Just another WordPress site

आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आयोजित इस्रो (ISRO) सहल यशस्वीरीत्या पूर्ण !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०५ एप्रिल २५ शनिवार

येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांच्या वतीने इस्रो (ISRO) सहल यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली असून या शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांना इस्रोच्या विविध प्रकल्पांची माहिती मिळाली तसेच उपग्रह निर्मितीची प्रक्रिया समजली आणि अंतराळ संशोधनाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा थेट अनुभव घेता आला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारा ठरला.

दरम्यान या सहलीकरिता जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमातून निधी प्राप्त करुन देण्यात आला होता व या उपक्रमासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांनी आभार मानले.तसेच केन्द्रीय मंत्री रक्षा खडसे,राज्याचे मंत्री गिरीश महाजन,मंत्री संजय सावकारे आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.सदर सहलीत एकूण १८ विद्यार्थी आणि ६ शिक्षक-कर्मचारी सहभागी झाले होते.या सहलीत विद्यार्थ्यांनी अहमदाबाद येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटरला भेट दिली तसेच सायन्स सिटीमध्ये एक्वेरियम, रोबोटिक्स,आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर वैज्ञानिक विभागांचा अभ्यास केला व हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी होता.
विद्यार्थ्यांनी रेल्वेने प्रवास करत सहलीला सुरुवात केली होती तर परतीचा प्रवास विमानाने करण्यात आला यामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या प्रवासाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली.

या सहलीचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढवणे,संशोधनाची आवड निर्माण करणे आणि भविष्यातील अंतराळ क्षेत्रातील संधींची माहिती देणे हा होता. विद्यार्थ्यांनी सहलीच्या अनुभवातून आपली वैज्ञानिक जिज्ञासा अधिक प्रगल्भ केल्याचे स्पष्ट झाले आहे.विद्यार्थ्यांनी व शिक्षक-कर्मचाऱ्यांनी या सहलीबाबत आपले सकारात्मक अभिप्राय व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी अंतराळ संशोधनाच्या प्रत्यक्ष अनुभवामुळे आपला आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले.काही विद्यार्थ्यांनी भविष्यात वैज्ञानिक किंवा अंतराळ संशोधक बनण्याची इच्छा व्यक्त केली.शिक्षकांनी अशा सहलींमुळे विद्यार्थ्यांना नवीन शिकण्याचा अनुभव मिळतो आणि त्यांची जिज्ञासा वाढते असे सांगितले.या सहलीचे यशस्वी आयोजन यावल येथील आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवनकुमार पाटील,आर.एम.लावणे,संदीप पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी एल.एम.पाटील,एम.आर.सुलताणे,व्हि.डी.गायकवाड व एम.डी.पाईकराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.