Just another WordPress site

शिर्डी विमानतळावर रात्री साडेनऊ वाजता हैदराबादहून आलेल्या विमानाचे स्वागत !! शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू !!

शिर्डी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.३१ मार्च २५ सोमवार

शिर्डी विमानतळावर काल रविवारी (३० मार्च) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘नाईट लँडिंग’ सेवेची सुरुवात झाली असून यामुळे शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.साईबाबांच्या दर्शनासाठी येणारे भाविक अथवा कामानिमित्त शिर्डीवरून ये-जा करणारे आता कोणत्याही वेळी प्रवास करू शकतात.शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सेवा सुरू झाल्यामुळे शिर्डी व परिसरातील औद्योगिक विकासालाही चालना मिळू शकते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती देत त्यांचा आनंद व्यक्त केला आहे.फडणवीस यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून म्हटले आहे की “गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीने (एमएडीसी) हैदराबादहून आलेल्या इंडिगो विमानाचे स्वागत केले.हैदराबादहून सुटलेले इंडिगो विमान रात्री ९.३१ वाजता शिर्डीच्या विमानतळावर उतरले यावेळी एमएडीसीने विमानातील प्रवाशांचे स्वागत केले.हे नाइट लँडिंग महाराष्ट्राच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रवाशांसाठी सोयी आणि जगभरातील श्री साई बाबा भक्तांसाठी कनेक्टिव्हिटी वाढवणारी ही घटना आहे.

मुरलीधर मोहोळ म्हणाले,नाईट लॅडिंग सुविधा सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एटीसी अर्थात एअर ट्रॅफिक कंट्रोल संदर्भातील सर्व परवानग्या,सीआयएसएफ जवानांची पूर्तता तसेच धावपट्टीचे रिकार्पेटिंग याचा आढावा प्रत्यक्ष शिर्डी विमानतळावर बैठक घेऊन घेतला होता.शिवाय संबंधित विभागांना काम वेळेत पूर्ण करण्यासंदर्भातही सूचित केले होते.शिवाय ३१ मार्च २०२५ पूर्वी ‘नाईट लँडिंग’ सुरू करावे या संदर्भातही सविस्तर चर्चा अधिकाऱ्यांसमवेत झाली होती आणि आज नियोजित तारखेच्या एक दिवस आधीच ही सेवा सुरू करण्यात यश आले आहे.नाशिक कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमातळ केंद्रबिंदू ठरेल असे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.

       अखेर शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन नाईट लँडिंगला सुरुवात

night landings begin at Shirdi International Airport
रात्री ९ वाजून ५० मिनीटाने शिर्डी विमानतळावरुन हैदराबादकडे ७५ प्रवाशी घेऊन विमानाने उड्डाण केले

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी रात्री ३० मार्चपासुन नाईट लँडिंग सुरु झाली असून हैदराबादवरुन इंडीगो एअरलाईनचे विमान ५६ प्रवाशांना घेऊन रात्री साडेनऊ वाजता शिर्डी विमानतळावर उतरले.तर रात्री ९ वाजून ५० मिनीटाने शिर्डी विमानतळावरुन हैदराबादकडे ७५ प्रवाशी घेऊन विमानाने उड्डाण केले.दोन वर्षीच्या प्रतीक्षेनंतर शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन रात्रीची विमानसेवा (नाइट लॉंडिंग) सुरु झाल्याने या विमानतळाने आणखी एक प्रगतीचे पाऊस टाकले आहे.या विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांचे माजी खा डॉ सुजय विखे व आधिकाऱ्यांनी केक कापत एकमेकाला केक भरवत स्वागत केले आहे.यावेळी शिर्डी विमानतळाचे संचालक कृष्णा पॉल व विमानतळाचे अधिकारी उपस्थित होते.विमानतळ प्रशासनाने रात्रीच्या विमानाने येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांच्या स्वागतासाठी आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुग्यांची सजावट केली होती.हैदराबाद वरुन रविवारी ७ वाजुन ५५ मिनीटाने ५६ प्रवासी घेऊन इंडीगोचे ६ ई ७०३८ हे विमान शिर्डी विमानतळावर ९ वाजून ३० मिनीटाने पोहचले.शिर्डी विमानतळावरुन ९ वाजून ५० मिनीटाने ७५ प्रवाशी घेऊन इंडीगोचे ६ ई ७०३९ हे विमान रात्री ११ वाजुन २५ मिनीटाने हैदराबादला पोहचले.

गेल्या आठ वर्षांपासून नाइट लॉंडिंगची साईभक्तांना प्रतिक्षा होती.नाइट लँडिंग सुरू झाल्यामुळे या विमानतळाच्या विकासात नवीन पाऊल ठरणार आहे.अनेक वेळेस नाइट लॉंडिंगची घोषणा झाली होती मात्र प्रत्यक्षात सुरुवात झालीच नव्हती.शिर्डी विमानतळ हे सुरु झाल्यापासुन प्रवाशांच्या सर्वाधिक पंसतीला उतरलेले विमानतळ आहे.सध्या या विमातळावरुन दिवसा ८ विमाने येतात तर ८ विमाने जातात अशा १६ फेऱ्या या विमानतळावरुन सुरु आहे.महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने नाईट लँडिंगसाठी आवश्यक असलेले सर्व कामे पुर्ण करत केंद्राकडे परवानगी मागीतली होती.केंद्राच्या नागरी विमान वाहुतुक महासंचालनालयाने फेब्रवारी २३ मध्ये नाईट लँडिंगला परवानगी दिली.त्यांनतर एप्रिल २३ मध्ये दिल्लीहून आलेल्या इंडीगो एअरलाइन्सचे पहिल्या रात्रीच्या विमानाची यशस्वी चाचणी झाली आणी या विमानतळाच्या विस्ताराचे आणि परिसराच्या प्रगतीचे एक नवे दालन खुले झाले होते.यशस्वी चाचणी नंतर दोन वर्षाने ही सेवा सुरु झाली आहे.नाईट लँडिंग सुरु झाल्यानंतर साईबाबांच्या काकडआरतीला उपस्थित राहू इच्छिणार्‍यांना रात्री प्रवास करुन येता येणार आहे.एकूणच भाविकांना मोठ्या सुविधा यामुळे निर्माण होणार आहेत.रात्रीच्या विमानसेवेमुळे या परिसराच्या विकासाला सुद्धा गती प्राप्त होणार आहे.शिर्डीत भाविकांच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ यामुळे अपेक्षित आहे.सुरुवात हैदराबाद विमानसेवेने झाली असली तरी भविष्यात इतर ठिकाणीही रात्रीची विमानसेवा सुरु होईल.नाईट लँडिंग सेवा सुरू झाल्यानंतर विमानतळावर माध्यमांशी बोलतांना माजी खा.डॉ.सुजय विखे म्हणाले की नाशिकमध्ये कुंभमेळा होणार असल्यामुळे शिर्डी विमानतळ संपूर्ण विमान उद्योगाचे केंद्र बनेल असा आमचा प्रयत्न आहे तसेच नवीन विमानतळ लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.शिर्डी विमानतळ ५०० कोटी रुपये खर्चून नव्याने बांधले जाणार असून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे असेल.या विमानतळावर किमान चार ते पाच एरो ब्रिजची सुविधा असेल.आमचा प्रयत्न आहे.हे नवीन विमानतळ २०२७ पूर्वी पूर्ण होईल ज्यामुळे नाशिक येथे कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होईल या संदर्भात पुढील आठवड्यात आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली हे विमानतळ दोन वर्षांत पूर्ण करू असा विश्वासही विखे यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.