दरम्यान आपले सरकार सेवा केंद्र दुप्पट करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी जिल्हाधिकारी,जिल्हा गव्हर्नन्स सोसायटी व जिल्हा सेतू समितीने ३० दिवसात करावेत असेही आदेश देण्यात आले आहेत.५० रुपये शुल्क करण्यात आल्यानंतर त्यामध्ये राज्य सेतू केंद्रांचा वाटा ५ टक्के,महाआयटीचा वाटा २० टक्के,जिल्हा सेतू सोसायटीचा वाटा १० टक्के तर आपले सरकार सेवा केंद्र चालकाचा वाटा ६५ टक्के राहणार आहे.आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून सेवांचे दर वाढवण्याची मागणी करण्यात आली होती व त्याचा विचार करून सध्याच्या सेवा दरात सुधारणा करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.परिणामी नवीन निकषानुसार प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात २ आपले सरकार सेवा केंद्र स्थापण्यात येईल मात्र ५ हजारपेक्षा अधिक लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार) असलेल्या ग्रामपंचायतीत किमान ४ केंद्र स्थापन करण्यात येईल.शहरी भागांतील केंद्रासाठी महापालिका व नगरपरिषद येथील १० हजार लोकसंख्येसाठी दोन केंद्र,प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रात किमान २ केंद्र स्थापन करण्यात येईल मात्र ५ हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीत किमान ४ केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत या निकषात आवश्यकतेप्रमाणे बदल करण्यात येतील.

घरपोच सेवेसाठी १०० रुपये अतिरिक्त

आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार आपले सरकार पोर्टलवर प्रत्येक घरपोच सेवेच्या नोंदणीसाठी १०० रुपये (कर वगळून) शुल्क निश्चित करण्यात आले आहे व हे शुल्क आपले सरकार सेवा केंद्र चालकांमार्फत नागरिकांकडून गोळा करण्यात येईल.त्यामध्ये महाआयटी सेवादराचा वाटा २० टक्के तर आपले सरकार सेवा केंद्रचालकाचा वाटा ८० टक्के असेल.या दराव्यतिरिक्त प्रति अर्ज रुपये ५० रुपयाप्रमाणे अर्जदाराकडून सेवाशुल्क घेण्यात येईल असे याबाबत नमूद करण्यात आले आहे.