यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०२ एप्रिल २५ बुधवार
तालुक्यातील किनगाव येथील इंग्लीश मीडीयम स्कुलमध्ये महिला दिनाचे औचित्य साधुन परिसरातील कतृत्वान महीलांचा विविध मान्यवरांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.आज प्रत्येक क्षेत्रात महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतांना दिसून येत आहे.परिणामी आपणही आपल्या परिसरातील कर्तुत्ववान महिलांचा गौरव तसेच सत्कार करावा अशी कल्पना इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल किनगाव येथील स्व.केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष मनिष विजयकुमार पाटील,संचालिका पुनम मनिष पाटील,प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील,उप मुख्याध्यापक सुहास भालेराव यांना सुचली.तसेच हि कल्पना त्यांनी सत्यात उतरवत आज दि.०२ एप्रिल २५ बुधवार रोजी महिला दिनाचे औचित्य साधून इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल किनगाव येथे यानिमित्ताने परिसरातील महिला बचत गट अंतर्गत कार्य करणाऱ्या ग्राम सखी,पशु सखी व सी.टी.सी.यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महिलांवर असणाऱ्या संसार कार्याच्या जबाबदारीतून थोडी मोकळीकता मिळावी यासाठी विविध खेळांचे आयोजनही करण्यात आले.यात तळ्यात मळ्यात,बकेट बॉल,बलून डान्स,नलिकेचा साह्याने बॉटल पाण्याने भरणे,गट तयार करणे,पाण्याची बाटली भरणे इ.गेम खेळून महिला सखींनी आनंद मिळवला.त्यानंतर सत्कार समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्व. केतन दादा मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष व इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलचे सचिव मनीष विजयकुमार पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून वर्षा पाटील आणि बँक सखी माधुरी सोनवणे,स्व.केतन दादा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संचालिका पूनम मनिष पाटील,मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.त्यानंतर पुनम मनिष पाटील व महिला शिक्षिका यांनी किनगावसह परिसरातील सर्व महिला बचत गटाच्या ग्राम सखी,पशु सखी,सी.टी.सी,व सीआरपी इत्यादी गटाअंतर्गत कार्य करणाऱ्या महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला.यावेळी आलेल्या महिला सखींनी आपल्या मनोगतातून संसाररुपी गाडा ओढुन कशा पद्धतीने बचत गटाचे कार्य करावे लागते याबाबत माहिती सांगितली.आपण यापुढे बचत गटातील सचिव व अध्यक्ष यांचाही सत्कार करणार असल्याचे मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील यांनी आपल्या मनोगतातुन सांगितले.तर शाळेचे सचिव मनीष विजयकुमार पाटील यांनी महिला सखींच्या कार्याचा गौरव आपल्या मनोगतातून विशद केला.पूनम मनिष पाटील यांनी विचार व्यक्त करतांना महिला या घरातील संसारातील कामे सांभाळून कार्यही पेलून नेट आहेत त्याचप्रमाणे आपण काम करीत असतांना आपली मुले आणि आपण सुरक्षित आहोत की नाही ? आपली मुले त्यांना येणाऱ्या अडचणीबाबत आपल्याशी हितगुज करतात की नाही ? हेही आपण पाहिले पाहिजे कारण समाजात विविध अमाणूष कृत्य घडत आहेत मग ते मुलांसोबत वा मुलींसोबत कोणासोबतही घडू शकतात म्हणून आपण सतर्क राहिले पाहिजे अशी भावनिक साद त्यांनी मनोगतातून व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा धनगर व प्रास्ताविक तिलोत्तमा महाजन यांनी केली तर आभार प्रदर्शन योगिता बिहारी यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.