जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय !! भारतात जातनिहाय जनगणनेची आवश्यकता आहे ? !! सविस्तर जाणून घेऊया
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० एप्रिल २५ बुधवार
जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज ३० एप्रिल बुधवार रोजी पत्रकार परिषदत ही माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.२०११ मध्ये सामाजिक-आर्थिक जातनिहाय जनगणना करण्यात आली होती परंतु या प्रक्रियेत संकलित झालेली माहिती उघड करण्यात आली नाही तसेच याच प्रकारे २०१५ मध्ये जातनिहाय जनगणना करण्यात आली होती व या जनगणनेतील आकडेवारीही कधी उघड करण्यात आली नव्हती.काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी वेळोवेळी जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा म्हणता येईल.पत्रकार परिषदेत बोलतांना अश्विनी वैष्णव म्हणाले,राजकीय बाबींवरील मंत्रिमंडळ समितीने आज निर्णय घेतला आहे की आगामी जनगणनेत जातींची गणना देखील केली जावी.जातनिहाय जनगणनेचे परिणाम काय होऊ शकतात ? भारतात ही मागणी कधीपासून केली जाते आहे ? भारतातील जनगणनेचा इतिहास काय आहे ? हे सविस्तर जाणून घेऊया.
भारतातील जनगणनेचा इतिहास काय आहे?
भारतात ब्रिटिश राजवटीत १८७२ मध्ये जनगणना सुरू झाली व सन १९३१ पर्यंत ज्या ज्या वेळी इंग्रजांनी भारताची जनगणना केली त्यामध्ये जाती संदर्भातील माहितीची नोंदणी करण्यात आली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५१ मध्ये जेव्हा भारताने पहिली जनगणना केली तेव्हा केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांचे जातीच्या आधारे वर्गीकरण करण्यात आले तेव्हापासून भारत सरकारने धोरणात्मक निर्णय म्हणून जातनिहाय जनगणना थांबविली आहे आणि सर्वोच्च न्यायालयानेही या विषयाशी संबंधित प्रकरणांमध्ये दुजोरा दिला आहे की,कायद्या नुसार जातनिहाय जनगणना करण्यात येऊ शकत नाही कारण संविधान लोकसंख्येला मान्यता देते,जात किंवा धर्म विचारात घेत नाही.१९८० च्या दशकात अनेक प्रादेशिक राजकीय पक्षांचा उदय झाला व त्यांचे राजकारण जातीवर आधारित होते तेव्हापासूनच परिस्थिती बदलू लागली.राजकारणातील तथाकथित उच्चवर्णीयांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याबरोबरच या पक्षांनी तथाकथित खालच्या जातींना सरकारी शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासाठी मोहीम सुरू केली.सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या जातींना आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर भारत सरकारने १९७९ मध्ये मंडल आयोगाची स्थापना केली.

मंडल आयोगाने इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची शिफारस केली होती परंतु ही शिफारस १९९० मध्येच लागू होऊ शकली व यानंतर देशभरात खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी तीव्र निदर्शने केली.जातीय जनगणनेचा विषय आरक्षणाशी जोडला गेल्याने राजकीय पक्षांनी वेळोवेळी मागणी लावून धरण्यास सुरुवात केली व अखेर २०१० साली मोठ्या संख्येने खासदारांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केल्यावर तत्कालीन काँग्रेस सरकारला ते मान्य करावे लागले.२०११ मध्ये सामाजिक-आर्थिक जातनिहाय जनगणना करण्यात आली होती परंतु या प्रक्रियेत संकलित झालेली माहिती उघड करण्यात आली नाही.याच प्रकारे २०१५ मध्ये जातनिहाय जनगणना करण्यात आली होती व या जनगणनेतील आकडेवारीही कधी उघड करण्यात आली नव्हती.२०११ मध्ये झालेल्या जातनिहाय जनगणेनची आकडेवारी जाहीर का करण्यात आली नाही ?जुलै २०२२ मध्ये केंद्र सरकारने संसदेत सांगितले की,२०११ मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणनेमध्ये प्राप्त झालेली जातनिहाय आकडेवारी जाहीर करण्याचा कोणताही विचार नाही.याच्या काही महिन्यांआधी २०२१ मध्ये एका वेगळ्या प्रकरणाच्य सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्राने म्हटले होते की,२०११ मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक,आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेमध्ये अनेक उणीवा होत्या व यात संकलित करण्यात आलेली आकडेवारीमध्ये अनेक चुका होत्या आणि ही आकडेवारी निरुपयोगी आहे.

केंद्राचे म्हणणे होते की,१९३१ च्या पहिल्या जनगणनेनुसार भारतातील जातींची संख्या ४१४७ होती तर २०११ मध्ये केलेल्या जातीच्या जनगणनेनुसार जातींची एकूण संख्या ४६ लाखांहून अधिक नोंदवली गेली.२०११ मध्ये केलेल्या जातनिहाय जनगणेतील आकडेवारीविषयी सांगताना महाराष्ट्राचे उदाहरण केंद्राने दिले.महाराष्ट्रातील अनुसूचित जाती,जमाती आणि इतर मागासवर्गीय गटात मोडणाऱ्या जातींची संख्या ४९४ होती तर २०११ मध्ये केलेल्या जनगणनेमध्ये महाराष्ट्रातील एकूण जातींची संख्या ४२८६७७ नोंदविण्यात आली.त्याचप्रमाणे केंद्र सरकारचे म्हणणे होते की,जातनिहाय जनगणना करणे प्रशासकीय पातळीवर कठीण आहे.प्रा.सतीश देशपांडे सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ म्हणतात,राष्ट्रीय पातळीवर जातनिहाय जनगणना आज ना उद्या होणारच आहे पण प्रश्न हा आहे की याला कुठवर थांबवता येईल.राज्य अनेक प्रकारच्या अपेक्षा ठेवून ही जातीनिहाय जनगणना करत आहेत.काही वेळी जेव्हा त्यांच्या राजकीय अपेक्षांची पूर्तता झाली नाही तर काही वेळा या प्रकारच्या जनगणनेतून मिळालेली आकडेवारी जाहीर केली जात नाही.कर्नाटकमध्ये करण्यात आलेल्या जातनिहाय जनगणनेचे उदाहरण देत ते म्हणतात,“ही जातनिहाय जनगणना अत्यंत उत्साहात करण्यात आली.तांत्रिकदृष्ट्या ही चांगली जनगणना होती पण या जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात आली नाही.हे प्रकरण राजकीय डावपेचात अडकले. एका गटाला वाटले की त्यांचा फायदा होईल दुसऱ्या गटाला वाटले त्यांचे नुकसान होईल.”

अलाहाबादमधील गोविंद वल्लभ पंत सामाजिक विज्ञान संस्थेत कार्यरत असलेले प्राध्यापक बद्रीनारायण म्हणतात,“जे पक्ष जातनिहाय जनगणना करून त्याची आकडेवारी जाहीर करत नसतील एखादी भीती किंवा आकडेवारीमधील अपूर्णता हे त्याचे कारण असते.अनेक जातींनी सोशल मोबिलिटी (सामाजिक,आर्थिक परिस्थितीत बदल) साध्य केली आहे.त्यांची श्रेणी निश्चित करणे सोपे नसते.वादाला सामोरे जावे लागू नये यासाठीसुद्धा आकडेवारी जाहीर केली जात नाही.”प्रा देशपांडे यांच्यानुसार पुढे काय होईल,हे सांगणे कठीण आहे पण जातनिहाय जनगणनेची मागणी एक न्याय्य मागणी आहे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे तसेच जातनिहाय जनगणना करण्यात जे तांत्रिक अडथळे सांगितले जातात,तो फक्त अडथळा निर्माण करण्याचा प्रकार आहे.क्लिष्ट गोष्टींची गणना आपल्या जनगणनेसाठी नवीन नाही.तांत्रिकदृष्ट्या हे पूर्ण शक्य आहे.सन २००१ मध्ये असलेले जनगणना आयुक्त डॉ.विजयानुन्नी यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की,जनगणना करण्याचे तंत्र या प्रकारची जनगणना करण्यासाठी सक्षम आहे.
जातनिहाय जनगणनेचा लाभ काय होईल ?
जातनिहाय जनगणनेच्या समर्थनार्थ मांडला जाणारा सर्वात मोठा मुद्दे म्हणजे या जनगणनेतून मिळालेल्या आकडेवारीच्या आदारे,समाजातील ज्या गटाला कल्याणकारी योजनांची जास्त गरज आहे त्यांच्यापर्यंत सरकार या योजना पोहचवू शकेल.प्राध्यापक देशपांडे म्हणतात,एक युक्तिवाद असा आहे की जातनिहाय जनगणना फायदेशीर ठरेल कारण कल्याणकारी योजनांची आकडेवारी उपलब्ध असेल तर त्यांची तयारी अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल हा युक्तिवाद कितपत योग्या आहे हे पाहावे लागेल कारण फक्त आकडेवारी असल्यामुळे कल्याणकारी योजनांमध्ये वाढ होईल आणि त्यांच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा होईलच असे नाही तसेच यातून विषमता समोर आली तर ही आकडेवारी समोर येणे आपल्या समाजासाठी चांगले आहे. लघुकालीन विचार करता कदाचित आपल्या समस्या वाढतील आणि राजकीय असंतोष पसरू शकेल पण दीर्घकालीन विचार करता समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचे आहे. जेवढ्या लवकर आपण याला सामोरे जाऊ तितके आपल्या समाजासाठी हितावह असेल.

जातनिहाय जनगणनेची भीती काय आहे?
जातनिहाय जनगणनेची चर्चा होते तेव्हा अनेक चिंता आणि प्रश्न उद्भवतात व यातील सर्वात मोठी चिंता ही आहे की,जातनिहाय जनगणनेमध्ये समोर येणाऱ्या आकडेवारीनुसार देशात आरक्षणाच्या नव्या मागण्या होण्यास सुरुवात होईल.पण विश्लेषक असेही म्हणतात की,आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के ठेवण्याचे निश्चित करण्यात आले होते व त्या मर्यादेकडे ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या बाबतीत दिल्या गेलेल्या निकालाने काणाडोळा झाला.विरोधी पक्षांच्या युक्तिवादानुसार जातनिहाय जनगणनेमुळे एकता अधिक बळकट होईल आणि लोकांना लोकशाहीमध्ये वाटा मिळेल पण या गणनेमुळे सामाजात जातीय ध्रुवीकरण वाढेल अशी भीतीसुद्धा अनेकांना वाटते यामुळे लोकांमधील परस्परसंबंधांवर परिणाम होऊ शकतो.

भारतात जातनिहाय जनगणनेची आवश्यकता आहे?
सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की,भारतात जातनिहाय जनगणना करण्याची खरच गरज आहे का? अनेक समाजशास्त्रज्ञ आणि विश्लेषकांच्या मते समाजातून जाती नष्ट करायच्या असतील तर जातीमुळे मिळणारे विशेषाधिकार आधी नष्ट केले पाहिजेत त्याचप्रमाणे वंचित वर्गांची ओळख निश्चित करावी लागले.जेव्हा सर्व जातींबद्दल अचूक आकडेवारी आणि माहिती उपलब्ध असेल तेव्हाच हे करणे शक्य आहे आणि हे फक्त जातनिहाय जनगणना करूनच साध्य होऊ शकेल.दुसरीकडे हाही युक्तिवाद केला जातो की,कल्याणकारी योजनांचा लाभ वंचित गटांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि वंचित गट निश्चित करण्यासाठी जातनिहाय जनगणना उपयुक्त आहे.तिसरा मुद्दा हा शिक्षणसंस्था व नोकऱ्यामध्ये दिल्या जाणाऱ्या आरक्षणाची कक्षा रुंदावण्याचा आहे यासाठीसुद्धा विश्वासार्ह आकडेवारीची आवश्यकता आहे व ही आकडेवारी जातनिहाय जनगणनेतूनच मिळू शकते.