पाडळसे गावातील RO पाणी प्रकल्प बंदमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप !! जबाबदारांवर कारवाईची ग्रामस्थांची मागणी !!
सुरज सपकाळे,पोलीस नायक
पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :-
दि.०७ एप्रिल २५ सोमवार
तालुक्यातील पाडळसे येथील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायतीने १५ वा वित्त आयोगाच्या निधीतून ६.४० लाख रुपये खर्चून RO (रिव्हर्स ऑस्मोसिस) पाणी शुद्धीकरण प्रकल्प सुरू केला होता.मात्र अवघ्या एक वर्षाच्या आतच हा प्रकल्प बंद पडला असून प्लँटला कुलूप लावण्यात आले आहे यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप असून याला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा उघड !!
गावातील शेकडो नागरिक या प्रकल्पाच्या माध्यमातून शुद्ध पाणी मिळण्याच्या अपेक्षेने होते मात्र सुरुवातीला काही काळ हा प्रकल्प सुरळीत सुरू राहिल्यानंतर देखभाल व दुरुस्तीअभावी बंद पडल्याचे समोर आले आहे.एका स्थानिक नागरिकाने सांगितले,”गावासाठी एवढा मोठा निधी खर्च करून RO प्लँट उभारला पण त्याचा उपयोगच होत नसेल तर तो पैशांचा अपव्ययच आहे व पुन्हा अशुद्ध पाणी प्यावे लागते याचा त्रास आम्हालाच सहन करावा लागत आहे.”
प्रकल्प बंद पडण्याची प्रमुख कारणे !!
१. देखभालीचा अभाव: RO प्लँट सुरू राहण्यासाठी नियमित देखभाल आणि व्यवस्थापन आवश्यक होते पण ग्रामपंचायतीकडून याकडे दुर्लक्ष झाले.
२. निविदा प्रक्रियेतील त्रुटी: प्रकल्पाचे काम कोणत्या ठेकेदाराला देण्यात आले ? योग्य दर्जाचे यंत्रसामग्री बसवण्यात आले का ? याची सखोल चौकशी गरजेची आहे.
3. ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष: ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही.
चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करा – ग्रामस्थांची मागणी !!
ग्रामस्थांनी हा प्रकल्प त्वरित सुरू करण्याची मागणी केली असून यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.परिणामी यावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काय कारवाई केली जाणार किंवा जिल्हा परिषद यावर काय निर्णय घेणार ? याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.