यंदाच्या हंगामात पाऊसकाळ बक्कळ !! पडेल तिथे सोन पिकेल,शेळ्या-मेंढ्या राखेल तो सुखी हुईल !! कृष्णाकाठच्या आमणापूरनजीक बंचाप्पा बनात वर्तवण्यात आले भाकीत !!
दरम्यान पलूस तालुक्यातील बुर्ली-आमणापूर-कृष्णाकाठावर बंचाप्पा बन हे सुमारे ऐंशी एकराचे गायरान असून याठिकाणी असणाऱ्या बंचाप्पा मंदिरात चैत्र पाडव्याच्या निमित्त हजारो भाविक व भक्तांच्या उपस्थितीत काल भाकणुकीचा कार्यक्रम पार पडला.यावेळी बुर्ली,आमणापूर,पलूस,रामानंदनगर,येळावी या पाच गावांतील धनगर समाज ध्वज,कैताळ व ढोल घेऊन उपस्थित राहिले.यावेळी आसमंत निनादणाऱ्या वालूक वादनाचा कार्यक्रम केला.भंडाऱ्याची उधळण करत बंचाप्पा,मायाप्पाच्या नावे चांगभलच्या घोषणा देत विधी पार पडला.यामध्ये सुनील खोत सिद्धेवाडी,शिवाजी पाटील बुर्ली यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले.यावेळी वर्तवण्यात आलेल्या भाकणुकी मध्ये पाऊसकाळ बक्कळ राहील,पडेल तिकडे सोन पिकेल,शेळी-मेंढी राखेल तो सुखी होईल असे सांगण्यात आले.गुढीपाडवा आणि दसऱ्याला बंचाप्पा त्याचा भाऊ मायाप्पाला भेटायला जातो अशी आख्यायिका आहे.यानिमित्त बुर्ली येथून बंचाप्पाची पालखी काढून ती वाद्यांच्या गजरात किर्लोस्करवाडी कारखाना परिसरात असलेल्या मायाप्पा मंदिरात नेली जाते.या यात्रेसाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती देत असतात.