जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
राज्यभरातील शिक्षकांना सध्या अनेक अडीअडचणी व विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.याबाबत शिक्षकांच्या समस्या लक्षात घेऊन शिक्षक भारती या शिक्षक संघटनेने पुढाकार घेऊन त्यांच्या विविध समस्यांबाबतचे निवेदन नुकतेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी,शिक्षणाधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना देण्यात आलेले आहे.
या निवेदनात सन २००३ ते २००५ मध्ये सेवेत रुजू शिक्षण सेवकांच्या मागील सर्व कपाती जीपीएफ मध्ये व्याजासह वर्ग करण्यात यावे,एप्रिल २०२१ पासून आजतागायत प्रलंबित वैद्यकीय बिले व इतर फरकांच्या रकमेचे अनुदान तालुका स्तरावर उपलब्ध व्हावे,सेवा पुस्तकांचे पडताळणी कॅम्प तालुका स्तरावर लावून सेवा पुस्तके ऑनलाईन अद्ययावत अरण्यात याव्या,सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी सर्व रकमांचे चेक देऊन जि.प.तर्फे सन्मान करण्यात यावा,वस्तीशाळा शिक्षकांची मूळ नियुक्ती दिनांकाची नोंद सेवा पुस्तकात करण्यात यावी,ग्रेडेड मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रक्रिया तात्काळ राबविण्यात यावी,वरिष्ठश्रेणी निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर करण्यात यावा,२०१९ पासून नियुक्त पदवीधर शिक्षकांना नियमित पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्त करण्यात यावे,ज्या ठिकाणी ग्रेडेड मुख्याध्यापक नाही त्या ठिकाणी सिनियर शिक्षकालाच लिपिकाचे काम करावे लागत आहे.सदरहू अशा शाळांमध्ये केंद्र शाळेवर किमान एका अधिकाऱ्याची नेमणूक करून कागदपत्रे यांची जुडवाजुडव करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात यावी,शिक्षकांकडे देण्यात आलेले क्लार्कचे काम काढून त्यांना विध्यार्थ्यांना शिकविण्याची मुभा देण्यात यावी,बाल संगोपन रजा व दीर्घ मुदतीची रजा मंजूर करण्यात याव्या तसेच प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावे अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.यावेळी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अजयकुमार पाटील यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.