मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० मे २५ शनिवार
दरम्यान मूळ आंध्र प्रदेशचे रहिवाशी असलेले मुरली नाईक हे आपल्या आईवडिलांसोबत काही वर्षांपासून घाटकोपर येथील कामराज नगरमध्ये वास्तव्याला होते.यात त्यांचे वडिलांनी मजुरी व आईने घरकाम करून मुरली नाईक यांना वाढवून शिक्षणाचे धडे दिले.परिणामी अशा बिकट परिस्थितीत मुरली नाईक यांनी शिक्षण पूर्ण करून लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला व सन २०२२ मध्ये त्यांची ‘अग्निवीर’ योजनेतून लष्करात जवान म्हणून नियुक्त झाली.नाशिक,देवळाली येथील प्रशिक्षण आटोपून त्यांना सुरवातीला आसाम येथील सीमावर्ती भागात नियुक्त करण्यात आले व त्यानंतर पंजाब येथे तसेच पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान लष्करी कारवायांना तोंड फुटताच त्यांना काश्मीर खोऱ्यात कर्तव्यासाठी बोलावणे आले.मुरली नाईक शहीद झाल्याचे कळताच त्यांचे नातेवाईक,मित्रपरिवार,शेजारी व परिचितांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली.यावेळी कामराज नगरबरोबरच आजुबाजूच्या परिसरातील नागरिक जमा झाले व शहीद मुरली नाईक यांचा पराक्रम सांगणारे तसेच श्रद्धांजली वाहणारे पोस्टर व बॅनर घाटकोपर येथे झळकले.दरम्यान मुरली नाईक यांची आई याबाबत म्हटले आहे की,पंजाबचा तळ सोडतांना मुरलीने मला फोन केला होता व सध्याचा तणाव पाहता एकुलता एक मुलगा काश्मीरमध्ये जाणार या विचाराने पोटात गोळा आला होता.अवेळी आलेला प्रत्येक फोन घेतांना माझ्या काळजाचा थरकाप उडत असे व अखेर आमची ही भीती खरी ठरली असल्याचे म्हटले आहे.तर मुरलीच्या वडिलांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की,‘देशाचे रक्षण करतांना तुमचा पुत्र व आमचे सहकारी मुरली शहीद झाले आहेत’ अशी दुःखद बातमी लष्करी अधिकाऱ्याने काल शुक्रवारी मला कळवली.परिणामी माझ्या पायाखालची जमीन सरकली व माझ्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून मुरलीची आई चक्कर येऊन कोसळली.शहीद मुलाबाबत सांगताना मुरली यांचे वडील श्रीराम यांना यावेळी अश्रू अनावर झाले.