आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातुन चुंचाळे येथील गायरान जमीनीवर आदिवासींना घरकुल मिळणार !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० मे २५ शनिवार
आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातुन आदिवासी गरजू लाभार्थी बांधवांना घरकुल मिळणार असल्याबाबतची माहिती नुकतीच उपलब्ध झाली असून सदरील निर्णयामुळे आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.चोपडा मतदार संघातील यावल तालुक्यातील चुंचाळे या ठिकाणी असलेल्या गायरान आदिवासी वस्तीतील घरकुल सद्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड गावातील घरकुल लाभार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली व त्यांना घरकुल बांधकाम लवकर करावे याबाबत सांगितले.
दरम्यान शिवसेनेचे भरत चौधरी यांनी सांगितले की,तालुक्यातील चुंचाळे या गाव परिसरातील आदिवासी गायरान वस्तीमध्ये घरकुल योजनेसाठी स्वतःची जागा असणे आवश्यक असते परंतु गायरान आदिवासी बांधवांकडे स्वतःची जागा उपलब्ध नसल्यामुळे घरकुल बांधकाम होत नव्हते ही समस्या होती.प्रसंगी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे व माजी आ.लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नाने जिल्हाधिकारी जळगाव यांनी चुंचाळे गायरान येथील जागा घरकुलसाठी मंजूर करून घेतली असून सदरील जागा मंजूर झाल्यामुळे आदिवासी गायरान वस्तीतील ७३ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे.यात सन २०१६-१७ चुंचाळे गायरान मध्ये १३ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होऊन ३० तीस हजार रुपये पहिला हप्ता देण्यात आला.तर २०१९-२० मध्ये १७ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होऊन पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला असून हे सर्व मंजूर लाभार्थी ब यादीतील आहेत.यात शासनाच्या नियमानुसार प्रत्येक लाभार्थ्यांना ३०० स्क्वेअर फुट जागा देऊन त्या लाभार्थ्याने त्या जागेवर घरकुल बांधकाम करणे आवश्यक आहे.यावेळी यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड,चुंचाळे ग्रामसेवक भुषण बिऱ्हाडे यांच्यासह शिवसेनेचे भरत चौधरी,मुबारक तडवी,संजय पाटील,उपसरपंच आबा पाटील,हर्षल चौधरी,सुधाकर कोळी,तिथल्या बारेला,कलिंदर तडवी यांच्यासह आदिवासी बांधव व घरकुल लाभार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.