यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३० एप्रिल २५ बुधवार
तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंन्द्रासह उपकेंन्द्रात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर,जिल्हा हिवताप अधिकारी एम.एम.पाटील यांच्या सुचनेनुसार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजु तडवी व तालुका आरोग्य पर्यवेक्षक विजय नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.दर्शना जयवंतराव निकम व डॉ.तरन्नुम शेख यांच्या उपस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव अंतर्गत उपकेंद्र मालोद,आडगाव,नायगाव,चिंचोली व डांभूर्णी येथे मलेरिया दिन नुकताच साजरा करण्यात आला.
याप्रसंगी आरोग्य निरिक्षक दीक्षान्त प्रधान,प्रयोगशाळा वैज्ञानिक सतीश सोनवणे,आरोग्य सेवक पवन काळे (पाटील),मनोज बारेला,उमर रजा,पी.एन.कोल्हे इ.सह सर्व कर्मचारी यांनी नागरीकांना मलेरिया,डेंग्यू व चिकनगुनिया यासारख्या आजारांबद्दल आणि त्यांच्या प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली.या कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती मोहीम राबविण्यात आली.मलेरिया,डेंग्यू व चिकनगुनिया हे डासांमुळे होणारे संसर्गजन्य आजार आहेत त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखणे आणि स्वच्छता राखणे तसेच नागरिकांना त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले.उघड्यावर पाणी साचू देऊ नये,झाकण नसलेली भांडी,टायर,नारळाच्या साली यामध्ये पाणी साचल्यास डासांची पैदास होते हे नागरिकांना समजावण्यात आले.याशिवाय अंगावर पूर्ण कपडे घालणे,मच्छरदाणीचा वापर करणे,घरात व परिसरात किटकनाशक फवारणी करणे असे प्रतिबंधात्मक उपाय सांगण्यात आले.