जेजुरी मंदिर परिसरात व गडावर भेसळयुक्त भंडारा विक्री !! भंडाऱ्यात होणारी भेसळ रोखावी-विश्वस्तांकडून सरकारकडे कारवाईची मागणी !!
जेजुरी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०१ एप्रिल २५ मंगळवार
जेजुरीत उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्यामुळे जेजुरीला ‘सोन्याची जेजुरी’ म्हटले जाते मात्र हाच पिवळा भंडारा आता जेजुरीतील भाविकांच्या व स्थानिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असून या भंडाऱ्यात होत असलेल्या भेसळीमुळे भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच येथील ऐतिहासिक जेजुरी गडाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने व सरकारने या गंभीर प्रकरणात लक्ष घालून भंडाऱ्यात होणारी भेसळ रोखावी अशी मागणी जेजुरीतील मार्तंड देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी केली आहे.
शिवराज झगडे म्हणाले,बाहेरील व्यापारी जेजुरी मंदिर परिसरात व गडावर भेसळयुक्त भंडारा विकत असून टर्मरिक पावडर,यल्लो पावडर,नॉन एडिबल पावडर असे शिक्के असलेल्या पिशव्या येथे विक्रीस आणल्या जात आहेत व या पावडरची सर्रास विक्री होत आहे त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना त्याचा फार त्रास सहन करावा लागत आहे.स्थानिक ग्रामस्थांना व नियमित वारकऱ्यांना या पावडरचा त्रास होत आहे याबाबत आम्ही शुक्रवारी (२८ मार्च) अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट घेतली तसेच आम्ही त्यांना भेटून यासंदर्भात निवेदन दिले आहे.मार्तंड देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त म्हणाले,आम्ही मंत्री नरहरी झिरवाळ यांना भेटून त्यांना आवाहन केले आहे की जेजुरीत विकल्या जाणाऱ्या भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाई करावी.अन्न व औषध प्रशासनाने या भंडाऱ्यावर प्रतिबंध घालून कठोरात कठोर कारवाई करावी असे विश्वस्त शिवराज झगडे यांनी नमूद केले आहे.