महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व आदिवासी विभागाचा ७४६ कोटी रुपयांचा निधी ‘लाडकी बहीण’ योजनेकडे वळविला !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०३ मे २५ शनिवार
महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा इतर योजनांना आणि विकासकामांना फटक बसत असल्याची ओरड आधीपासून होत होती मात्र आता लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागाचा निधी वळवल्याची माहिती समोर आली असून लाडकी बहिण योजनेसाठी मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी हा महिला आणि बालविकास मंत्रालयाकडे वळवल्याची माहिती समोर आली आहे.सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाचा ४१० कोटी ३० लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाला देण्यात आला आहे.तर आदिवासी विकास विभागाचा ३३५ कोटी ७० लाख रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे वळवण्यात आले आहेत. याबाबत निधी वळवल्याचा शासन निर्णय देखील काढण्यात आला आअसल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.निधी वळवण्याची चर्चा सुरु असतांना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती मात्र आता शासन निर्णयच काढल्याने संजय शिरसाट यांच्याकडून काय प्रतिक्रिया मिळते याबाबत राजकीय चर्चा चर्चिली जात असून ते याबाबत काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल.
दरम्यान राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटूंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.सदर योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना राज्यातील २१ ते ६५ या वर्षे वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित,विधवा,घटस्फोटित,परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक बँक खात्यात थेट लाभ दरमहा १५०० रुपये इतकी रक्कम देण्यात येते.
आदिवासी विकास विभागाचे ३३५.७० कोटी तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गांसाठीचे ४१०.३० कोटी वळवले !!
दरम्यान सदर योजनेसाठी आदिवासी विकास विभागाच्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात ३२४० कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली असून सदर तरतूदीमधून ३३५.७० कोटी इतका निधी हा “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेकरीता वळविण्यात आला आहे.तसेच २०२५-२६ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील घटकांसाठी ३९६० कोटी इतकी अर्थसंकल्पिय तरतूद करण्यात आली असून सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील लाभार्थ्यांना वाटप वाटप करावयाचा ४१०.३० कोटी रुपयांचा निधी “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेकरीता वळविण्यात आला आहे.सदरहू सदरील निधी वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली असून सामाजिक न्याय व आदिवासी विभागाचा ३३५.७० व सामाजिक न्याय विभागाचा ४१०.३० कोटी असा निधी ‘लाडकी बहीण’ योजनेकडे वळविण्यात आलेला असल्याने सदरील विभागातील योजनांवर याचा परिणाम दिसून येणार आहे.सदरहू निधी वितरीत करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती.