रासायनिक खतांमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय खतांकडे वळावे-विनय बोरसे यांचे प्रतिपादन !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.७ मे २५ बुधवार
येथील पंचायत समिती सभागृहात महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांचे वतीने शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम २०२५-२६ पूर्व कार्यशाळा खरीप हंगाम २०२५ यशस्वी करणेसाठी तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणेबाबत उपलब्ध तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणेसाठी तालुकास्तरावर सर्व अधिकारी,कर्मचारी,प्रगतीशील शेतकरी,महिला शेतकरी, शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपनी यांची तालुकास्तरीय एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यशाळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी.टी.चोपडे यावल (सेंद्रीय शेती प्रचारक शेतकरी) हे होते.सदर कार्यशाळा कार्यक्रमाची प्रस्तावना भरत वारे,तालुका कृषी अधिकारी यावल यांनी केली.प्रसंगी राहुल चौधरी शेतकरी न्हावी यांनी ट्रायकोडर्मा व जैविक खते निर्मितीबाबत तसेच डॉ.धीरज नेहेते शास्त्रज्ञ केव्हिके पाल यांनी माती व पाणी परिक्षणबाबत तर विकास कुंभार यांनी पीएमएफएमइ अंतर्गत शेतीसंबंधी व्यवसाय करण्यासाठी कर्ज व अनुदान याबाबत तर कु.समिधा अडकमोल कृषी सहाय्यक यांनी बियाने उगवण क्षमता तपासणी तसेच कामगंध सापळा वापर प्रात्यक्षिक दाखविले त्यातून खर्चाची बचतबाबत तसेच महेशआगिवाल कृषी पर्यवेक्षक यांनी बीज प्रक्रियाबाबत व गणेश बाविस्कर,कृषी सहायक यांना माती नमुना कसा काढावा याबाबत तसेच अनंत नारखेडे,कृषी पर्यवेक्षक यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणेबाबत मार्गदर्शक केले.प्रमुख मार्गदर्शक विनय बोरसे नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प धुळे यांनी सेंद्रीय शेती काळाची गरज,रासायनिक खतांच्या वापरामुळे मानवी जीवनावर होणारे गंभीर परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करतांना रासायनिक खतांमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय खतांकडे वळावे असे विनय बोरसे यांनी प्रतिपादन केले.सदर कार्यशाळेस वरील वक्ते बरोबरच सहाय्यक प्रकल्प अधिकारी,पंचायत समिती यावल चे जी.टी.सोनवणे उपस्थीत होते.सदर कार्यशाळा यशस्वी करणेसाठी कृषी पर्यवेक्षक शिकोकारे,श्रीमती कंकाळ,आगिवाल,पाटील,नारखेडे,जाधव (आत्मा) तसेच तालुका कृषीअधिकारी कार्यालयातील सर्व कृषी सहायक, इतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यशाळेला उपस्थितांचे आभार किनगावचे मंडळ कृषी अधिकारी अजय खैरनार यांनी मानले.