बॉम्बे हाय कोर्टात काम केले व त्यांनी ‘द आरएसएस:द मेनेस टू इंडिया’ हे पुस्तक लिहिले आहे.त्यात ते लिहितात,संघ भारताची राज्यघटना स्वीकारत नाही.ए जी नूरानी लिहितात,”संघाने १ जानेवारी १९९३ ला एक ‘श्वेत पत्रिका’ प्रकाशित केली होती व त्यात राज्यघटना ‘हिंदू विरोधी’ असल्याचे म्हटले होते.देशात त्यांना कोणत्या प्रकारचे राजकारण करायचे आहे याची रुपरेषा त्यात देण्यात आली होती.” “त्याच्या मुखपृष्ठावर दोन प्रश्न विचारण्यात आले होते,’भारताची अखंडता,बंधुता आणि सांप्रदायिक सौहार्द नष्ट करणारे कोण आहे ? आणि ‘उपासमार,बेरोजगारी,भ्रष्टाचार आणि अधर्म कोणी पसरवला ?’ याचे उत्तर श्वेत पत्रिकेत ‘सध्याची भारतीय राज्यघटना’ या शीर्षकाखाली देण्यात आले आहे.” ही श्वेत पत्रिका ६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशीद उदध्वस्त करण्यात आल्यानंतर काही दिवसांनी छापण्यात आली होती.ए जी नूरानी लिहितात की,या श्वेत पत्रिकेच्या हिंदी शीर्षकात ‘इंडियन’ शब्दाचा वापर एका हेतूने करण्यात आला.ते लिहितात,”याचा अर्थ असा आहे की ही हिंदू (किंवा भारतीय) राज्यघटना नाही तर इंडियन राज्यघटना आहे.” नूरानी यांच्या नोंदींनुसार श्वेत पत्रिकेच्या प्रस्तावनेमध्ये स्वामी हीरानंद यांनी लिहिले आहे की,”सध्याची राज्यघटना देशाची संस्कृती,चारित्र्य,परिस्थिती याच्या विरुद्ध आहे.ती परदेश केंद्रीत आहे आणि सध्याच्या राज्यघटनेला रद्द केल्यानंतरच आपल्याला आपले आर्थिक धोरण,न्यायिक आणि प्रशासकीय रचना आणि इतर राष्ट्रीय संस्थांबद्दल नव्याने विचार करावा लागेल.” नूरानी लिहितात की,जानेवारी १९९३ मध्ये आरएसएसचे सरसंघचालक असलेल्या राजेंद्र सिंह यांनी लिहिले होते,राज्यघटनेत बदल करण्याची आवश्यकता आहे.भविष्यात या देशातील लोकांचे वर्तन आणि प्रतिभेनुसार राज्यघटना स्वीकारली पाहिजे.२४ जानेवारी १९९३ ला आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी देखील राज्यघटनेवर नव्याने विचार करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला होता.

राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी दिलेल्या वक्तव्यांत म्हटले होते की, जर ‘अबकी बार ४०० पार’ या घोषणेप्रमाणे भाजपाला जागा मिळाल्या तर ते राज्यघटनेत बदल करतील.त्यानंतर भाजपाने अनेकवेळा स्पष्टीकरण दिले की असे करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही.मात्र भाजपाने राज्यघटनेत मोठे मूलभूत बदल करण्याचे प्रयत्न केले याची अनेक उदाहरणे आहेत.वरिष्ठ पत्रकार आणि लेखक नीलांजन मुखोपाध्याय यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील मोठ्या नेत्यांवर ‘द आरएसएस:आयकॉन्स ऑफ द इंडियन राइट’ नावाचे पुस्तक लिहिले आहे.त्यात ते लिहितात,अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना जेव्हा एनडीएचे सरकार स्थापन झाले तेव्हा त्यांनी सर्वात पहिले केलेले काम म्हणजे राज्यघटनेचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली.मात्र प्रचंड गदारोळ झाल्यानंतर त्यांना समिती स्थापन करण्यामागचे कारण बदलावे लागले आणि सांगावे लागले की,ही समिती राज्यघटनेचा पूर्ण आढावा न घेता फक्त इतके पाहिल की आतापर्यंत राज्यघटनेने कशाप्रकारे काम केले आहे.

नरेंद्र मोदी

मुखोपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार,वाजपेयी सरकारने राज्यघटनेचा आढावा घेण्यासाठी समिती यासाठी स्थापन केली होती की,संघ आणि भाजपाची भूमिका होती की सध्याच्या राज्यघटनेऐवजी नवी राज्यघटना आली पाहिजे.२०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळाची सुरूवात राज्यघटनेला भारताचे एकमेव पवित्र पुस्तक आणि संसदेला लोकशाहीचे मंदिर म्हणत केली.

‘संघ आधीपासूनच राज्यघटनेचा स्वीकार करतो’

गेल्या काही वर्षांमध्ये संघाने राज्यघटनेबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.२०१८ मध्ये दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये संघाचे विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते,”ही राज्यघटना आमच्या लोकांनी तयार केली आणि राज्यघटना सर्वसंमतीने तयार झाली त्यामुळे राज्यघटनेतील नियमांचे पालन करणे हे सर्वाचे कर्तव्य आहे.” “संघ राज्यघटनेला आधीपासूनच मानतो,स्वतंत्र भारताची सर्व प्रतिक आणि राज्यघटनेच्या भूमिकेचा पूर्ण सन्मान आम्ही करतो.”

अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी

बद्री नारायण हे इतिहासकार आणि सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ आहेत.ते सध्या गोविंद वल्लभ पंत सामाजिक विज्ञान संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.ते म्हणतात,”संघाने अनेकदा भूमिका स्पष्ट केली आहे की,ते राज्यघटनेला पूर्णपणे मानतात,राज्यघटनेबरोबर आहेत आणि राज्यघटनेतील मूल्यांवर त्यांचा विश्वास आहे.मुद्दा उपस्थित करणारे लोक काहीही मुद्दा मांडू शकतात आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण करू शकतात.””जर तुम्ही संघाची वक्तव्य पाहिली-मोहन भागवत किंवा त्यांच्या आधीचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस जे म्हणाले त्यातून दिसते की एक लोकशाही देश आणि राज्यघटनेवर संघाचा विश्वास आहे.”प्राध्यापक बद्री नारायण यांच्यानुसार राज्यघटनेबाबत संघानं सखोल भूमिका मांडली आहे.राज्यघटनेबाबत गेल्या दोन दशकांच्या कालावधीत संघाने जी भूमिका घेतली आहे ती राज्यघटनेच्या बाजूनेच आहे आणि त्यात कोणतीही विसंगती नाही.

मनुस्मृती आणि राज्यघटना बाबत आरएसएसची बदलती भूमिका !!

डिसेंबर २०२४ मध्ये देशाची संसद जेव्हा राज्यघटना स्वीकारण्यास ७५ वर्षे पूर्ण झाल्याची बाब साजरी करत होती तेव्हा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी राज्यघटना आणि मनुस्मृतीच्या मुद्दयावर सावरकरांच्या लेखनाचा संदर्भ देत भाजपावर टीका केली होती.उजव्या हातात राज्यघटना आणि डाव्या हातात मनुस्मृतीच्या प्रती घेऊन राहुल गांधी म्हणाले होते,”सावरकरांनी त्यांच्या लेखनात स्पष्टपणे म्हटले आहे की आपल्या राज्यघटनेत काहीही भारतीय नाही आणि राज्यघटनेची जागी मनुस्मृतीने घेतली पाहिजे” या वक्तव्यावरून संसदेच्या अधिवेशनात अनेक दिवस गदारोळ झाला होता.मनुस्मृती आणि राज्यघटनेच्या मुद्द्यावरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष आरएसएसला कोंडीत पकडत आले आहेत.प्राध्यापक शम्सूल इस्लाम दिल्ली विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक होते व त्यांनी आरएसएस आणि हिंदू राष्ट्रवादावर अनेक पुस्तके लिहिली आहेत.ते म्हणतात,”२६ नोव्हेंबर १९४९ ला राज्यघटना समितीने भारताची राज्यघटना मंजूर केली.चार दिवसांनी संघाशी निगडीत लोकांनी संपादकीय लिहिले व त्यात लिहिले होते की या राज्यघटनेत काहीही भारतीय नाही.”प्राध्यापक शम्सूल इस्लाम यांनी दिलेल्या माहितीनुसार,राज्यघटनेवर टीका करत संघाने हा प्रश्नदेखील उपस्थित केला होता की,मनुस्मृतीत असे काहीही मिळाले नाही का ज्याचा वापर किंवा समावेश करता येईल.ते म्हणतात,”त्याआधी सावरकर म्हणाले होते की,आपल्या हिंदू राष्ट्रासाठी वेदांनंतर मनुस्मृती हा धर्मग्रंथ सर्वात पूजनीय आहे आणि मनुस्मृती हिंदू कायदा आहे.”गोळवळकर यांच्या बंच ऑफ थॉट्स या पुस्तकाचा संदर्भ देत प्राध्यापक शम्सूल इस्लाम म्हणतात,”गोळवळकरांनी भारताच्या राज्यघटनेची जितकी टिंगल केली तितकी टिंगल मुस्लिम लीगनेही केली नाही.”

राहुल गांधी आणि संविधान

शम्सूल इस्लाम यांच्या मते,”राज्यघटनेबद्दल आरएसएसची आधी जी भूमिका होती तीच आजदेखील आहे व ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहेत.” नीलांजन मुखोपाध्याय,प्राध्यापक शम्सूल इस्लाम यांच्याशी सहमत आहेत.गेल्या काही वर्षांमध्ये राज्यघटनेत झालेल्या मोठ्या बदलांचा उल्लेख करत मुख्योपाध्याय म्हणतात की, “सीएए अंतर्गत नागरिकत्वाला धर्माशी जोडले गेले आहे हे अशा लोकांसाठी आहे जे बाहेरून येऊन भारतात स्थायिक झाले आहेत.मात्र या लोकांमधून मुस्लिमांना वेगळे ठेवण्यात आले आहे.”मुखोपाध्याय म्हणतात की,विद्यमान सरकारने राज्यघटनेच्या मूलभूत रचनेबद्दल चर्चा सुरू केली आहे.१९७३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता की,राज्यघटनेचे मूलभूत स्वरूप बदलता येणार नाही.ते म्हणतात,”उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि माजी कायदा मंत्री किरेन रिजिजू युक्तिवाद करत आहेत की, राज्यघटनेचे मूलभूत स्वरूप किंवा रचना नावाची कोणतीही गोष्ट नाही.सर्वकाही बदलले जाऊ शकते.ते म्हणत आहेत की संसद सर्वोच्च आहे त्यामुळे राज्यघटनेत काहीही बदल करण्यासाठी फक्त संसदीय बहुमताची आवश्यकता आहे.”

भारताच्या राष्ट्रध्वजाबद्दल आरएसएसची बदलती भूमिका

आज आरएसएस सार्वजनिकरित्या तिरंगा झेंडा फडकावते.आरएसएसच्या कार्यक्रमांमध्ये आणि संचालनात तिरंगा दिसतो.संघाचे म्हणने आहे की,ते राष्ट्रध्वजाचा सन्मान करतात.मात्र देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी आणि नंतरची अनेक दशके तिरंग्याबद्दलच्या संघाच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले.आरएसएसचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिवराव गोळवळकर भारताच्या तिरंगा झेंड्यावर टीका करायचे.”बंच ऑफ थॉट्स” या पुस्तकात त्यांनी लिहिले आहे की “तिरंगा आपला राष्ट्रीय इतिहास आणि वारशावर आधारित कोणत्याही राष्ट्रीय दृष्टीकोनाने किंवा सत्याने प्रेरित नव्हता.”गोळवळकरांचे म्हणने होते की,तिरंग्याचा स्वीकार करण्यात आल्यानंतर विविध समुदायांच्या एकतेच्या रुपात त्याची व्याख्या करण्यात आली.भगवा रंग हिंदूंचा,हिरवा रंग मुस्लिमांचा आणि पांढरा रंग इतर सर्व समुदायांचा.त्यांनी लिहिले आहे की,”बिगर हिंदू समुदायांमध्ये मुस्लिमांचे नाव विशेष करून घेण्यात आले कारण प्रमुख नेत्यांच्या मनात मुस्लिमच प्रमुख होते आणि त्यांचे नाव घेतल्याशिवाय आपले राष्ट्रीयत्व पूर्ण होणार नाही असा विचार ते करायचे!””जेव्हा काहीजण म्हणाले की,याला सांप्रदायिक दृष्टीकोनाचा वास येतो तेव्हा एक नवीन स्पष्टीकरण समोर आले की भगवा रंग बलिदानाचे प्रतीक आहे,पांढरा पावित्र्याचे आणि हिरवा रंग शांततेचे प्रतीक आहे.”

भारताचा राष्ट्रध्वज आणि नेहरू

लेखक आणि पत्रकार नीलांजन मुखोपाध्याय म्हणतात,”१९२९ मध्ये काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली तेव्हा निर्णय घेण्यात आला की २६ जानेवारी १९३० ला स्वांतत्र्य दिन म्हणून साजरा केला जाईल आणि तिरंगा ध्वज फडकावला जाईल.आरएसएसने त्या दिवशी देखील तिरंग्याऐवजी भगवा झेंडा फडकावला होता.” धीरेंद्र झा एक प्रसिद्ध लेखक आहेत.त्यांनी आरएसएसवर सखोल संशोधन केले आहे.संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवळकरांवरील त्यांचे पुस्तक प्रकाशित अलीकडेच झाले आहे.याआधी त्यांनी नथुराम गोडसे आणि हिंदुत्व या विषयांवरदेखील पुस्तके लिहिली आहेत.धीरेंद्र झा म्हणतात की,डॉ.हेडगेवार यांनी २१ जानेवारी १९३० ला लिहिलेल्या पत्रात संघाच्या शाखांमध्ये तिरंग्याऐवजी भगवा झेंडा फडकवण्यास सांगितले होते.संघ कायम आरोप नाकारत आला आहे कारण १९३० मध्ये तिरंगा झेंड्याला राष्ट्रध्वजाचा दर्जा मिळालेला नव्हता.२०१८ मध्ये संघाचे विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की,”राष्ट्राचा गौरव आणि स्वांतत्र्य मिळवणे हे डॉ.हेडगेवार यांच्या आयुष्याचे एकमेव उद्दिष्ट होते मग संघाचे दुसरे कोणतेही उद्दिष्ट कसे असू शकते ?” “स्वाभाविकपणे संघाच्या स्वयंसेवकांच्या मनात आपल्या स्वांतत्र्याच्या सर्व प्रतिकांबद्दल अत्यंत आदर आणि समर्पण आहे याच्याशिवाय दुसरा कसलाही विचार संघ करूच शकत नाही.”

‘त्यावेळेस तिरंगा काँग्रेसचा झेंडा होता, राष्ट्रध्वज नव्हे’

रामबहादूर रॉय एक ख्यातनाम पत्रकार आहेत.ते सध्या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे अध्यक्ष आहेत व त्यांनी भारताची राज्यघटना आणि आरएसएसचे माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यावर पुस्तके लिहिली आहेत.१९३० मध्ये संघाने तिरंगा फडकवण्याच्या मुद्द्याबद्दल ते म्हणतात,”मला असे वाटते की,तिरंगा फडकावला नसेल.तुम्ही याकडे मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून पाहा त्यावेळेस तिरंगा स्वांतत्र्याचे प्रतिनिधित्व करत नव्हता त्यावेळेस तिरंगा काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत होता.”रॉय म्हणतात,”हे खरे आहे की,त्यावेळेस काँग्रेस,राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचा मुख्यप्रवाह होता.आरएसएस देखील स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रेरित होते मात्र आरएसएसचे अस्तित्व काँग्रेसपेक्षा वेगळे होते.आरएसएसव्हे चिन्ह किंवा झेंडा भगवा आहे त्यामुळे डॉ.हेडगेवार यांनी जे पत्र लिहिले त्यात माझ्या दृष्टीने दोन मुद्दे आहेत. स्वातंत्र्य चळवळीत आपण सहभागी आहोत मात्र आपले वेगळे अस्तित्व आहे त्यामुळे आपण आपला झेंडा फडकावला पाहिजे.”संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ‘आरएसएस: २१ वी सदी के लिए रोडमॅप’ हे पुस्तक लिहिले आहे.त्यात ते लिहितात,”आपला राष्ट्रध्वज ज्याला हिंदीत तिरंगा म्हटला जाते तो आपल्या सर्वांना प्रिय आहे.१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वंतत्र झाला त्यादिवशी आणि २६ जानेवारी १९५० ला भारत प्रजासत्ताक झाला त्यादिवशी नागपूरमधील आरएसएसच्या मुख्यालयात तिरंगा फडकावण्यात आला होता.”आंबेकर याचाही उल्लेख करतात की,१९६३ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेताना स्वयंसेवकांनी तिरंगा झेंडाच हाती धरला होता.संघाशी निगडीत लोकदेखील नेहमीच या गोष्टीचा उल्लेख करतात की १९६२ मध्ये भारत-चीन युद्ध झाल्यानंतर १९६३ च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संघाला विशेष आमंत्रण दिले होते.

संघाचा ध्वज

धीरेंद्र झा म्हणतात की,१९६३ च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये संघाच्या लोकांच्या हातात पहिल्यांदाच तिरंगा झेंडा दिसला मात्र या परेडमध्ये फक्त संघालाच बोलावले गेले होते असे नव्हते.ते म्हणतात की,या परेडमध्ये सर्व कामगार संघटना,शाळा,महाविद्यालयांना आमंत्रण देण्यात आले होते.धीरेंद्र झा पुढे म्हणतात,या परेडकडे लोकांची परेड या दृष्टीकोनातून पाहिले गेले होते कारण १९६२ मध्ये भारत-चीन युद्ध नुकतेच संपले होते आणि सैन्य सीमेवरच होते.भारतीय मजदूर संघ,ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आणि इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस यासारख्या संघटनांना प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी आमंत्रण देण्यात आले होते.त्यामध्ये (संघाचे लोक) युनिफॉर्म घालून सहभागी झाले कारण त्यांना लोकांमध्ये वैधता किंवा नव्याने ओळख हवी होती.त्याआधी गांधीहत्येनंतर त्यांना बेकायदेशीर ठरवण्यात आले होते.झा म्हणतात की, संघाच्या लोकांच्या हातात त्यावेळी तिरंगा झेंडा दिसला होता कारण तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी हे स्पष्ट केले होते की,कोणीही त्यांचा झेंडा किंवा बॅनर आणणार नाही.सर्वांच्या हातात फक्त तिरंगा झेंडाच असेल.धीरेंद्र झा यांच्या मते,”यासंदर्भातदेखील संघ नंतर खोटी गोष्ट पसरवू लागला की,आरएसएसला नेहरूंनी आमंत्रण दिले होते.ते म्हणतात,संघाचे तिरंग्याबरोबरचे नाते सहज नाही.खूप नंतर ही बाब संघाच्या लक्षात आली की,तिरंगा,राज्यघटना आणि गांधीजी हा तर या देशाचा आत्मा आहेत तेव्हापासून संघ तिरंग्याबद्दल आदर असल्याचा दिखावा करू लागला.

स्वातंत्र्यानंतरही तिरंगा न फडकावल्याचा संघावर आरोप

संघावर आणखी एक टीका होत आली आहे व ती म्हणजे संघ त्यांच्या मुख्यालयावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवत नाही.१९५० नंतर २६ जानेवारी २००२ ला पहिल्यांदा संघाने त्यांच्या मुख्यालयावर तिरंगा झेंडा फडकावला होता.याबद्दल स्पष्टीकरण देतांना आरएसएसचे समर्थक आणि नेते म्हणतात की २००२ पर्यंत संघाने राष्ट्रध्वज फडकावला नव्हता कारण २००२ पर्यंत सर्वसामान्य नागरिकांना राष्ट्रध्वज फडकावण्याची परवानगी नव्हती.मात्र या युक्तिवादाला उत्तर देतांना म्हटले जाते की २००२ पर्यंतदेखील जे फ्लॅग कोड म्हणजे झेंडा फडकावण्यासंदर्भातील नियम लागू होते ते कोणत्याही भारतीय नागरिकाला किंवा संस्थेला प्रजासत्ताक दिन,स्वातंत्र्य दिन आणि गांधी जयंतीला झेंडा फडकावण्यापासून रोखत नव्हते.

ऐतिहासिक छायाचित्र

नीलांजन मुखोपाध्याय म्हणतात की,१९५०,१९६० आणि १९७० च्या दशकांमध्ये खासगी कंपन्यादेखील १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या दिवशी भारताचा राष्ट्रध्वज फडकवायच्या.फ्लॅग कोडचा अर्थ इतकाच होता की राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये.आंबेकर लिहितात,अनेक संघटना आणि सरकारी विभागांप्रमाणेच आरएसएसचा देखील स्वत:चा झेंडा आहे तो म्हणजे भगवा झेंडा किंवा भगवा ध्वज.शतकानुशतके भगवा झेंडा भारताच्या सांस्कृतिक डीएनएचे प्रतिनिधित्व करत आला आहे.२००४ मध्ये ध्वज संहितेचे नियम शिथिल करण्यात आल्यापासून संघाच्या मुख्यालयात नियमितपणे उच्च मानकांसह तिरंगा झेंडा फडकावला जातो आहे.प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनी देशातील सर्व भागात तिरंगा फडकावला जातो.या दिवशी भगवा झेंडा देखील फडकावला जात राहिला आहे.प्राध्यापक शम्सूल इस्लाम म्हणतात की,जेव्हा तिरंगा झेंडा हा भारताचा राष्ट्रध्वज झाला तेव्हा संघ म्हणाला होता की हा अशुभ झेंडा आहे.ते म्हणतात,भारताच्या लोकशाहीची जितकी प्रतिके होती त्यांचा संघाने आदर केला नाही कारण त्यांच्या मते ती हिंदू राष्ट्राची प्रतिके नव्हती.

जाती व्यवस्था, जातनिहाय जनगणना आणि संघ

सुरुवातीच्या काळात संघाचे नेते वर्ण व्यवस्थेला हिंदू समाजाचे अविभाज्य अंग मानायचे.’बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकात गोळवळकर लिहितात की,”वर्ण-व्यवस्था हे आमच्या समाजाचे आणखी एक वैशिष्ट्य होते मात्र आज त्याची ‘जातीयवाद’ म्हणून टिंगल केली जाते आहे.आपल्या लोकांना वर्ण-व्यवस्थेचे नाव घेणेच अपमानास्पद वाटते.यातील समाज व्यवस्थेला ते नेहमीच सामाजिक भेदभाव समजतात.गोळवळकरांचे म्हणणे होते की वर्ण व्यवस्थेच्या ढासळलेल्या आणि विकृत स्वरुपाला पाहून काही लोक असा प्रचार करत राहिले की या वर्णव्यवस्थेमुळे शतकानुशतके आमची अधोगती होत राहिली.त्याचबरोबर गोळवळकरांचे असेही म्हणने होते की,भारतात प्राचीन काळापासून जाती होत्या.जातींमुळे समाज विभागला गेला होता किंवा समाजाच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण झाले होते याचे कोणतेही उदाहरण दिसत नाही. नीलांजन मुखोपाध्याय म्हणतात की,गोळवळकरांच्या मृत्यूनंतर बाळासाहेब देवरस सरसंघचालक झाले.त्यानंतर त्यांनी आरएसएसचा विस्तार करण्याची आणि इतर जातींमधील लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता मांडली.मुखोपाध्याय म्हणतात,सामाजिक समरसता हा शब्द आपण आता ऐकतो.१९७४ मध्ये देवरस यांनी पहिल्यांदा सामाजिक समरसतेच्या आवश्यकतेचा मुद्दा मांडला होता मात्र आरएसएसने खालच्या जातीतील लोकांसाठी त्यांचे दरवाजे बंद ठेवण्याचेच धोरण सुरू ठेवले.१९८० च्या दशकाच्या शेवटी त्यांनी हे दरवाजे उघडण्यास सुरूवात केली आणि इतर जातीच्या लोकांना आकर्षित करण्यास सुरुवात केली.

लहान मुलगा

९ नोव्हेंबर १९८९ ला अयोध्येत झालेल्या राम मंदिर शिलान्यासाची आठवण करून देत नीलांजन मुखोपाध्याय म्हणतात की,हा शिलान्यास करणारी व्यक्ती होती,विश्व हिंदू परिषदेच्या अनुसूचित जातीचे नेते कामेश्वर चौपाल.ते राम मंदिर ट्रस्टचे सदस्य होते आणि त्यांचे यावर्षी फेब्रुवारी महिन्यात निधन झाले.ते म्हणतात,१९८९ नंतर काही वर्षे कामेश्वर चौपाल भाजपात होते आणि त्यानंतर ते आरएसएसमधून परत राम मंदिर ट्रस्टमध्ये गेले.मुखोपाध्याय पुढे म्हणतात,ही खूपच विचित्र गोष्ट आहे.त्यांना माहिती आहे की,त्यांना लोकापर्यंत पोहोचायचे आहे मात्र एका विशिष्ट मर्यादेपलीकडे ते पोहोचू शकत नाहीत.मला माहिती नाही ते किती काळ अशा संभ्रमात राहतील मात्र तो अजूनही आहे.२०१८ मध्ये या मुद्द्याबाबत सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की,”पन्नासच्या दशकात तुम्हाला संघात ब्राह्मणच दिसायचे.आजच्या संघाबद्दल तुम्ही विचारता म्हणून पाहिल्यावर मला दिसते की,प्रदेश आणि प्रदेशाच्या वरच्या स्तरावर सर्व जातीचे कार्यकर्ते आहेत.””अखिल भारतीय स्तरावर देखील आता एकच जात राहिलेली नाही.हे वाढत जाईल आणि संपूर्ण हिंदू समाजाची संघटना ज्यात काम करणाऱ्यांमध्ये सर्व जाती वर्गांचा समावेश असेल अशी कार्यकारिणी तुम्हाला त्यावेळेस दिसू लागेल.””मला वाटते की हा प्रवास प्रदीर्घ आहे मात्र आपण त्या दिशेने मार्गक्रमण करतो आहोत ही महत्त्वाची बाब आहे.”

जाती व्यवस्थेवरील बदलती भूमिका

एकीकडे संघाने हिंदू समुदायात एकता असण्याचा मुद्द्यावर भर दिला तर दुसरीकडे संघाने दलित आणि मागास जातींची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक कार्यक्रम सुरू केले.सामाजिक समरसता वेदिका आणि वनवासी कल्याण आश्रम यासारख्या संस्थाच्या माध्यमातून आरएसएस जातीवर आधारित भेदभाव आणि अस्पृश्यता यासारख्या समाजातील वाईट गोष्टी संपवण्यासाठी अनेक कार्यक्रम चालवते.

गोळवलकर

या संस्था दुर्गम गावात राहणाऱ्या दलित,मागास जाती आणि जनजातींच्या लोकांना शिक्षण देण्याचे काम करतात तसेच वंचित राहिलेल्या समुदायांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतात.मात्र संघाचे टीकाकार म्हणतात की,दलित आणि मागास जातींसाठी संघ जे काही करतो त्यामागचा हेतू त्या समुदायांची संघावरची निष्ठा कायम राहावी किंवा त्यांचा पाठिंबा कायम राहावा एवढाच आहे.नीलांजन मुखोपाध्याय म्हणतात,संघाला माहिती आहे की जातीव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर हिंदूंच्या एकीकरणासाठी जातीवर आधारित भेदभाव संपवणे आवश्यक आहे.संघाला हेदेखील माहिती आहे की,जातीवर आधारित भेदभाव सुरुच राहिला तर संघ पुढे जाऊ शकणार नाही.मात्र संघाचा जातीव्यवस्थेवर विश्वासही आहे.संघाचे नेतृत्व मुख्यत: उच्च जातींच्या हातीच राहिले आहे.अलीकडच्या वर्षांमध्येच इतर जातींमधून काही लोक संघात आले आहेत. मात्र अजूनही आरएसएस ही प्रामुख्याने उच्च जातीतील लोकांचीच संघटना आहे.

‘वेगळ्या चष्म्यातून पाहण्याची गरज’

प्राध्यापक बद्री नारायण म्हणतात की,जेव्हा एखादी संस्था वाढते तेव्हा तिचे केंद्र जातीवरच आधारित असते.ते पुढे म्हणतात,कोणत्याही संस्थेची सुरुवात सामाजिक नेटवर्कद्वारे होते मात्र हळूहळू जेव्हा संस्थेचा विस्तार होतो तेव्हा ती इतर लोकांना त्यात सहभागी करून घेते.जी संस्था इतर लोकांना सहभागी करून घेत नाही तिचा विस्तार होत नाही.संघ इतकी मोठी संस्था झाली आहे की,लोकांना सहभागी करून घेतल्याशिवाय ती पुढे जाऊ शकत नाही.लोकांना सहभागी करून घेतल्याशिवाय एखादी संस्था इतकी मोठी व्हावी हे अविश्वसनीय आहे.प्राध्यापक बद्री नारायण म्हणतात की”गेल्या काही काळापासूनच्या संघाच्या प्रचारकांचे प्रोफाईल जेव्हा त्यांनी पाहिले आणि त्याचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आले की, संघात मोठ्या संख्येनं ओबीसी आणि दलित पुढे जात आहेत आणि वरच्या पदांवर जात आहेत.”ते पुढे म्हणतात, प्रांत पातळीवरील प्रचारकापासून इतर अनेक पदांवर ते पुढे जात आहेत.संघ सतत नवीन काळाशी जुळवून घेतो आणि त्या आधारावर त्यात नवीन बदल होत राहतात. संघाचे जे स्वरुप होते ते खूपच बदलले आहे मात्र अजूनही बरेचसे लोक संघाकडे जुन्या दृष्टीकोनातून किंवा जुन्या चष्म्यातून पाहत आहेत.जुना दृष्टीकोन बराचसा डाव्या विचारसरणीचा आहे ज्यात असे मानले जाते की संघ असा आहे, संघ तसा आहे.मात्र संघाला जवळून पाहिल्यास लक्षात येते की,संघात बराच बदल झाला आहे.संघाला समजून घेण्यासाठी आपल्याला नवा चष्मा वापरावा लागेल.तुम्ही संघाला बाहेरून पाहत आहात आणि इतरांनी तयार केलेल्या चष्म्यातून पाहत आहात.

मोहन भागवत आणि रामगिरी महाराज

प्राध्यापक बद्री नारायण संघाशी निगडीत सरस्वती शिशु मंदिर शाळांचे उदाहरण देतात.ते म्हणतात,तिथे दलित आणि ओबीसी समुदायातील बरीच मुले येत आहेत आणि तिथून शिक्षण घेऊन पुढील वाटचाल करत आहेत. त्यापैकी काही प्रचारकदेखील होतात.काहीजण नोकरी करतात त्यामुळे संघ एक अशी संघटना म्हणून विकसित झाला आहे,जी सबलीकरणाचे काम करते.संघाच्या शाळांनी सर्व प्रकारच्या समुदायांना सहभागी करून घेण्यासाठी खूप काम केले आहे.लोकांना सहभागी करून घेण्याची ही प्रक्रिया खालच्या स्तरावरून सुरू झाली आणि ती वरपर्यंत वाढत चालली आहे.अरविंद मोहन एक वरिष्ठ पत्रकार आणि लेखक आहेत. त्यांनी ‘जाति और चुनाव’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे.ते म्हणतात,जातीच्या प्रश्नावर जेव्हा संघाला काही हालचाल होताना दिसते तेव्हा संघ काहीतरी बोलण्यास सुरुवात करतो मात्र रज्जू भैयांना सोडून आजपर्यंत संघामध्ये ब्राह्मणांशिवाय दुसऱ्या जातीचा नेता आला नाही.दलित,मागासवर्गीय आणि महिला तर सोडून द्या मात्र प्रत्येक वेळेस संघ दलितांचे प्रश्न आणि आदिवासींचे पाय धुणे याच प्रकारचे मुद्दे पुढे आणतो.अरविंद मोहन यांच्या मते,जातीयवाद आणि अस्पृश्यतेसंदर्भात समाजाचा दृष्टीकोन बदलावा किंवा दलितांना अधिकार मिळावेत असा कोणताही प्रयत्न संघाकडून झाल्याचे आतापर्यंत पाहायला मिळालेले नाही मग भलेही संघ त्यांच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याचे साजरा करत असो.ते पुढे म्हणतात,जर एखादा प्रयत्न झालाच तर तो इतकाच असतो की,एखाद्या दलिताच्या घरी जेवण केले एखाद्या आदिवासीचे पाय धुतले,त्यापलीकडे काहीही नाही.सत्तेतही दलितांची भागिदारी कुठेही दिसत नाही.संघाच्या संघटनात्मक रचनेमध्येदेखील दलित कुठेही दिसत नाहीत.

जातनिहाय जनगणना आणि आरक्षणाबाबत संघ गोंधळलेला ?

जातनिहाय जनगणना आणि आरक्षणाच्या मुद्द्यांमध्ये संघ गोंधळलेल्या स्थितीत दिसून येतो कारण असे मानले जाते की,संघाचे उच्च जातीतील समर्थक मोठ्या संख्येने आरक्षणाच्या विरोधात आहेत.डिसेंबर २०२३ मध्ये विदर्भ विभागातील आरएसएस सहसंघचालक श्रीधर गाडगे म्हणाले होते की,जातनिहाय जनगणना व्हायला नको कारण अशी जनगणना एक निरर्थक काम ठरेल आणि त्यामुळे फक्त काही लोकांचाच फायदा होईल.हे वक्तव्य आल्यानंतर राजकीय वातावरण तापले आणि दोनच दिवसांनंतर आरएसएसने स्पष्ट केले की ते जातनिहाय जनगणनेच्या विरोधात नाहीत.आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रभारी सुनील आंबेकर एका वक्तव्यात म्हणाले,अलीकडेच पुन्हा एकदा जातनिहाय जनगणनेवर चर्चा सुरू झाली आहे.आम्हाला वाटते की याचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केला पाहिजे असे करतांना याच्याशी निगडीत सर्व घटकांनी याची खबरदारी घेतली पाहिजे की,सामाजिक सदभावना आणि एकतेला कोणताही धक्का लागू नये.आंबेकर पुढे असेही म्हणाले की,आरएसएस सातत्याने भेदभाव नसलेला,सामाजिक समरसता आणि सामाजिक न्यायावर आधारित हिंदू समाज बनवण्याच्या उद्दिष्टावर काम करते आहे.हे खरे आहे की ऐतिहासिक कारणांमुळे समाजातील अनेक वर्ग आर्थिक,सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिले.अनेक सरकारांनी वेळोवेळी त्यांच्या विकास आणि सबलीकरणासाठी पावले उचलली आहेत.आरएसएस त्याला पूर्ण पाठिंबा देते.

आंदोलन

२०१५ मध्ये बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या बरोबर आधी आरएसएस वादात सापडली.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाच्या धोरणाचा आढावा घेण्याची आवश्यकता मांडली होती त्यानंतर त्यावरून वातावरण तापले होते.त्यावेळेस मोहन भागवत म्हणाले होते की,संपूर्ण देशाच्या हितासाठी खरोखरच काळजी असणाऱ्या आणि सामाजिक समानतेसाठी कटिबद्ध असणाऱ्या लोकांची एक समिती बनवली पाहिजे.त्यातून हे निश्चित करण्यात आले पाहिजे की,कोणत्या वर्गाला आरश्रणाची आवश्यकता आहे आणि किती काळासाठी आवश्यकता आहे.नंतर आरएसएसने हे स्पष्ट केले की,आरक्षणाचा फायदा समाजातील प्रत्येक वंचित वर्गाला मिळाला पाहिजे यासंदर्भात मोहन भागवत यांनी हा मुद्दा मांडला होता.मात्र आरजेडीचे नेते लालू यादव यांनी मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत संघ आणि भाजपा आरक्षण संपवण्याचा कट करत असल्याचा आरोप केला होता.बिहारच्या निवडणुकीत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले.आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोहन भागवत यांनी दिलेले वक्तव्य हे त्यामागचे एक प्रमुख कारण असल्याचे मानले गेले.या प्रकरणानंतर संघाने सातत्याने ते आरक्षणाच्या विरोधात नाहीत याबाबत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.

मोहन भागवत

सप्टेंबर २०२३ मध्ये मोहन भागवत म्हणाले होते,जोपर्यंत जातीभेद राहील तोपर्यंत आरक्षण राहील.ज्या लोकांनी दोन हजार वर्षे त्रास सहन केला त्यांच्यासाठी लोकांनी दोनशे वर्षे त्रास सहन करण्यासाठी तयार राहील पाहिजे.सप्टेंबर २०२४ मध्ये संघाने जातनिहाय जनगणनेवरील त्यांची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली होती.त्यावेळेस संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर म्हणाले होते,मागासवर्गीय समुदाय किंवा जातींसाठी कल्याणकारी योजनांसाठी सरकारला आकडेवारीची आवश्यकता असते.मात्र अशी आकडेवारी फक्त त्या समुदायांच्या हिताच्या कामांसाठीच गोळा केली गेली पाहिजे.त्या आकडेवारीचा वापर निवडणुकीच्या प्रचारात राजकीय साधन म्हणून करता कामा नये.जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर संघाच्या वक्तव्यांबद्दल अरविंद मोहन म्हणतात,समाजात जर जातनिहाय जनगणनेच्या प्रश्नावर चर्चा होत असेल तर ती चर्चा पचवण्यासाठी काहीतरी बोलावेच लागेल नाहीतर तुम्ही मोडाल,वाकाल किंवा पडाल.ते म्हणतात की,संघाच्या चारित्र्यातून दिसते की,कोणतीही अडचण किंवा संकट आल्यावर वाकून ते संकट टाळावे आणि नंतर आपल्या मूळ अजेंड्यावर चालत राहावे.

१९९० च्या दशकात मागासवर्गीय जातींना आरक्षण देणाऱ्या मंडल आयोगाच्या विरोधात देशभरात तीव्र निदर्शने झाली होती त्यावेळेस संघदेखील त्या विरोधात सहभागी झाला होता.मंडल आयोगाच्या वेळेस भारतीय जनता पार्टीनं व्ही पी सिंह यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारचा पाठिंबा परत घेतला होत, तेव्हा देखील आरक्षणाच्या मुद्द्याला असलेला संघ आणि भाजपाचा विरोध दिसून आला होता.मंडल आयोगाच्या विरोधाच्या वेळच्या संघाच्या भूमिकेचा संदर्भ देत अरविंद मोहन म्हणतात, भाजपाचा मध्य प्रदेश,महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ओबीसी समुदायात आधार होता.सुशील मोदीसारखे काही नेते होते ज्यांना वाटले की जर ते समाजात होत असलेल्या बदलानुसार चालले नाहीत तर ते संपतील.त्यामुळे त्या दबावाखाली भाजपाची भूमिका बदललेली.नाही तर त्यावेळेस भाजपा उघडपणे आरक्षणाला विरोध करत होती.संघदेखील विरोध करत होता.प्राध्यापक बद्री नारायण यांच्या मते राजकारणात जातीचा वापर एक आयडेंटिटी टूल (अस्मितेचं साधन) म्हणूनच केला जातो.ते पुढे म्हणतात,जेव्हा तुम्ही जातीचा वापर विकासासाठी करू पाहाल, तेव्हादेखील ती आयडेंटिटी टूल किंवा अस्मितेच्या साधनात बदलेल. हे टाळता येणं कठीण आहे.त्यामुळे जातनिहाय जनगणनेची चर्चा करताच तिथे जात येणार आहे आणि जात अस्मितेच्या राजकारणाच्या स्वरुपात येणारच आहे.जातीच्या अस्मितेच्या राजकारणामुळे वंचित समुदायाचे एक मर्यादेपर्यंत सबलीकरण तर होते मात्र एक मर्यादेनंतर अस्मितेच्या राजकारणामुळे ते सबलीकरण थांबते.

नरेंद्र मोदी गेल्या 10 वर्षात रेशीमबागेत गेले नाहीत मग आताच का जात आहेत ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाच्या मुशीतून घडलेले नेते आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याला नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची सुरुवात मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती मंदिराला भेट देऊन करणार आहोत. त्यानंतर दीक्षाभूमीवर आणि त्यानंतर वासूदेवनगरमधील माधव नेत्रालयाच्या भूमिपूजन सोहळ्याला जाणार आहेत.नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून म्हणजे गेल्या १० वर्षांत पहिल्यांदाच संघाच्या स्मृती मंदिराला भेट देणार आहेत त्यामुळे या दौऱ्याची जास्त चर्चा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाच्या मुशीतून घडलेले नेते आहेत. ते संघाचे प्रचारक राहिलेले आहेत.तरीही ते गेल्या १० वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय आणि रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती मंदिरात का गेले नाहीत ? मोदी संघाच्या शताब्दी वर्षातच तिथे का जात आहेत ? यामागची कारणं काय असू शकतात ? हे आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.

यापूर्वी मोदी RSS च्या मुख्यालयात कधी गेले होते?

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी RSS च्या मुख्यालयात जाऊन आले होते.२०१२ साली रा. स्व.संघाचे तत्कालीन सरसंघचालक के. सुदर्शन यांचे निधन झाले होते व  त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोदी नागपुरात संघाच्या कार्यालयात गेले होते.त्यानंतर २०१२ मध्ये मोदी हे भाजपच्या पंतप्रधानपदाचा चेहरा असतील, अशी चर्चा सुरू झाली होती त्यावेळीही मोदी संघाच्या मुख्यालयात गेले होते.त्यांची तत्कालीन आणि विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत बैठक झाली होती.त्यानंतर २०१४ ची लोकसभा निवडणूक झाली. भाजपला बहुमत मिळाले आणि मोदी पंतप्रधान झाले यानंतर मोदी अनेकदा नागपुरात गेले.कधी मेट्रोच्या उद्घाटनाला तर कधी निवडणुकीच्या प्रचारसभांना,तर कधी विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मोदी नागपुरात आले.कधी तर विदर्भातील इतर जिल्ह्यातही फिरले.पण ते कधीच संघाच्या स्मृती मंदिरात किंवा महाल इथल्या संघाच्या मुख्यालयात फिरकले नाहीत.

मोदी पंतप्रधान झाल्यापासून रा. स्व.संघाच्या मुख्यालयात कधीच गेले नाहीत याबद्दल अनेकजण आश्चर्य व्यक्त करतात कारण मोदी हे संघाच्या मुशीतून घडलेले नेते आहेत त्यामुळे अनेकदा नागपूरला भेट देऊन संघ मुख्यालयात न जाण्यामागचे कारण काय असू शकते ? याबद्दल नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार विकास वैद्य सांगतात, आधीपासून थेट संघाच्या मुशीतून घडलेले आणि पंतप्रधान झालेले मोदी पहिले नेते आहेत.एखादी व्यक्ती खूप मोठ्या पदावर गेली की,थेट संघाच्या मुख्यालयात जाण्याची प्रथा नाही.संघात कुठलाही मोठा नेता जातो तेव्हा त्याला निमंत्रित केले जाते.संघ निमंत्रित करत नाही तोपर्यंत कुठलाही नेता किंवा मोठा अधिकारी संघ कार्यालयात न जाण्याची प्रथा आहे त्यामुळेच इतके वर्ष मोदी कदाचित गेले नसतील.विकास वैद्य हे नागपुरातील असून गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील घडामोडींबद्दल वार्तांकन करतात.

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी आरएसएसच्या मुख्यालयात येऊन गेले.
फोटो कॅप्शन,नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी आरएसएसच्या मुख्यालयात येऊन गेले.

संघ मुख्यालय किंवा हेडगेवार स्मारक समिती इथं जायला जाहीर संधी हवी असते त्यामुळे कदाचित पंतप्रधान गेले १० वर्ष संघ मुख्यालयात गेले नसतील आणि शताब्दी वर्षानिमित्त आता ही संधी मिळाली आहे असे महाराष्ट्र टाइम्स विदर्भ आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजित यांना वाटते.याआधीच्या भेटींमध्ये संघ मुख्यालयात भेट देऊन मोदींना मोठा संदेश देता आला असता असे ज्येष्ठ पत्रकार शुभांगी खापरे यांना वाटते.शुभांगी खापरे म्हणतात,मोदींचा संघासोबत दुरावा कधीच नव्हता पण याआधीच्या भेटीमध्ये संघ मुख्यालयात जाऊन त्यांना मोठा संदेश देता आला असता कारण ते संघाच्या मुशीत घडलेले आहेत पण तशी गरजही वाटली नसावी कारण भाजप एक राजकीय पक्ष आहे.संघ आणि भाजप एकाच परिवारातले असले तरी दोघांचंही कार्यक्षेत्र मात्र वेगवेगळ आहे असे सांगितले जाते त्यामुळे मोदी त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांचे काम करत होते पण ते गेल्या दहा वर्षात संघ मुख्यालयात का आले नाहीत याचं निश्चित कारण सांगता येणार नाही.

मोदी आताच हेडगेवार स्मृती मंदिराला भेट का देत आहेत?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीच हेडगेवार स्मृती मंदिराला भेट देतात तसेच भाजपचे काही केंद्रीय मंत्री देखील नागपूर दौऱ्यावर असतांना  रेशीमाबागेत जातात पण मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या १० वर्षांत संघ मुख्यालय किंवा हेडगेवार स्मृती मंदिरात आलेले नाहीत पण मग संघाचे शताब्दी वर्ष असतांना  मोदी का येत आहेत ? यामागे नेमकी काय कारण असू शकतात ? मोदी आता येण्याचे कारण म्हणजे संघाचे शताब्दी वर्ष आहे तसेच संघाची स्थापना देखील गुढीपाडव्याला झाली होती.आता दोन्ही योगायोग साधून मोदी रेशीमबागेतील स्मृती मंदिराला भेट देत आहेत.कारण कुठलीही संधी कशी साधायची हे मोदींना जमते. त्यासाठी ते ओळखले जातात त्यामुळे संघाचं शताब्दी वर्ष आणि गुढीपाडवा असा मुहूर्त साधून ते भेट देत आहेत असे विकास वैद्य यांना वाटते.ही भेट संघाने घडवून आणलेली आहे असे महाराष्ट्र टाइम्स विदर्भ आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजित यांना वाटते.ते म्हणतात,”संघ ही भाजपची मातृसंस्था आहे,हे संघाने तरी कधीच लपवून ठेवलेले नाही.भाजपचे सुकाणू हे संघाच्या हातात आहे हे जगजाहीर आहे आणि हे संघाचे शताब्दी वर्ष आहे.त्यात मोदींची तिसरी टर्म आहे त्यामुळे संघाला वाटले असावे की मोदींची सूत्र संघाच्या हातात आहे हे यानिमित्ताने जगाला दाखवता यावे त्यामुळे या भेटीवर संघाने मोहोर उमटवली.अर्थात पंतप्रधान आणि संघ दोन्हीच्या संमतीने ही भेट होत आहे.शताब्दी वर्षानिमित्त संघाचा प्रचारक पंतप्रधान म्हणून हेडगेवार स्मृती मंदिराला भेट देतोय यासाठीही संघाने त्यांना बोलावले असू शकते.”

मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या दहा वर्षांत आरएसएस मुख्यालय किंवा हेडगेवार स्मृती मंदिरात आलेले नाहीत.
फोटो कॅप्शन,मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या दहा वर्षांत आरएसएस मुख्यालय किंवा हेडगेवार स्मृती मंदिरात आलेले नाहीत.

पण गेल्या काही महिन्यात मोहन भागवत यांनी केलेली वक्तव्य संघाच्या मुखपत्रातून भाजपवर केलेली टीका व त्यानंतर संघाने भाजपचे कान टोचले अशा आलेल्या बातम्या यामुळे संघ आणि भाजपमध्ये सर्व काही आलेबेल नाही का ? अशा ज्या चर्चा रंगल्या होत्या ते देखील यामागे कारण आहे का ? यामागे काही राजकीय कारण असू शकते का?यामागे राजकीय कारण दिसत आहे असे विकास वैद्य यांना वाटते.ते म्हणतात,सरसंघचालक मोहन भागवत यांचे संघ शिक्षा वर्गाला भाषण झाले होते यावेळी संघाच्या भाजपला कानपिचक्या अशा बातम्या झाल्या होत्या कारण मोहन भागवत कधीही संघ शिक्षा वर्गाला राजकीय भाषण करत नाहीत पण त्यांनी यावेळी ते केले होते. यावेळी त्यांनी भाजपला काही डोस देखील दिले होते त्यामुळे संघ नाराज आहे असा संदेश गेला त्यातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी संघाची भाजपला गरज नाही हे वक्तव्य देखील आले.लोकसभेत संघानं प्रचार केला नाही असेही बोलले गेले.भाजपने संघाला प्रचार करा असे म्हटले नाही म्हणून संघाने प्रचार केला नाही असे  त्यावेळी संघाकडून सांगितले जात होते पण विधानसभा निवडणुकीत संघाचा सक्रीय सहभाग दिसला आणि त्यात भाजपला यशही मिळाले.गेल्या काही दिवसातल्या मतभेदांमुळे मधल्या काळात भाजपला कुठेतरी परिवारापासून दुरावल्यासारख वाटत असेल.आता त्याला पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्यासाठी,आम्ही सगळे एक आहोत हे दाखवण्यासाठी ही भेट असू शकते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

संघ आणि भाजपमध्ये गेल्या काही काळात झालेले थोडेसे मतभेद यामागचे एक कारण असल्याचे शुभांगी खापरे यांना वाटते.त्या म्हणतात,आरएसएस आणि भाजपमध्ये कधी संवाद छान होतात पण कधी कधी भाजप विरुद्ध आरएसएस असे चित्र दिसते.दोन्ही संघटनेमध्ये खूप टोकाचे भांडण दिसत नाही पण कुठंतरी थोडेसे मतभेद दिसतात.पण वाजपेयी आणि सुदर्शनजी यांच्यामध्ये मतभेद होते तसे मोदी आणि मोहन भागवत यांच्यामध्ये दिसत नाहीत असेही ते नमूद करतात.तसेच भाजपला त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा निवडायचा आहे.त्यासाठी सुद्धा रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची एक सहमती लागेल व त्यासाठी सुद्धा ही भेट महत्वाचे वाटत असल्याचे शुभांगी खापरे सांगतात.

मोदी RSS च्या स्मृती मंदिराला भेट देणारे दुसरे पंतप्रधान

रा.स्व.संघाच्या स्मृती मंदिराला भेट देणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान नाहीत.याआधी अटलबिहारी वाजपेयी ज्यावेळी ५ वर्षांसाठी पंतप्रधान झाले होते त्यावेळी त्यांनी नागपुरात रा.स्व.संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली होती.वाजपेयी २६ ऑगस्ट २००० रोजी रेशीमबागेत गेले होते.यावेळी त्यांनी संघाचे प्रचारक नारायणराव तरटे यांची भेट घेतली होती.

आरएसएस स्मृती मंदिराला भेट देणारे मोदी पहिले पंतप्रधान नाहीत.

फोटो कॅप्शन,आरएसएस स्मृती मंदिराला भेट देणारे मोदी पहिले पंतप्रधान नाहीत.

पण त्यावेळी संघाचे कुठलेही मोठे नेते,तत्कालीन सरसंघचालक सुदर्शन,सरकार्यवाह,सहसंघचालक यातील कोणीही वाजपेयींच्या स्वागतासाठी नव्हते.विदर्भ प्रांत सहसंघचालकांनी त्यावेळी वाजपेयींचे स्वागत केले होते त्यावेळी सुदर्शन आणि वाजपेयी यांचे मतभेद होते अशी जोरदार चर्चा होती असे नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार विकास वैद्य सांगतात.

Leave A Reply

Your email address will not be published.