दरम्यान देशाच्या वेगवेगळ्या भागात बर्ड फ्ल्यूची लागण झाली असली तरीही व्यावसायिक कुक्कुटपालन केंद्रात (पोल्ट्री) अद्याप बर्ड फ्ल्यूची लागण झाली नाही पण संभाव्य धोका टाळण्यासाठी जैव सुरक्षेची काळजी घेण्यासह कोंबड्यांना भोपाळ येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने तयार केलेली एच ९ एन २ (लो पॅथोजेनिक एव्हियन एन्फ्लूएंझा) या प्रतिबंधक लस देण्याची सूचना दिली आहे.देशात २००६ मध्ये पहिल्यांदा कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाली होती व त्यानंतर आता बर्ड फ्ल्यूच्या विषाणूंचे अन्य प्रजातींमध्ये संक्रमण झाले आहे.वाघ,बिबटे,मांजरांसह जंगली पक्ष्यांना झालेली लागण धोक्याची घंटा मानली जात आहे.भविष्यात बर्ड फ्ल्यूच्या विषाणूचे मानवा-मानवांमधील संक्रमण टाळण्यासाठी जगभरात संशोधन सुरू झाले आहे.राज्यात २०२१ मध्ये आलेल्या बर्ड फ्ल्यू साथीच्या काळात एकत्रित उपाययोजना करून साथ नियंत्रणात आणली होती.पशुसंवर्धन विभागाने तातडीने नियंत्रण आणि उपायोजना करणारी मार्गदर्शक प्रणाली (एसओपी) विकसीत केली आहे.वाघ,कावळे आणि परसबागेतील कोंबड्यांना लागण झाल्याची घटना राज्यात घडली असली तरीही पोल्ट्रीतील कोंबड्यांना अद्याप लागण झालेली नाही.पशुसंवर्धन विभाग त्याबाबत सतर्क आहे अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे सह आयुक्त देवेंद्र जाधव यांनी म्हटले आहे.