मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
मनसेच्या वतीने दरवर्षी आयोजित करणाऱ्यात येणाऱ्या शिवाजी पार्क दीपोत्सवाचा प्रारंभ आजपासून होतोय.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.या दीपोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यांनी मुंबईकरांना पत्र लिहिले आहे आणि मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
माझ्या शिवाजी पार्क शेजाऱ्यांनो तसेच समस्त दादरकर आणि मुंबईकर जनहो,
दिवाळी आली आणि दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसू लागला.गेली काही वर्ष करोनामुळे दिवाळी थोडी झाकोळलेली होती,परंतु यावेळेस दिवाळी पुन्हा एकदा नवा उत्साह,आनंद आणि नवी स्वप्नं घेऊन आली आहे.दिवाळी आणि शिवतीर्थ परिसरातली रोषणाई हे आपले समीकरणे गेली १० वर्ष सुरू आहे.दरवर्षी आपण शिवतीर्थवर,तिथल्या रस्त्यांवर,झाडांवर रोषणाई करतो.गेली दोन वर्ष करोना असताना सुद्धा आपण त्या परंपरेत खंड पडू दिला नव्हता.यावर्षी देखील आपण ही रोषणाई करून दिवाळीचा आनंद साजरा करणार आहोतच त्या उत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी हे पत्र लिहितो आहे.
दीपावलीच्या निमित्ताने आपण आपले घर,आपले अंगण आणि आपला परिसर दिव्यांनी उजळवून टाकतो.दादरमधील शिवतीर्थाचा परिसर हे मी माझ्या घराचे अंगणच समजतो म्हणून हे अंगण तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि सहभागाने विविध रंगी लखलखणाऱ्या दिव्यांच्या रोषणाईने आणि इतर सजावटीने आपण उजळवून टाकणार आहोत.मला तर वाटते की प्रत्येकाने आपल्या घराबरोबर आपले अंगण आणि आपला परिसर असाच सुंदर ठेवला,तर महाराष्ट्राला दृष्ट लागावी असा आणि जगाला हेवा वाटेल असा होईल.हे करण्यामागेही माझी तीच भावना आहे.
वसुबारसेपासून तुळशीच्या लग्नापर्यंत आपली रोषणाई आपला परिसर उजळवून टाकते.यावर्षी वसुबारसेला म्हणजे २१ ऑक्टोबरला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपण दीप सोहळ्याचे उद्घाटन करणार आहोत. आपण अवश्य यावे आपल्या कुटुंबातील सर्वांना घेऊन यावे. मित्र मंडळींना सांगावे.आनंद आपण एकट्याने साजरा करत नाही त्यात जितकी आप्त,मित्रमंडळी सहभागी होतील तितका तो आनंदाचा सोहळा वाढत जावो.तुम्ही याच आणि इतरांनाही आवर्जून सांगा असे राज ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे.