यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०२ एप्रिल २५ बुधवार
तालुक्यातील भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालय येथे पर्यावरण क्लब व प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.अजय कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणीशास्त्र विभागात पक्ष्यांकरिता हँगिंग वॉटर बर्ड फिडर कसे तयार करावे ? यासाठी कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रा.चंद्रकांत वानखेडे यांनी रिकाम्या टाकाऊ प्लास्टिक बाटल्यापासून पक्ष्यांकरिता हँगिंग बर्ड वॉटर फिडर कशाप्रकारे तयार करावे हे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखऊन मार्गदर्शन केले.सदर कार्यशाळेत नॅकचे प्रा.डॉ.गणेश चौधरी व आयक्यूएसीचे कोऑर्डिनेटर प्रा.राकेश चौधरी,प्रा.डॉ.मीनाक्षी वाघुळदे यांनी कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला.दरम्यान उन्हाळ्याची चाहूल लागली असून वन्यप्राण्यांसह पशुपक्षी पाण्याच्या शोधात भटकत आहेत व त्यांच्या तृष्णा तृप्तीसाठी नागरिकांनी आपल्या घराबाहेर,छतावर,संरक्षण भिंतीवर,भिंती तथा वृक्षांवर पक्ष्यांसाठी पिण्यासाठी पाणी ठेवणे गरजेचे आहे.पक्ष्यांनाही जीव असून त्यांच्या संवेदना जाणून घेणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरात पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था राष्ट्रीय कर्तव्य समजून बजावल्यास पक्ष्यांच्या जीवाचे रक्षण करता येईल तेव्हा प्रत्येकानेच या कार्यात पुढाकार घेवून राष्ट्रीय संपत्ती जोपासण्यासाठी माणुसकीचा वाटा उचलावा असे प्रा.चंद्रकांत वानखेडे यांनी या प्रसंगी सांगितले.प्रसंगी हँगिंग बर्ड फीडर महाविद्यालयातील झाडांवर पक्षांना पाणी पिण्यासाठी लटकविण्यात आले.तर प्राचार्य प्रा.किशोर कोल्हे यांनी कार्यशाळेचा उद्देश्य म्हणजे वाढत्या तापमानामुळे पाण्याच्या शोधात पक्षी हे फिरत असतात त्याकरिता आपण अशा प्रकारचे वॉटर फीडर घरच्या घरी तयार करून घराच्या छतांवर संरक्षण भिंतीवर अथवा वृक्षांवर पक्षांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून त्यांचे संरक्षण मध्ये आपला सहभाग असावा असा संदेश देऊन सदर कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.सदरील कार्यक्रमात विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग घेऊन हँगिंग वॉटर बर्ड फिडर तयार करून महाविद्यालय परिसरात झाडांवर लटकविण्यात आले.