दरम्यान घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे,पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी भेट दिली तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या.तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करतांना गुन्हा करणारे दोन संशयित टेम्पोमधून सिन्नरमार्गे नाशिककडे जात असल्याची माहिती मिळाली व त्यानुसार पळशी टोलनाका येथे सापळा रचून टेम्पोमध्ये पाठीमागील बाजूस बसलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले.या शोधासाठी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व तेथील पोलिसांनीही मदत केली.भोसले कुटुंब हे मूळचे कोपरगाव तालुक्यातील संवत्सरचे व ते आजोळी काकडी शिवारात राहायला आलेले आहेत.त्यांची काकडी शिवारात सहा एकर शेती आहे.दुधाचा व्यवसाय आहे.घराजवळच गाईचा गोठा आहे.घरात साहेबराव,त्यांची पत्नी साखरबाई,मुलगा कृष्णा व ८० वर्षांची वृद्धा असे चौघेजण राहतात.काल सकाळी नेहमीप्रमाणे भोसले कुटुंबातील व्यक्ती दूध घालण्यासाठी न आल्यामुळे काही जणांनी वस्तीवर जाऊन पाहिले असता त्यांनाही धक्कादायक घटना निदर्शनास आली.घराच्या बाहेर पडवीत झोपलेला कृष्णा भोसले हा खाटेवरच रक्ताच्या थारोळ्यात आढळला व त्याचा जागीच मृत्यू झाला होता.घरात त्याची आई साखरबाई व वडील साहेबराव हे दोघे जखमी अवस्थेत व रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.दोन्ही जखमींना तातडीने लोणी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचार सुरू असतांना साहेबराव भोसले यांचा मृत्यू झाला तर साखरबाई भोसले यांची प्रकृती गंभीर आहे.प्रारंभी ही घटना चोरी,दरोडा की अन्य कोणत्या कारणाने झाली याचा संभ्रम होता मात्र पोलिसांनी अवघ्या १२ तासांतच गुन्ह्याची उकल करत दोघांना ताब्यात घेतले आहे.