ग्रामपंचायतीचा ठराव न घेता सरपंचांकडून सदस्यांना डावलून माती वाहतुकीस परवानगी !! सदर प्रकाराबाबत सर्कल अधिकारी घटनास्थळी दाखल !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ मे २५ गुरुवार
येथील सरपंच गुणवंती सुरज पाटील यांनी कोणताही ठराव न घेता तसेच सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर सावदा येथील एका व्यक्तीस गावातील सर्वे नं.१२३४ मधील गौशाळा परिसरातील माती खोदून वाहतूक करण्यास परवानगी दिल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच सर्कल अधिकारी बबिता चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली असता त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की,ग्रामपंचायतीला माती वाहतुकीस परवानगी देण्याचा कोणताही अधिकार नसून हे अधिकार महसूल विभागाच्या अधीन आहे व त्यासाठी संबंधित परवानग्या घेणे आवश्यक असते असेही त्यांनी नमूद केले आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्या पुनम पाटील,सदस्य छोटू बाविस्कर,उपसरपंच अलका कोळी तसेच सामाजिक कार्यकर्ते भरत चौधरी,योगेश चौधरी व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान गावकऱ्यांमध्ये सरपंचाच्या या परस्पर निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला जात असून ग्रामसभेचा अपमान झाल्याची भावना गावकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.सदरहू या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.