लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा घोटाळा !! बँक खाते सायबर गुन्हेगारांना आणि मनी लाँडरिंग करणाऱ्यांना विक्री !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० मे २५ शनिवार
राज्य सरकारकडून महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना राबवली जात असून या योजनेतून महिलांना दरमहा १५०० रूपये सरकारकडून दिले जात आहे.सदरहू या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम व अटी देखील लागू करण्यात आल्या आहेत.विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेचा सरकारला मोठा फायदा झाला मात्र आता लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा घोटाळा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे.जुहू पोलिसांनी एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे.
दरम्यान झोपडपट्टीतील लोकांना ‘लाडकी बहीण योजना’चे आमिष दाखवून त्यांचे बँक खाते उघडले जात होते व हे लोक हे बँक खाते सायबर गुन्हेगारांना आणि मनी लाँडरिंग करणाऱ्यांना विकत होते अशा प्रकारे त्यांनी तब्बल २५०० पेक्षा जास्त बँक खाती उघडली होती.सदरील आरोपी हे गुजरातच्या सुरत शहरातून हे रॅकेट चालवत होते.या आरोपींनी मुंबईतील नेहरू नगर,डी.एन.नगर आणि धारावी यांसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना टार्गेच केले.तसेच त्यांनी फार शिक्षण नसलेल्या लोकांना लाडकी बहीण योजनेचे अमिष दाखवले आणि दर महिन्याला १५०० रूपये तुम्हाला भेटणार असल्याचे देखील सांगितले.परिणामी दरमहिन्याला १५०० रूपये भेटणार असल्याने लोकांनी धडाधड बॅंकांमध्ये खाते उघडली व हेच नाही तर बॅंकेत खाते उघडण्यासाठीही आरोपींनी लोकांना प्रत्येकी १००० रूपये दिले हे विशेष !.
दरम्यान सदरील आरोपी हे खाते सायबर फ्रॉड आणि मनी लाँडरिंग करणाऱ्या लोकांना विकत होते.काही बँक अधिकारी व्यवस्थित तपासणी करत नव्हते मात्र पोलिसांच्या सर्तकतेमुळे हा घोटाळा उघडकीस आला असून पोलिसांनी आतापर्यंत १०० पेक्षा जास्त बँक खाती गोठवली आहेत.यात विशेष बाब म्हणजे लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी असली तरीही बॅंक खाते उघडणारे पुरूषच जास्त होते.वकील सय्यद खान यांच्या पत्नीला कळाले की,लाडकी बहीण योजनेसाठी खाते उघडले की १५०० रूपये मिळत आहेत तसेच त्यांना नवीन सीम कार्ड वापरून बँक खाते उघडण्यास सांगितले त्याचबरोबर आधार कार्ड आणि पॅन कार्ड जमा करण्यास सांगितले तेव्हा वकील त्यांच्या पत्नीसोबत बँकेत गेले आणि त्यांनी खाते उघडले आणि आरोपींनी त्यांना १००० रूपये दिले.यानंतर वकिलाने आणखी काही लोकांना खाते उघडण्यास मदत करण्यासाठी त्या व्यक्तीशी संपर्क केला आणि लोकांना त्या व्यक्तीवर संशय आला तेव्हा लोकांनी याबद्दल जुहू पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी अविनाश अमृत कांबळे या व्यक्तीला शिताफीने ताब्यात घेतले आणि सर्व प्रकरणाचा भांडाफोड झाला.याबाबत आरोपी अविनाश कांबळे याने सांगितले की,त्याला एक बॅंक खाते उघडण्यासाठी ४००० रूपये मिळत होते.