निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिव (प्रायव्हेट सेक्रेटरी) म्हणून नियुक्ती !!
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०२ एप्रिल २५ बुधवार
निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिव (प्रायव्हेट सेक्रेटरी) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्या भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) अधिकारी आहेत.भारत सरकारच्या मनुष्यबळ आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) २९ मार्चला यासंदर्भातील आदेश दिला असून त्यात म्हटले आहे की,कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने निधी तिवारी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे व हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू होणार असल्याची माहिती मनुष्यबळ आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) दिली आहे.आतापर्यंत निधी तिवारी पंतप्रधान कार्यालयात डेप्युटी सेक्रेटरी म्हणून कार्यरत होत्या व त्यांची नियुक्ती को-टर्मिनस स्वरूपाची आहे म्हणजेच पंतप्रधानांचा कार्यकाळ संपेपर्यंत किंवा त्या पदाबाबत पुढील आदेश येईपर्यंत ही नियुक्ती असणार आहे.पंतप्रधान मोदी यांच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजाचे नियोजन,त्यांच्या शेड्यूलचे व्यवस्थापन करणे,धोरण आणि प्रशासकीय समन्वय आणि कम्युनिकेशन इत्यादी कामाची जबाबदारी निधी तिवारी यांच्यावर असणार आहे.
दरम्यान निधी तिवारी २०१४ बॅचच्या आयएफएस अधिकारी आहेत व त्यांना २०१३ च्या सिव्हिल सेवा परीक्षेत ९६ वा रँक किंवा क्रमांक मिळाला होता.नव्या पदावर नियुक्ती होण्यापूर्वी जवळपास अडीच वर्षांपासून निधी तिवारी पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) कार्यरत होत्या.खासगी सचिव म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्या पंतप्रधान कार्यालयात उप सचिव पदावर काम करत होत्या व या पदावर असतांना त्या परराष्ट्र आणि संरक्षणाशी संबंधित प्रमुख विभागांचे काम सांभाळत होत्या.त्याआधी नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांची पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) अंडर सेक्रेटरी या पदावर नियुक्ती झाली होती.२०१३ मध्ये सिव्हिल सेवा परीक्षा पास होण्यापूर्वी त्यांनी वाराणसीत सहाय्यक आयुक्त (वाणिज्य कर) म्हणून काम केले होते.निधी तिवारी यांचे पती सुशील जायसवाल पेशाने डॉक्टर आहेत व वाराणसीत त्यांचे हॉस्पिटल आहे.निधी तिवारी यांच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करतांना डॉ.सुशील जायसवाल म्हणाले,”सिव्हिल सेवेत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळत असतात मात्र ही एक खूप मोठी जबाबदारी आहे.निधी खूप मेहनती आहेत आणि त्यांच्या कामात त्यांना खूप रस देखील आहे.”
पंतप्रधान कार्यालयात काम करण्याआधी निधी यांची नियुक्ती परराष्ट्र मंत्रालयात होती व तिथे त्या नि:शस्त्रीकरण (डिसआर्मामेंट) आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेबाबतच्या टीममध्ये होत्या.पंतप्रधान कार्यालयात गेल्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमधील त्यांची जाण महत्त्वाची ठरली.तिथे त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांच्या अंतर्गत काम करतांना ‘परराष्ट्र आणि संरक्षण’ या विभागांमध्ये योगदान दिले होते.निधी तिवारी मूळच्या लखनौच्या आहेत व पदवीपर्यंत शिक्षण त्यांनी लखनौमध्येच घेतले आहे.त्यांनी बीएससी (जीवशास्त्र)ची पदवी घेतली आहे तर पदव्युत्तर पदवी बनारस हिंदू विद्यापीठातून (बीएचयू) पूर्ण केली आहे.२००६ मध्ये त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीचे शिक्षण पूर्ण केले तिथे त्यांना सुवर्णपदक मिळाले होते.त्यानंतर भाभा अणुसंशोधन केंद्रात निधी यांची निवड वैज्ञानिक म्हणून झाली.२००८ मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आणि सिव्हिल सेवा परीक्षेची तयारी सुरू केली.

डॉ.सुशील जायसवाल म्हणतात,वैज्ञानिकाच्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर दोन वेळा त्यांची निवड (२००८ आणि २००९) उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगात (पीसीएस) झाली होती.२००८ मध्ये त्या बेसिक शिक्षण अधिकारी झाल्या होत्या.तर २००९ मध्ये उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगात त्यांची निवड सहाय्यक आयुक्त (सेल टॅक्स) पदी झाली होती.२०१३ च्या सिव्हिल सेवा परीक्षेच्याआधी निधी तिवारी २०१२ च्या सिव्हिल सेवा परीक्षेत देखील पास झाल्या होत्या मात्र त्यावेळेस त्यांचे नाव वेटिंग लिस्टमध्ये होते.दरम्यान त्या वाराणसीमध्ये सहाय्यक आयुक्त (सेल टॅक्स) पदावर कार्यरत होत्या त्यानंतर २०१४ मध्ये त्या सिव्हिल सेवा परीक्षेत (२०१३) ९६ रँक किंवा क्रमांकानिशी पास झाल्या.
दरम्यान पंतप्रधान कार्यालयात डॉ.प्रमोद कुमार (पीके) मिश्रा पंतप्रधानांचे मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.पीके मिश्रा गुजरात कॅडरचे १९७२ च्या बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत.पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना,२००१ ते २००४ दरम्यान डॉ.प्रमोद कुमार मोदींचे मुख्य सचिव होते.या यादीत दुसरे नाव अजित डोभाल यांचे आहे.ते पंतप्रधान मोदींचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) आहेत.अजित डोभाल सर्वाधिक काळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी राहणारे व्यक्ती आहेत.२०१४ पासून आतापर्यंत ते या पदावर आहेत.१९६८ मध्ये अजित डोभाल आयपीएस अधिकारी म्हणून केरळ कॅडरमध्ये रुजू झाले होते.२००४-०५ मध्ये ते इंटेलिजन्स ब्युरो (गुप्तहेर संस्था)चे संचालक होते.या टीममधील आणखी एक नाव म्हणजे शक्तिकांता दास.फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांच्याकडे मुख्य सचिव-२ पदाची जबाबदारी देण्यात आली असून त्यांचा जन्म ओडिशात झाला होता व ते १९८० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.शक्तिकांता दास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पसंतीचे अधिकारी असल्याचे मानले जाते व ते सहा वर्षे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते.याशिवाय विवेक कुमार (आयएफएस २००४) आणि हार्दिक सतीशचंद्र शाह,पंतप्रधान कार्यालयात खासगी सचिव म्हणून कार्यरत आहेत.शाह २०१० च्या बॅचचे गुजरात कॅडरचे अधिकारी आहेत.