मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०३ एप्रिल २५ गुरुवार
घराच्या नोंदणीसाठी आपल्याला उपनिबंधक कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात जावे लागते व बऱ्याच वेळा लोकांना अनेक तास या कार्यालयांमध्ये ताटकळत बसावे लागते.अनेकदा सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात.काही वेळा,काही ठिकाणी आपले काम करून घेण्यासाठी लोकांना दलालांना पैसे द्यावे लागतात व हा सगळा प्रकार आता थांबणार आहे कारण राज्य सरकारने घरांच्या नोंदणीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता राज्यात कुठेही बसून कुठल्याही जिल्ह्यातील घरांची नोंदणी करता येईल व ही सगळी प्रक्रिया ऑनलाइन असेल.राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांसमोर याबाबतची माहिती जाहीर केली आहे.महायुती सरकार राज्यात १ मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’ ही पद्धत सुरू करणार असल्याचे बावनकुळे यांनी जाहीर केले आहे.
घरी बसून मुद्रांक नोंदणी करता येणार : बावनकुळे !!
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,घर खरेदी-विक्री करतेवेळी नोंदणीसाठी सरकारी कार्यालयात जावे लागते व तिथे अनेक हेलपाटे मारावे लागतात.नोंदणी करतांना मध्ये दलालांचा अडथळा असतो.यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शी व गतीमान सरकारच्या १०० दिवसांचा कार्यक्रम दिला होता त्याअंतर्गत महसूल खात्याच्या मुद्रांक निरिक्षकांनी व महानिरिक्षकांनी एक चांगला उपक्रम पुढे आणला असून ‘एक राज्य एक नोंदणी’ अशी पद्धत आपले सरकार सुरू करत आहे व त्याअंतर्गत राज्यातील कुठलीही नोंदणी,मुद्रांक नोंदणी घरी बसून करता येणार आहे.
१ मे पासून एक राज्य एक नोंदणी प्रक्रिया सुरू होणार : महसूल मंत्री !!
महसूल मंत्री म्हणाले,तुम्ही एखादे घर खरेदी केले असेल तर कुठेही बसून त्याची नोंदणी करता येईल.पुण्यात बसून नागपुरातील घराची,मुंबईत बसून पुण्यातील घराची नोंदणी करता येईल व ही सगळी फेसलेस प्रक्रिया असेल.तुमचे आधार कार्ड व आयकर दस्तऐवजांच्या मदतीने तुम्ही फेसलेस नोंदणी करूशकता.ऑनलाइन मुद्रांक नोंदणी व ‘एक राज्य एक नोंदणी’ प्रक्रिया आपण १ मेपासून सुरू करत आहोत.देवेंद्र फडणवीस यांनी डिजीटल इंडिया,डिजीटल महाराष्ट्राचा संकल्प केला आहे.आमचे सरकार त्यावर काम करत आहे.सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर मुंबई व उपनगरांत अशी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती जी आता राज्यभर सुरू होत आहे असे महसूल मंत्र्यांनी नमूद केले आहे.