मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०७ एप्रिल २५ सोमवार
देशात अनेक वर्षांपासून हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांमध्ये वाढ झाली असून या हृदयविकाराच्या झटक्याने तरुण आणि मुलांसह अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत व याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहेत.सध्या अशीच घटना धाराशिव येथील महाविद्यालयाच्या निरोप समारंभात घडली असून ज्यात एका विद्यार्थिनीने भाषणा दरम्यानच आपले प्राण सोडले असून धाराशिव जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या धक्कादायक व्हिडीओमध्ये एक विद्यार्थीनी अगदी हसत खेळत महाविद्यालयाच्या निरोप समारंभात भाषण देताना दिसत आहे परंतु काळाने तिचा घात केला व भाषण देता देता अचानक ती स्टेजवरून खाली कोसळली.परंडा धाराशिव शिंदे महाविद्यालयात ही विद्यार्थीनी शिकत असल्याचे वृत्त आहे.वर्षा खरात असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती बीएससीच्या वर्गात शिक्षण घेत होती.कार्यक्रमा दरम्यान वर्षा स्टेजवर भाषण करत होती व भाषण करत असतांना अचानकच तिला भोवळ आली आणि खाली ती कोसळली तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.प्राथमिक माहितीनुसार वर्षाच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचे असू शकते मात्र अद्याप स्पष्ट कारण समोर आलेले नाही.
विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटी बोलताना वर्षा म्हणाली होती,“प्रत्येक जण आपापल्या परीने जेवढे जमेल तेवढे शिकतो,” असे ती म्हणाली त्यानंतर ती विनोद करत वर्गाला हसवले होती.काही क्षणातच तिच्या आयुष्याचा असा शेवट झाला.सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @marathwada_marathi_news या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला “कशी लागली काळाची चाहूल” अशी कॅप्शन देण्यात आलेली आहे तसेच या कॅप्शनमध्ये पुढे “धाराशिवची विद्यार्थिनी निरोप समारंभात मनसोक्त भाषण करतांना स्टेजवरच कोसळली,हॉर्ट अटॅकमुळे घेतला कायमचा निरोप” असेही लिहिण्यात आलेले आहे.व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच याला ५३ लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत.विद्यार्थीनिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने कमेंट करत लिहिले, “धर्मापेक्षा निसर्ग सर्वांचा बाप आहे,तो वेळोवेळी हेच सांगत असतो.एखाद्या चांगल्या व्यक्तीला क्षणात उचलेल.. भावपूर्ण श्रद्धांजली” तर दुसऱ्याने “नशिबापुढे कोणाचेही चालत नाही” अशी कमेंट केली आहे.