दि.०२ एप्रिल २५ बुधवार
उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये मुस्कान रस्तोगी नामक महिलेने प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या पतीची हत्या केली व त्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करून एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरले. सदर गुन्ह्याच्या घटनेची बातमी देशभरात पसरली व या बातमीचा धसका घेऊन संत कबीर नगर येथील बबलू नामक इसमाने स्वतःच्या पत्नीचे लग्न तिच्या प्रियकराशी लावून दिले.या बातमीचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.“मी मुलांना सांभाळतो,तू जा” असे पतीने म्हटले होते पण लग्नाच्या अवघ्या चार दिवसानंतर पत्नी पुन्हा पहिल्या पतीच्या घरी परतली आहे.
दरम्यान संत कबीर नगर मधील बबलूला त्याची पत्नी राधिका आणि गावातीलच एक मुलगा विकास यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे कळले.सदर संबंध समोर आल्यानंतर त्यांच्याशी वाद घालण्याऐवजी बबलूने दोघांचेही लग्न लावून दिले.२५ मार्च रोजी मंदिरात राधिका आणि विकासचे लग्न होण्यापूर्वी बबलूने न्यायालयात नोटरी केलेले शपथपत्रही सादर केले होते.पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत असतांना बबलूने म्हटले होते की,गेल्या काही अनैतिक संबंधामुळे पत्नीने पतीचा खून केल्याचे प्रकार समोर आले आहेत.मेरठमध्ये जे झाले ते ऐकल्यानंतर मी पत्नी आणि तिच्या प्रियकराचे लग्न लावून देण्याचे ठरवले जेणेकरून दोघेही शांततेत राहू शकतील.
मात्र लग्नाच्या दोन दिवसानंतर बबलू विकासच्या घरी गेला आणि त्याने राधिकाला पुन्हा घरी पाठविण्याची विनंती केली.आपल्या दोन मुलांची काळजी घेत असतांना अनेक अडचणी येत असल्याचे बबलूने सांगितले व त्यानंतर विकासच्या कुटुंबियांनी राधिकाला पुन्हा बबलूकडे पाठविण्यासाठी होकार दिला.विकासची आई गायत्री देवी यांनी सांगितले की,आम्ही पहिल्या दिवसापासून या लग्नाच्या विरोधात होतो पण बबलूने जेव्हा मुलांचा विषय काढला तेव्हा आम्हाला राहावले नाही त्यामुळे आम्ही राधिकाला पुन्हा तिच्या घरी पाठविण्याचा निर्णय घेतला.माध्यमांशी बोलतांना गायत्री देवी म्हणाल्या,लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी राधिका पुन्हा तिच्या पहिल्या पतीच्या घरी परतली आहे. त्याने सांगितले की,मुलांची काळजी घेणे त्याला एकट्याला जमत नाही व त्यानंतर त्याची चूकही त्याला कळली.आम्ही त्याच्या मुलांकडे पाहिले आणि राधिकाला पुन्हा तिच्या घरी जाण्याची परवानगी दिली.या घटनेनंतर बबलू आणि त्याचे कुटुंबिय राहते घर सोडून इतर ठिकाणी राहण्यास गेले आहेत तर विकासनेही रोजगारासाठी त्याचे गाव सोडले आहे.